का तुझा स्पर्श सुखावतो ? ….. माहित नाही.
तरंग उठतात प्रेमाचे….
तुषार उडतात हर्षाचे …
कुणालाही सांगता येत नाही …. कोणत्याही चौकटीत बांधता येत नाही
सांगितलं तर पटत नाही… हव्यास काही घटत नाही.  
तू आजूबाजूला असण्यानेच … त्या नकळत स्पर्शाने …. वेळ थांबते माझी.
हातातली कामं …  हातात रेंगाळत राहतात …
शरीरावर मनाचा ताबा सुटतो …
मन धावतं …. सुसाट … त्या स्पर्शसुखाकडे …
तुझं ते घुटमळत रहाणं …विचारपूर्वक नसेलही …..
मला आणखीन गुंतवत राहतं … तुझ्यात.
चालताना तू अचानक धरलेला हात …. कुरवाळताना … पायाने चालत … मानाने फुलत … प्रवास संपूच नये असं वाटतं.
आता कालचच बघ ना …..
काल होळी खेळताना, तुझा गालाला लागलेला हात ….  रंग नाही… जीव लाऊन गेला.
मी माझ्या गालाला अजूनही हात लावला ….. तरी ओठांची आडवी रेघ रुंदावते आणि गाल गुलाबी होतोच.
खरंय …. अगदी निर्विवाद
“स्पर्शाची जादूच निराळी.”
ती जागेपणी स्वप्न दाखवते …
खांद्याला गुदगुदल्या होतात … आणि तिथूनच पंख फुटतात…
फुलपाखरू होतं आपलं ….
बागडत राहतं …. एकटच  … भिर भिर भिर भिर ….
मज्जाय नाही ….
आपल्या जिवलगाच्या स्पर्शानं, अंग मोहरलं नाही … तर नवलच.
त्या मिठीत स्वर्ग जाणवला नाही … तर आपल्यासारखे अभागी आपणच.
हा स्पर्श साठवायला हवा…
आणि त्याहीपेक्षा तो जपायला हवा…
ती स्पर्शाची भाषाही शिकायला हवी … जी शब्दांपेक्षाही प्रभावी आहे.
बोलून मोकळं होण्यापेक्षा … गालावर अलवार हात ठेऊन … डोळ्यांत वाचता आलं पाहिजे.
त्या हातावर ओघळणारा थेंब … जास्त पारदर्शक असतो.
जो कोणताही नातं पारदर्शक करण्यासाठी मदतच करत असतो.
बरोबर ना ….
आपल्याला सगळं कळत असतं …..  पण प्रत्येकवेळी  शब्दात गुंफता येत नाही
प्रेमाची भाषा कळते … प्रत्येकाला …. फक्त लिहिता येत नाही.
पण मला एवढं मात्र नक्की कळतंय …
तुझा विचार जरी आला …
तरी आठवतो … तो स्पर्श
जो आहे सहर्ष….

कृष्णार्पणमस्तू

@ अनुप साळगांवकर – दादर