मनोगत

शब्द ब्रम्ह आहेत. हे विश्वच ध्वनिनिर्मित शब्दांच आहे. जिथे शब्द संवाद साधतात, शब्द हास्य खुलवतात, शब्द  गालावर ओघळतात, शब्द व्यक्त होतात, शब्द ठाव घेतात, शब्द चित्र रंगवतात, शब्द निःशब्द होतात.

महाविद्यालयात शिकत असताना एकदा ओघानं “मृत्युंजय “ हे पुस्तक हातात पडलं. अगदी तेव्हापासूनच वाचनाची आवड निर्माण झाली. या पुस्तकांच्या विश्वात मन रमू लागलं. वाचता वाचता लिहावंसं वाटलं. माझ्या मते जेव्हा आपल्याला काहीतरी लिहावंसं वाटतं तेव्हा एका लेखकाचा जन्म होतो. माझ्यातल्या लेखकाचा जन्मही असाच झालाय. लिहायची सुरवात साधारण २०१५ साली झाली. सुरुवातीला चारोळ्या करणे, कविता करणे हे छंद जोपासले. लहान मुलांसाठी गोष्टी लिहिण्याची फार इच्छा होतीच.

घरच्यांकडून, थोरा -मोठ्यांकडून, मित्र -मत्रिणींकडून खूप कौतुक झालं. लिहिण्याची प्रेरणा ही याच साऱ्यांनी दिली. एक गोष्ट लिहायला घेतली त्या एका गोष्टीच्या पंधरा गोष्टी कधी लिहून झाल्या माझं मलाच कळलं नाही. मग हळूहळू चारोळ्या, कविताही जन्माला आल्या. हो जन्मच म्हणावं लागेल. एखादी कविता किंवा कथा लिहिणं हे एका बाळाला जन्म देण्यासारखंच वाटतं मला. एक एक ओळ आकार घेत असते. थेंबा थेंबांनी तळं साठत असतं. आपणचं आंजारायचं, गोंजारायचं, थोडंस रागे भरायचं……. आपल्या भावनांचंच विश्व हे. आपण त्यात रममाण व्हायचं.

लहान मुलांबद्दल फार वाटतं मला. शेवटी हि लहान मुलंच उद्याच्या समाजाचा आरसा आहेत. त्यांसाठी काही बाळ-बोधकथा लिहिल्या. एका दिवाळी अंकासाठी ” आपल्या कोकणातील भयकथा लिहून देशील का?” अशी विचारणा झाली. माझ्यातला लेखकही जागा झाला. मी स्वतः कोकणातला असल्यामुळे आणि मलाही भयकथेची प्रचंड आवड असल्यामुळे “घुबड” हि पहिली कथा लिहिली. इथेच माझी भयकथा लिहिण्याची सुरुवात झाली असं म्हणावं लागेल.

माणूस माणसाला घडवत असतो….. माझ्या जवळच्या सगळ्यांचाच माझ्या लिखाणात सिहांचा वाटा आहे. आपलेपणाने वाचणे, त्यावर टीका-टिपण्णी करणे, प्रोत्साहन देणे आणि काही नवीन सुचवणे ही कामं माझी माणसं अविरत करत असतात. कौतुक करणाऱ्यांपेक्षा प्रोत्साहन देणारी ही माझी माणसच जास्त महत्वाची. माझं लिखाण हे माझ्याहीपेक्षा त्यांचं जास्त आहे. 

आपण काहीतरी लिहिणं आणि वाचकांना ते आवडणं या पेक्षा सुख वेगळं ते काय? श्रमसाफल्याचाआनंद हा यातूनच मिळतो. जो चिरंतर समाधान देतो.

आजतागायत अनेक गोष्टी लिहून झाल्या. त्या ई- पुस्तक रूपात सर्वपरिचित व्हाव्यात हि मनोमन इच्छा होतीच. , बालसाहित्यावर “बाळबोध” हे माझं पाहिलं आणि प्रावासवर्णनावर अध्यात्मिक यात्रेबद्दल माहिती देणारं “जय गिरिनारी “ हे दुसरं पुस्तक ई-प्रकाशित झालंय याचा आनंद आहे. भयकथा, गूढकथा, रहस्यकथा या अबालवृद्धाना आवडतात, हा माझा अनुभव आहे. माझ्या कथा या नक्कीच तुमचं मनोरंजन करतील. तुम्हाला एका वेगळ्या आणि चित्रमय विश्वात घेऊन जातील, एक वेगळं जग निर्माण करतील. हा माझा विश्वास आहे. म्हणून आता नुकताच “अतर्क्य “ हा गूढकथा संग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांनी दिलेल्या प्रेरणेबद्दल, माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी या संपूर्ण  ई -साहित्य कुटुंबाचा अत्यंत ऋणी आहे.

लिहिणे हा एक प्रवास आहे, जो मला आनंद देतो आणि तो प्रवास माझ्याकडून असाच अविरत चालू राहील.

शुभं भवतु ….. कल्याणमस्तु.

