उन्हाळ्यची सुट्टी संपून नुकतीच आराधनाची शाळा चालू झाली होती. वडिलांची नोकरी फिरतीची असल्यामुळे सतत दोन-तीन वर्षांनी तिची शाळा बदलायची. नवी जागा, नवे घर, नवीन शाळा , नवे वर्ग, नव्या बाई, मित्र-मैत्रिणी सुद्धा नवे, सगळेच नवे चेहरे पाहून ती नेहमीच गोंधळून जायची. लहानपणापासूनच तशी ती फार हुशार आणि चाणाक्ष होती, पण सततच्या या बदलामुळे स्वभावाने थोडी मितभाषी आणि बुजरी झाली होती. इतक्या लवकर नव्या शाळेत कुणी जिवलग मैत्रिणी नाहीत, घरी आलेल्या कुणा नातेवाईकांशी बोलणे नाही की, आपलेपणाने कुणा मित्रांकडे खेळायला ही जाणे नाही. ती, तिची आई आणि वडील आणि शाळा एवढंच तीच विश्व, त्यामुळे तिच्या आईला तिची खूप काळजी वाटायची. आईने एकदा हि काळजी शाळेतल्या बाईंना बोलून दाखवली. बाई खूपच समजूतदार होत्या, मुलांची मने ओळखण्यात तरबेज होत्या. त्यांनी आईला थोडा वेळ द्या, सगळं सुरळीत होईल, असं आश्वासन दिलं.
बाईंना आराधनाची अडचण चांगलीच समजली होती त्यामुळे त्या तिच्या कडे अधिक लक्ष देत होत्या. नव्या शाळेत शिकता शिकता त्या शाळेच्या बाई तिला फार आवडू लागल्या.

बाईंची शिकवणी आराधना लक्षपूर्वक ऐकत असे, आत्मसाद करत असे. बाईंच्या सांगण्यावरून सगळ्या क्रीडा आणि कला स्पर्धेत सहभागी होत असे. असाच एकदा शाळेत आषाढी एकादशी निमित्त वृक्ष रोपणाचा कार्यक्रम होता. सगळ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारात एक छानसं  झाड लावण्याची संधी मिळणार होती
आराधना निसर्गदत्त असल्यामुळे तिला झाडे, वेली, रंगीबेरंगी फुले याच फार आकर्षण होत. घरातल्या वडिलांनी फुलवलेल्या छोटेखानी बागेत तासन-तास त्या फुलं पानांत रमायची, फुललेल्या लहान मोठ्या फुलांकडे बघून आनंदून जायची, स्वतःहून एखाद्या नवीन फुलाबद्दल आईकडून माहिती मिळवायची, एकूणच निसर्गाचा मनमुराद आनंद घ्यायची.
वृक्षारोपणाच्या दिवशी तिच्या हातात  बाईंने पानफुटीचं झाड दिलं, जे तिने या पूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. ते झाड पाहून तिला खूप आनंद झाला. किती वेगळं आणि नावीन्य पूर्ण झाड होत ते. त्या झाडाबद्दल अधिक माहिती मिळवण्याच्या उत्कंठेने तिने बाईंना अनेक प्रश्न विचारले बाईंनेहि साऱ्या प्रश्नांची तिला उत्तरे दिली आणि म्हणाल्या, “पानफुटीचं झाड हे वेगळं आहे … याला खोड नसतं … पानाला पानं येतात आणि हे झाड वाढत… जितकं वेगळं तितकंच औषधी ….. आयुर्वेदात याचा उपयोग होतो. आणि बरं का आराधना … प्रत्येक झाड, त्या झाडाचं प्रत्येक पान हे वेगळं आहे.  प्रत्येकाला आपला आकार आहे, रंग आहे, गंध आहे. आता या पानफुटीच्या झाडाचं पान एकमेकाला लागून उगवतं, परस्परांना आधार देतं. आपल्या वर्गातल्या मित्र मैत्रिणींच, आजूबाजूच्या लोकांचंही असंच असतं प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, प्रत्येकाला आपला स्वभाव आहे. आपण सगळ्याशी मैत्री केली पाहिजे, सगळ्यांना आपलसं करून घेतलं पाहिजे. “
आराधनाच्या मनावर बाईंच्या शब्दांची अशी काही जादू झाली, लवकरच तिने वर्ष संपायच्या आत सगळ्यांची मैत्री केली आणि जेव्हा तिने वार्षिक परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला तेव्हा तीच कौतुक करायलाही सगळ्या वर्गाने टाळ्यांच्या गजरात तीच अभिनंदन केलं.
म्हणूनच मित्रहो सगळ्यांशी मैत्री करा, प्रेमाने वागा, आदराने बोला, सगळ्यांना आपलसं करा आणि आयुष्य सोपं करा.

पानफुटी