कवडी न बांधू गांठ को,

माँगनेसे सब जाय,

मेरे पिछे मेरा हरी फिरे,

उसका भक्त न भूखा जाय !

संत कबरीरांची हि अमृतवाणी, काळाने कितीही धुरकट करण्याचा प्रयत्न केला तरीही अजून तितकीच अचूक आणि समर्पक आहे. जीवन प्रवासात हेच दोहे अनुभवायला मिळतात तेव्हा तो सुवर्णकांचन योग.

अध्यात्मिक प्रगती करणं, म्हणजे गुरूने आखून दिलेल्या मार्गावर अविरत चालत रहाणं ….

तुम्ही ज्या देवतेची उपासना कराल, आराधना कराल, साधना कराल … ती देवता आपल्या संपूर्ण शक्तिनिशी तुमच्या पाठीशी अखंड उभी राहते …. तुमच्यावर कृपा करते … तुम्हाला संरक्षण देते. 

साधना मार्गावर याची जाणीवही आपल्याला होते. अनुभव छोटे जरी असले, तरीही त्याचे अर्थ व्यापक असतात, आपल्याला या मार्गावर प्रोत्साहन देणारे आणि समृद्ध करणारेच असतात.

कधी कधी आपली आपल्याला लाज वाटते, ….. देवा …. का रे बाबा इतकं … तुला काय गरज पडलीय … तु का इतक्या छोट्या छोट्या गोष्टी सहज आणि सुकर करतोयस.

त्याने का करावं आपलं आयुष्य सोपं ? आपण असं त्याच्यासाठी इतकं जीव ओतून काय केलंय ?

याच मला समजलेलं कारण असं … की, देव हा भक्तीचा भुकेला आहे. आपल्याला येणारे आणि त्याहूनही आल्यावर समजणारे अनुभव ही, आपली भक्ती त्याच्यापर्यंत पोहोचते आहे, याच प्रतिक आहेत.

त्या गंतव्य स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी आपण निवडलेला मार्ग सुयोग्य आहे, जो भक्तीतून भगवंताकडे सुखरूप नेणारा आहे.

आपल्या छोट्या छोट्या गोष्टीही सहज आणि निर्विघ्न होणं… आपली अगदी छोटीशी इच्छा पूर्ण होणं, हे संकेत आहेत … त्याच आपल्यावर निरंतर लक्ष आहे.

मला सोमवार पासून म्हणजे …. गेली दोन दिवस बेसनाचे छान लाडू खावेसे वाटत होते. जे श्री. स्वामी समर्थांनाही आवडतात.

घरी सांगून झालं ….

वेळ काढून आपण स्वतः करू …. म्हणून यू-ट्यूबवर चांगले रवाळ लाडू कसे करायचे याचे विडिओ पाहून झालं …. पण वेळच मिळाला नाही

शनिवार – रविवारी बघू…. असा विचार करून मी विषय सोडून दिला. 

बुधवारी श्री. दत्तजयंती होती ….दादरच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात खूप गर्दी असेल म्हणून देवळातही जायचं राहील, आणि घरी माझ्या लहान मुलीला बघायचं होतं, म्हणून संध्याकाळी पालखीलाही जाता आलं नाही.

ऑफिस मधून घरी आलो … फ्रेश झालो … काहीतरी खाऊया म्हणून स्वयंपाक घरात गेलो, इकडे तिकडे पाहिलं, तर … फ्रिजवर बेसनाचे चार लाडू….. मी क्षणात प्रसन्न.

मी सांगितलं होतं  म्हणून बायकोने आणले असतील …..

लगेच एक उचलला .. अर्धा मी आणि अर्धा मुलीने खाल्ला …

समाधान … इच्छापूर्तीचा आनंद

आपल्याला खावीशी वाटणारी ती एक गोष्ट …. जी लगोलग मिळावी म्हणून आपण प्रयत्न करत असतो… ती अशी अचानक मिळाली, की कित्ती छान वाटतं नाई …..

जिभेला हवी असणारी चव तिला मिळाली की ती तृप्त होते. मनाची इच्छा पूर्ण झाली म्हणून ते शांत होते आणि शरीर समाधानाचा आनंद घेते.

आहो…….खरी गंम्मत पुढे आहे …

बायको घरी आल्यावर  तिला विचारले …’लाडू तू विकत आणलेस का ?… माझ्यासाठी ‘

तर ती म्हणाली, श्री. दत्तजयंती निमित्त ती आणि मुलगी श्री. स्वामी समर्थांच्या मठात दर्शनासाठी गेली होती …. फार गर्दीही नव्हती

देवाला फुले वाहिल्यावर गुरुजींनी मुलगी लहान म्हणून तिच्या हातात सहा बेसनाच्या लाडवाचं अक्ख पॅकेटच दिलं.

हे ऐकून …. माझं मलाच भरून आलं … जरा लाजही वाटली.

मला तर साधं दर्शनालाही जाता आलं नाही … तरीही …. देणाऱ्याने तरी किती … आणि काय काय द्यावं ???.

किती काळजी त्याला … मला लाडू खावेसे वाटत होते म्हणून अशी सोय केली त्यानं.

श्री. स्वामी समर्थांनाही बेसनाचे लाडू आवडतात … तेच त्यांनी प्रसाद म्हणून पाठवले.

आपल्या भगवत गीतेत सांगितलंय

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते। तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ।। गीता ९/२२।।

जो अनन्य भावाने माझे स्मरण करेल, त्याचा प्रपंच मी चालवेन

जर तो आपल्यासाठी इतकं काही करणार आहे, तर आपल्याला त्याच्यासाठी काय करायचंय … हे ठाऊक पाहिजे.

या आलेल्या अनुभवातून मी काय शिकायचं … तर आपल्याला आवडणारी गोष्टही अशी सहज देता आली पाहिजे.

निस्वार्थपणे त्याचं स्मरण करता आलं पाहिजे

त्याच्या ऋणात राहता आलं पाहिजे.

प्रसाद म्हणून मिळालेल्या लाडवाचा गोडवा जिभेवर आणि सात्विकता मनात जपता आली पाहिजे.

शुभं भवतू

कृष्णार्पणमस्तू

© अनुप साळगांवकर – दादर

दिनांक. ०७ डिसेंबर २०२२ ( श्री. दत्तजयंती )

अनुभूती – भाग

अनुभूती – भाग ६