समोरच्याला आपलसं करतील, असे काही शब्द असतात.
त्या शब्दांनाही कोड पडावं अशी काही माणसं असतात,हे आपलं भाग्य …
जेव्हा ती फक्त आपली असतात …

“तू माझा आहेस  …. आणि  कायम राहशील” हे शब्द … फक्त शब्द नाहीतच ती अमृतवृत्ती आहे.
जी आपल्याला उभं करते, जगवते आणि त्याही पुढे जाऊन वाढवते …
आपल्या आनंदात सहभागी होते, दुःखात आधार देते, जग जिंकायला आत्मविश्वास देते.
हि गोष्ट आपली आहे … आपल्यापैकी प्रत्येकाची आहे.
जाणवत असते … माहित असते …. अगदी अशीच काहीशी घडली असते.
या आधी घडली आहे …  या पुढेही घडणार आहे.
कदाचित… आताही घडत असेल..
गोष्ट आपल्या ध्येयाची …
गोष्ट आपल्या प्रयत्नांची ..
गोष्ट आपल्या यशाची …
गोष्ट आपल्याला लाभलेल्या परीसाची …

आपल्याला ते जग फक्त अनुभवायचं नसतं … ते जिंकायचं असतं….. सिकंदरासारखं
पण, सगळ्यांनाच सगळं जमतं असं नाही ना ….
आयुष्यात बरंच काही करायचं असतं, पण काय करू तेच कळत नसतं
भेटणारा प्रत्येक जण आपापल्या परीने सल्ले देत असतो…. आपण किती ऐकून घ्यायचं … म्हणून आपण दोन्ही कानांवर हात ठेऊन कान बंद करतो, आपला संवादाशी संपर्क तुटतो.
पुढचे सगळे रस्तेही बंद असतात, आशेचे दिवे मंद असतात … आपण डोळे उघडे ठेऊन सुद्धा अंधारात चाचपडत असतो …
जे काही आपल्या हाताला लागेल ते आपल्यासाठी योग्य कि अयोग्य ते ठरवत असतो.
अंतर्मनाला साद घालून काय पडसाद उमटतायत … त्याचे अंदाज बांधत असतो.
दूर कुठेतरी दिसत असतात आपल्याला…..  आपल्याच वयाचे, आपलेच सगे-सोयरे ….
जे भाग्यवान ठरलेले असतात…
जे आधीच यशाच्या प्रकाशझोतात आलेलं असतात… 
तो प्रकाश आपल्या डोळ्यांना सहन होत नाही … म्हणून आपण आता डोळेही गच्च मिटून घेतो.
काय करावं कळत नाही … कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळत नाही.
तितक्यात एक हात पाठीवर पडतो … ” तुझा मार्ग जरा वेगळा असला तरी तो योग्य आहे.”

बस्स …. आपण तडत उठून १८०च्या कोनात मागे फिरतो …. बंद डोळे खाड्कन उघडतो
पण … आपल्याला तो चेहरा दिसत नाही … कारण आपण अजूनही अंधारातच असतो.
त्या आधाराच्या स्पर्शानं शरीरात ऊर्जेचा प्रवाह वाहू लागतो, आता नक्कीच काहीतरी चांगलं घडेल अशी आशा वाढत राहते. आपण निवडलेला मार्ग योग्य आहे, हि सकारात्मकता पायात त्राण देते, पुढे चालायचं बळ देते.
आता आपण फक्त चालायचं ठरवतो. चार पावलं पुढं गेल्यावर अंधार हळू हळू लोप पावतो.
झपझप चालत पुढे सरसावतो, इतक्यात समोर दिसतं ते प्रचंड वादळ
वायुवेगाने पडणारा पाऊस, गदागदा हलणारी झाडं आणि कानाला दडे बसतील, इतका सोसाट्याचा वारा … त्यात पायाखाली तोच आपला अवघड, अवखळ रस्ता. 
हे असं का होतंय ? सगळं कधी संपणार ? आता पुढे कसं जायचं?  हे मनात प्रश्नांचं एक वेगळंच वादळ सुरु असताना, तोच हात …
हो तोच हात .. पाठीवर पडतो … आता तो नुसता पडत नाही …. तो आपल्याला अक्षरशः पुढे ढकलतो .. पुढच्या प्रवासासाठी
“काहीही होत नाही … संकटाना सामोरं जा … तू सुखरूप इच्छित स्थळी पोहोचशील .”हे शब्द पुन्हा पुढे जाण्यासाठी प्रेरित करतात … पुन्हा पुढचा प्रवास उमेदीनं सुरु होतो.
पाऊस अंगावर झेलत, वाऱ्याचे तडाखे सोसत आपण सुस्वरूप बाहेर पडतो.

आता थोडं स्थिर स्थावर होऊ..  म्हणून आपण त्याच रस्त्या शेजारी, एक छोटसं घर बांधतो, संसार थाटतो, उपजीविकेसाठी एक छोटसं दुकान टाकतो,
आपण टाकलेलं दुकान सुरु करण्याचा मुहूर्त ठरतो… नवा दिवस सुरु होतो इतक्यात पहाटे पहाटे आपल दार वाजतं.
पहाटेच्या अंधारात आपण दार उघडतो.  समोर उभी व्यक्ती आपल्याला सामानाची यादी देते … आपण “ग्राहकम सुखाय ” असं म्हणत आपण दुकान उघडायच्या आधीच घरात असलेलं सामान आणून देतो
ती व्यक्ती आपल्याला पैसे देते .. पैसे घेताना आपल्याला त्याच हाताचा स्पर्श जाणवतो … आपण भारावून जातो
हा … हात … हात तोच असतो …
जो सुरुवातीला आधार म्हणून पाठीवर पडतो,
संकटात मार्गदर्शक होतो,
आणि प्रयत्नांना आशिर्वाद देतो.

आता सकाळ झालेली असते, सूर्यही उगवलेला असतो … आपण नजर वर उचलून समोर बघतो.
त्या कोवळ्या सूर्य प्रकाशात आपल्याला आपल्या समोरच्या व्यक्तीचा चेहराही स्पष्ट दिसतो … आणि तो पाहून आपल्या चेहऱ्यावरची आडवी रेघ रुंदावते, आपण मनोमन सुखावतो.
तो पाठीवर पडणारा हात आधारासाठी, प्रोत्साहनासाठी वेळीच धपाट्यांसाठी का असेनात
तो हात तुझा आहे … तो चेहराही तुझाच आहे. तुझं  बोट धरून मी आज खंबीर उभा आहे.
मी आजन्म ऋणी आहे तुझा  … तू केलेल्या मार्गदर्शनाचा
हे सगळे शब्द असले तरीही त्यामागची भावना एकच आहे …  

हे ऋणानुबंध असेच कायम राहावे, आणि पापणी उघडता प्रत्येक क्षणी समोर तू असावे.

तुझे विचार…. तुझी शिकवण….. तुझी प्रेरणा….. तुझा विश्वास आणि त्याही पलीकडे जाऊन तू दिलेलं प्रेम….. या साऱ्याने माझं अवघ आयुष्य समृद्ध झालंय … संपन्न झालंय.
आणि….

आयुष्याला परीस स्पर्श झाला…
प्रयत्नांच्या वावटळीत, शब्द तुझे बरसून गेले
सारे जीवनच माझे बहरून आले
लोखंडासारखे आयुष्य माझे 
तुझ्या परीस स्पर्शाने सोने झाले

कृष्णार्पणमस्तू