श्री. अनुप अनिल साळगांवकर

ई मेल : salgaonkar.anup@gmail.com

प्रस्तावना

माणसाच्या मनात भय असतच. त्याचबरोबर मानवी मनाला गुढ गोष्टींचा ठाव घेण्याची एक उर्मी असते. ह्यावर वेगवेगळ्या गुढ कल्पनांचा, अतर्क्य कल्पनांचा जन्म झालेला आहे. यामागे, या कल्पना समजून घेण्यामागे एक प्रकारचे आकर्षण आणि त्याच बरोबर एक वेगळ्या प्रकारचा गुढ आनंद मिळेल असाही एक उद्देश आहे. मराठी भाषेत खऱ्या अर्थाने भयकथा लेखक रत्नाकर मतकरी यांनी आणल्या. पण भयकथा इतर भाषांमध्ये उदा. इंग्रजी भाषेमध्ये जेवढ्या लिहिल्या गेल्या आहेत तेवढ्या मराठीमध्ये लिहिल्या गेल्या नाहीत. रत्नाकर मतकरी यांनी ज्या कथा लिहिल्या त्या गुढकथा म्हणूनही प्रसिद्ध झाल्या. तसे मराठीत रत्नाकर मतकरी नंतर जी ए कुलकर्णी यांनी सुद्धा अशाच कथा लिहिलेल्या आहेत. त्या आणखी वेगळ्या प्रकारच्या गुढ कथा म्हणून प्रसिद्ध झाल्या. पण मराठीत लिहीलेली सर्वात प्रसिद्ध भयकथा लिहिण्याचा मान हा अजूनही जीए कुलकर्णी यांनाच जातो.

         या पिढीने जे काही लिहिलं आणि ही जी काही परंपरा मागे सोडली ती पुढे नव्या लेखकांनी नेली पाहिजे आणि या नव्या लेखकांमध्ये श्री. अनुप साळगांवकर हे नव्या दमाचे लेखक म्हणून पुढे येत आहेत. श्री. अनुप साळगांवकर यांनी याआधी पण दोन पुस्तके प्रसिद्ध केलेली आहेत आणि आता ते हे भयकथांचे पुस्तक प्रसिद्ध करत आहेत. याआधी अनुपजींनी लहान मुलांसाठी एक पुस्तक प्रसिद्ध केलं होतं आणि दुसरं पुस्तक हे त्यांनी गिरनार पर्वतावर यात्रा केली त्याबद्दल आहे. ते स्वतः खूप मोठे श्री. दत्तभक्त असल्यामुळे त्यांनी अत्यंत प्रासादिक भाषेत हे गिरनार वरचे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांनी लहान मुलांसाठी लिहिलेलं पुस्तक सुद्धा तितकच सुंदर आहे. ते लहान लहान कथांचे पुस्तक आहे आणि त्या अनेक सुंदर छोट्या बोधकथा आहेत. यातूनच अनुप यांचा लेखन विषयक विषयांचा बराच मोठा आवाका दिसून येतो.  अनुपजी यांना हा सर्व ठेवा सर्व लोकांकडे विनामूल्य पोचावा अशी कळकळ आहे, म्हणून त्यांनी पुस्तके ऑनलाइन प्रसिद्ध करण्याचा संकल्प केला आहे. या आधीची दोन्ही पुस्तकं त्यांनी ऑनलाईन प्रसिद्ध केलेली आहेत. हे भयकथांचे पुस्तक सुद्धा ते ऑनलाईन प्रसिद्ध करत आहेत.

मी शास्त्रज्ञ आहे. आणि आम्हाला सुद्धा निसर्गातील, जगातील गुढ आणि अशा बऱ्याच अतर्क्य गोष्टींमागील रहस्य उलगडण्याची फार इच्छा असते. मी ज्या संस्थेत काम करतो तिथेच श्री अनुपजी काम करत असल्यामुळे त्यांचा माझा परिचय झाला आणि त्यांनी मला ही प्रस्तावना लिहायला सांगितली. कदाचित त्यांना असेही वाटले असेल की त्यांना गुढ गोष्टींचा मागोवा घेण्याची आवड आहे तशी आवड आम्हा शास्त्रज्ञांना सुद्धा असते त्यामुळे कदाचित मी या कथा या पुस्तकाबद्दल काही लिहू शकेन असं त्यांना वाटलं असावं. ते काहीही असो, पण अनुपजींच्या कथा वाचकाच्या मनाचा ठाव घेतात असं म्हणायला हरकत नाही.

