उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ऋतू कोणताही असो, अर्णवला निसर्ग खूप आवडायचा. अगदी लहान असल्यापासूनच घरच्या छोटेखानी बागेत त्याचा वेळ खूप छान जायचा. तो फुला- पानांमध्ये तासनतास रमायचा. फुलांच्या नवनवीन रंगांचं त्याला फार आकर्षण. नानाविध फुलं, त्यांचे सुगंध या साऱ्यांचच त्याला फार अप्रूप वाटायचं. पहाटे पहाटे कधी मातीच उकर, कधी सगळ्या झाडांना पाणी दे, लहान रोपट्याचा कुंड्या उन्हात नेऊन ठेव , एक ना अनेक कामं …. स्वतःहून करायचा. आजोबांसोबत बागकाम करण्यात त्याला खूप मज्जा यायची.  आजोबांनी मात्र त्यासाठी बागकामाची पहाटेची वेळ ठरवून ठेवली होती. ते सोबत असले कि, बागकाम करताना त्याला दिवस पुरायचा नाही. आजोबा आणि त्याची एक टीमच तयार झाली होती. तशीच बागेतल्या सगळ्या झाडांशीही त्याची छान गट्टीच जमली होती. प्रत्येक झाडाची बारीकसारीक सगळी माहिती त्याला पाहिजेच असायची. हातातली कामं करता करता आजोबांना, हे झाड कसलं … ?? त्या झाडाचा काय उपयोग …. ?? हे असंच का …?? ते तसंच का …??असे अनेक प्रश्न सारखा विचारात राहायचा. आजोबाही ज्ञानी होते. त्यामुळे ते ही संयम ठेऊन त्याच्या प्रश्नांची जमेल तशी उत्तरं द्यायचे. त्या सोबत झाडांपाठी लपून लपाछपी खेळायचे. सतत झाडांबद्दल एक गोष्ट सांगायचे, “आपण झाडांना सांभाळले कि झाडेही आपल्याला सांभाळतात.” अर्णवने आजोबांकडून अशीच अगदी सहज खेळता खेळता अनेक झाडांची त्यांच्यातल्या औषधी गुणधर्माची माहिती मिळवली.   दिवस खूप छान आणि मजेत जात होते. अचानक एके दिवशी पहाटे बागकामाची वेळ झाली आणि आजोबा झोपेतून उठलेच नाहीत. अर्णवने दिवाणखान्यात त्यांच्या जवळ जाऊन पहिले तर त्यांचे अंग तापाने फणफणले होते. आजोबांची तब्बेत एका रात्रीत अचानक बिघडली होती. त्यांना थंडीही वाजत होती. अर्णवने प्रसंगावधान राखत घरच्या खिडक्या बंद केल्या. जेणे करून खूप वारा घरात येणार नाही. आजोबांच्या अंगावर शाल पांघरली. डॉक्टर काकांना फोन केला. तेवढ्यात त्याला आजोबांचे शब्द आठवले “आपण झाडांना सांभाळले कि झाडेही आपल्याला सांभाळतात.” अर्णवने लागलीच बागेत जाऊन चार तुळशीची पाने, गवती चहाची पाने,अढूळस्याची  पाने तोडून आणली आणि छान गूळ  घालून काढा तयार केला. आजोबांना दिला. तो पिऊन आजोबाना जरा बरे वाटले. तो पर्यंत डॉक्टर आलेच त्यांनी तपासले काही छोटी मोठी औषधे लिहून दिली. अर्णवने औषधांसोबत बागेतल्या पानांचा काढा सकाळ संध्याकाळ चालू ठेवला. अर्णवने केलेल्या शुश्रृषेने आजोबांना लवकर गुण आला. आजोबा दोन दिवसात अगदी ठणठणीत बरे झाले. आजोबांना पाहून अर्णवही सुखावला. दुसऱ्याच दिवशी पुन्हा एकदा आजोबांची आणि अर्णवची पहाटे बागेत भेट झाली आणि नव्या जोमाने पुन्हा बागकामाला सुरुवात झाली.
म्हणूनच मित्रहो, आपल्या परिसरात अनेक झाडे आहेत. त्यांची माहिती गोळा करा. त्यांना खतपाणी द्या. त्यांची काळजी घ्या. त्या झाडांनी गोड फळं दिली नाहीत तरी ती तुम्हाला सावली मात्र नक्कीच देतील आणि आजोबांचे शब्द लक्षात ठेवा, “आपण झाडांना सांभाळले कि  झाडेही आपल्याला सांभाळतात.”