खळ-खळ वाहणाऱ्या नदीच्या किनारी, एका हिरव्यागार रानात, उंचपुरी टुमदार झाडावर, एका चिऊताईने बारीक काटेकुटे, सुके गवत, कापूस, पिसे गोळा करून एक छानसं घर बांधल होतं. नदीचं स्वच्छ पाणी, मोकळी हवा आणि रानातला रानमेवा खाऊन ती आणि तिची दोन पिल्ले त्या घरट्यात खूप आनंदाने राहत होती. दिवसा मागून दिवस सरत होते. पिल्ले हळू हळू मोठ्ठी होत होती. चिऊताई आपल्या पिल्लांना स्वसंरक्षण आणि स्वावलंबनाचे धडे देत होती. आकाशी झेप कशी घ्यायची, आपलं अन्न कसं शोधायचं, हवेचा अंदाज कसा घ्यायचा, आपलं आणि आपल्या सोबत असणाऱ्यांचं रक्षण कसं करायचं याची सगळी प्रात्यक्षिकासहित माहिती देत होती.  ती गोजिरवाणी पिल्लेही आपल्या आईचे अनुकरण करत होती, सगळं शिक्षण उत्सुकतेनं घेत होती.

एक दिवस पहाटे चिऊ आपल्या पिल्लांन सोबत अन्न शोधण्यासाठी घरट्या बाहेर पडली, अन्न-पाण्याची जमवाजमव करेपर्यंत फार उशीर झाला. चिऊ आणि तिची पिल्ले थकून गेली होती. अंधार होण्याआधी घराकडे परतू .. असा विचार करून निघाली.  सायंकाळी घरी परतताना पाहतात तर काय…… त्यांसमोर अचानक सा-या जंगलभर वणवा पसरलेला असतो. प्रत्येक झाड आगीत होरपळलेले असते. चहू बाजूंनी आगीचे नुसते डोंब उसलेले असतात. चिऊताईच्या राहत्या झाडाची आणि घरट्याची राखरांगोळी झालेली असते. पिल्ले हे सारं निसर्गाचं रुद्र रूप पाहून खूप घाबरून जातात, चिऊकडे केविलवाण्या नजरेने पाहू लागतात आणि ‘आता कुठं राहायचं’ या विचाराने चिऊला बिलगून रडू लागतात.

चिऊ आपल्या पिल्लांना पंखाखाली घेते, त्यांच्या डोक्यावरून हात फिरवते, त्यांना धीर दिते. आपल्या मुलांना स्वावलंब शिकवण्याची हि खूप छान संधी आहे असा विचार करते आणि काहीही न बोलता पिल्लांनसोबत दुसऱ्या एका जवळपासच्या रानात निघून जाते. तिकडे गेल्यावर पिल्लांसोबत एका उंच, डेरेदार झाडाची आपल्या नवीन घरट्यासाठी निवड करते. रानोरान भटकून काटेकुटे, सुके गवत, कापूस, पिसे शोधण्याचा प्रयत्न करते. चिऊची उमेद बघून, पाठोपाठ पिल्लेही नवे घरटे बनवण्याच्या तयारीला लागतात. सामान गोळा करण्यापासून घरटे वीणेपर्यंत सर्वतोपरी सहकार्य करतात. आणि बघता बघता एक छानसं घरटं आकाराला येतं.  चिऊ आणि तिच्या पिल्लांना स्वतः बांधलेल्या घरट्याचा स्वनिर्मितीचा आनंद होतो, घरट्यात त्यांचा पुन्हा एकदा चिवचिवाट सुरु होतो.

चिऊताईला  घरटे बांधणीच्या कामात आपल्या पिल्लांनी केलेल्या मदतीचे फार कौतुक वाटते. पिल्लांनाही आलेल्या संकटाशी कसा धैर्याने सामना करायचा, ते समजतं.

म्हणूनच दोस्तहो, कितीही कठीण परिस्थिती असेल तरी घाबरून जाऊ नका. परिस्थिती आपल्या हातात नसली, तरी प्रयत्न करणे आपल्या हातात आहे हे कधीही विसरू नका. धैर्यने संकटाचा सामना करा. संकट आपल्याला कमकुवत नाही, तर कणखर व्हायला मदत करतात.

शुभं भवतू ….. कृष्णार्पणमस्तु

©™ श्री. अनुप साळगांवकर- दादर, मुंबई