माणसाच्या आयुष्यात बरेचदा काही वेळा अशा गोष्टी घडतात की ज्याचं उत्तर सध्याच्या विज्ञानाला ज्ञात नाही. अर्थात त्याचा अर्थ असा नाही की, विज्ञानाला त्या गोष्टी कधीच कळणार नाहीत. पण प्रत्येक पिढीमध्ये विज्ञानाचा जेवढा प्रसार आणि प्रगती झालेली आहे त्या अनुषंगाने गेल्यास त्या त्या वेळेला वाटणाऱ्या गुढ आणि अतर्क्य गोष्टी नंतर मानवाला विज्ञानाच्या बळावर समजून चुकलेल्या आहेत. त्यातून समजलेल्या तत्त्वांचा वापर करून मानवाने स्वतःची भौतिक प्रगती पण केलेली आहे. तरीसुद्धा आज पण निसर्गात अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचं आपल्याला किंवा विज्ञानाला अजूनही समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही. त्यामुळेच कदाचित मानवी मनाला अजूनही गुढ गोष्टींचे आकर्षण असतं. त्याच बरोबर ह्या गोष्टी किंवा या गोड कल्पना ह्या बद्दल त्यांच्या मनात एक प्रकारचं भय पण असतं. त्यातूनच अशा कथांचा जन्म झालेला आहे. विशेष म्हणजे अनुपजी हे पण कोकण भागातूनच आलेले आहेत आणि कोकण भाग तर अशा प्रकारच्या गोष्टींचं आगरच आहे. कोकणातील लोकांना भुताखेतांच्या गोष्टी आणि अशा प्रकारच्या भयपूर्ण गोष्टीचं फार आकर्षण आणि त्यांच्याकडे या गोष्टींचा खूप मोठा ठेवा पण आहे. त्यामुळेच अनुपजींच्या कथांमध्ये आपल्याला कोकणातील गावाकडील गोष्टी आणि तिथली माणसं, तिथलं वातावरण आणि तिथल्या निसर्गाच वर्णन सापडत.  या कथा वाचताना अनुपजी आपल्याला त्यांच्या कथेतील पात्रांसोबत संपूर्ण त्या वातावरणात फिरवतात आणि आपल्याला त्या पात्राला आलेल्या अनुभवाचा अनुभव देतात. त्यामुळेच त्यांच्या भयकथा या अतिशय परिणामकारक झालेल्या आहेत.

या पुस्तकातील त्यांची पहिलीच कथा “पिंपळ” ही एका झाडाभोवती गुंफलेली आहे. कोकणातील झाडांना व्यक्तिमत्व असतं ते कसं, ते ही कथा वाचून कळेल. तसंच त्यांची दुसरी कथा ही वाड्यावर आहे. कोकणात करणी करणे हा एक मोठा इतर लोकांना त्रास देण्याचा प्रकार आहे. ह्या कथेत या करणी बद्दल आणि त्या कशा उलट फिरवायच्या त्याबद्दल ही कथा आपल्याला सांगते. ज्यांना कोकणातील ह्या गोष्टींबद्दल माहिती नाही त्यांनाही एक वेगळ्या प्रकारचा अनुभव ही कथा देईल. या नंतरच्या त्यांच्या दोन कथा या “मल्लम्मा” आणि “चेटकी” या नावाच्या आहेत. त्यामध्ये अनुपजींनी कोकणातील गावातील किंवा गावाबाहेरील गूढ ठिकाणावरील देवस्थाने आणि त्या वरची गावाची श्रद्धा आणि त्यातून निर्माण झालेल्या नाट्यावर त्या दोन कथा आहेत. त्यानंतरची त्यांची कथा “घुबड” म्हणून आहे. कोकणात घुबडाला अशुभ मानतात. जरी तो पक्षी निसर्गात तसा निरुपद्रवी आणि आपल्याला फार मदत करणारा असला तरी कोकणातील लोकांना त्या पक्षाबद्दल एक प्रकारची भीती मनात असते. अनुपजी यांनी या भीतीचा उत्तम वापर या कथेमध्ये केलेला आहे. ह्या कथेचा नायक आहे त्याला आलेले अनुभव त्यांनी उत्तम रीतीने या घुबडाच्या एका प्रतिमेशी निगडित केलेले आहेत. त्यातून अतिशय उत्तम अशी भयकथा अनुपजींनी निर्माण केलेली आहे. मला वाटतं की अनुपजी यांनी फार उत्तम प्रकारे या कथा लिहिलेल्या आहेत त्यातून त्यांची प्रतिभा अधिकाधिक फुलत गेलेली आहे आणि ती अशीच अधिकाधिक खुलत जावो आणि त्यांच्या हातून उत्तम उत्तम अशाच प्रकारच्या भयकथा आणि इतरही कथा लिहिल्या जावोत ही माझी त्यांना शुभेच्छा आहे.

मी स्वतः काही लेखक नाही पण वाचक मात्र आहे. अनुपजींनी माझ्यावर एवढा विश्वास ठेवून मला या पुस्तकाची प्रस्तावना लिहायला सांगितली हा मी माझा सन्मान समजतो. त्याच बरोबर त्यांच्या या सुंदर पुस्तकासाठी आणि त्यांच्या या कथांसाठी सुयश चिंतितो. त्यांच्या हातून असंच उत्तम लेखन होत रहावं आणि मराठी साहित्यात एका नव्या दमाच्या लेखकांची भर पडावी आणि अनुपजींच सर्व साहित्य ऑनलाइन लाखो मराठी लोकांनी वाचावं अशी मी देवाकडे प्रार्थना करतो

प्रोफेसर.

श्रीगणेश एस. प्रभू

शास्त्रज्ञ

मुंबई