एका खेडेगावात एक गरीब शेतकरी राहात होता. आपल्या छोटेखानी शेतात तो खूप कष्ट करून भाजीपाला पिकवायचा. रोज पहाटे उठून शेतीची सगळी कामं करून जी काही भाजी तयार होईल त्यातली थोडी कुटूंबासाठी ठेऊन उरलेली सगळी भाजी आठवड्यातून एकदा आठवडी बाजारात नेऊन विकायचा. भाजी विकून जी काही मिळकत येईल त्यावर इतर किरकोळ खर्च चालवायचा.  घर आणि शेत या व्यतिरिक्त त्याला काहीच सुचत नसे. शेतात पिकवलेली भाजी आठवडी बाजारात नेऊन विकण्यासाठी शेतकऱ्याला खूप कष्ट पडत. आपलं काम थोडं सोपं व्हावं म्हणून त्याने थोडे पैसे जमा करून आठवडी बाजारातूनच एक गाढव विकत घेतलं. शेतकरी गाढवाची सर्वतोपरी काळजी घ्यायचा, त्याला वेळेवर अन्न पाणी द्यायचा आणि आठवड्यातून एकदाच पिकवलेली सगळी भाजी गाढवावर लादून बाजाराला जायचा.  गाढव फार धूर्त होतं. त्याला कामाचा प्रचंड तिटकारा होता. नुसतं पडून राहायचं आणि खाऊन पिऊन टम्म झोपी जायचं, असा त्याचा दिनक्रम होता.         

शेतकरी आठवडी बाजारात जात असताना गाढवाच्या पाठीवर दोन्ही बाजूस सामान भाजी लादत असे, जेणे करून गाढवाला चालणे सोईचे होईल आणि भाजी न सांडता सुखरूप बाजारात पोहचेल. चालताना शेतकरी पुढे आणि गाढव मागे चालत असे. वाटेत शेतकऱ्याची नजर चुकवून गाढव  आळी -पाळीने बाजारात जाईपर्यंत दोन्ही बाजूची भाजी थोडी थोडी खात असे जेणेकरून पाठीवरचे वजन कमी होईल. गाढवाच्या या अप्रामाणिकपणामुळे दरवेळी बाजारात भाजी कमी भरत असे आणि शेतकऱ्याला कमी नफा होत असे. तुटपुंज्या मिळकतीत घर चालवणे शेत पिकवणे आणि गाढवाची  देखभाल करणे शेतकऱ्याला कठीण होऊन बसले. घरून वजन करून भरलेली भाजी बाजारात जाईपर्यंत कमी कशी होते याची चिंता शेतकऱ्याला दिवस-रात्र सतावत होती. सगळं विचाराअंती त्याला एक युक्ती  सुचली.      

एकदा बाजारात जाताना शेतकऱ्याने गाढवाच्या एका बाजूला भाजीचे गाठोडे आणि दुसऱ्या बाजूला तेवढ्याच वजनाचा पाण्याने भरलेला घडा बांधला. नेहमीप्रमाणे शेतकरी पुढे आणि गाढव मागे चालत होते. वाटेतून चालताना गाढवाने धूर्तपणे एका बाजूची भाजी खायला सुरुवात केली खरी पण त्याला दुसऱ्या बाजूला बांधलेल्या घड्यातले पाणी काही पिता येईना. जसजसे भाजीचे गाठोडे कमी होत गेले आणि घड्यातल्या पाण्याच्या वजनाने घडा एकाएकी जमिनीवर पडून फुटला. फुटलेला घडा पाहून शेतकऱ्याला गाढवाचा धुर्तपणा समजला. शेतकऱ्याने तसाच त्या गाढवाला आठवडी बाजारात नेऊन चढ्या किमतीत विकून टाकले. मिळालेल्या नफ्यातून शेतकऱ्याने स्वतःसाठी, बाजारात भाजी नेण्यासाठी, मुलांना शाळेत सोडण्यासाठी एक सायकल घेतली. एका सायकलीमुळे शेतकऱ्याचे सगळे काम सोपे झाले. इकडे मात्र गाढवाच्या नव्या मालकाने गाढवावर प्रमाणापेक्षा जास्त ओझी लादायला सुरुवात केली. ओझी वाहता- वाहता गाढवाची पाठ मोडून निघाली आणि त्याला आपली चूक समजली.     

म्हणूनच मित्रहो, आपले काम प्रामाणिकपणे करा. थोडा वेळ लागला तरीही चालेल, पण काम अचूक पूर्ण करा. आपण केलेल्या चांगल्या कामाचा आपल्याला आणि इतरांनाही फायदाच होत असतो.     

शुभं भवतू ….. कृष्णार्पणमस्तु    

©™ श्री. अनुप साळगांवकर- दादर, मुंबई