दूर आभाळाच्या देशात परीस्थानात अनेक सुंदर प-या राहत होत्या. सगळ्याच अगदी सुंदर, प्रसन्न आणि सदैव आनंदी. 
या सगळ्यांत आपलं वेगळेपण जपत होती, ती सोनेरी केसांची परी. सगळ्यांची आवडती आणि सगळ्यांचीच लाडकी. पांढरा शुभ्र पायघोळ झगा, गुलाबी गाल, लाल चुटूक ओठ, डोक्यावर नाजूक असा सुवर्ण मुकूट आणि कुणालाही मोहून टाकतील असे लांबसडक, मोकळे सोनेरी पायघोळ केस. 
अप्रतिम शरीर सौंदर्य आणि सगळ्यांना आपलसं करेल असा उत्तम स्वभाव म्हणूनच ती सगळ्यांत वेगळी असली तरी सगळ्यांची लाडकी.  एके दिवशी आकाशी सगळ्या प-या एकत्र मिळून वा-यासोबत लपंडाव खेळत असतात. सगळ्याच उत्साही. वारा आपल्याला शोधून काढणार म्हटल्यावर अनेक प-या स्वतः भोवती काळे-पांढरे ढग गुंडाळून त्यात पटापट लपून बसतात.
वारा साऱ्या पऱ्यांचा शोध घेण्यासाठी सैरा वैरा पळत सुटतो. सोनेरी केसांची परीही सगळ्याच पटदिशी लपल्या म्हटल्यावर एका क्षणाचाही विलंब न करता एका मोठाल्या ढगात उडी मारते आणि स्वतःला लागलीच लपवून घेते.
थोड्या वेळाने सोनेरी परी ज्या ढगात लपून बसलीय त्य ढगात हळू हळू पाणी शिरू लागते आणि तो ढग पाण्याने जड होऊ लागतो. एकटी सोनेरी परी फार गोंधळून जाते.  तिला काही सुचतच नाही. बिचारी त्या ढगातून बाहेर पडण्याचा आटोकाट प्रयत्न करते पण तिला मार्गच सापडत नाही.
प-यांचा शोध घेणारी वा-याची एक जोरदार थंड झुळूक येते आणि ढगात साठलेले पाणी थेंब बनून धरतीवर झेप घेते.
एका मोठाल्या थेंबात अडकून सोनेरी परीही प्रचंड वेगाने जमिनीकडे झेपावते.
तो थेंब टपकन निळ्याशार समुद्रात पडतो. इतका भलामोठ्ठा तो विशाल समुद्र, त्यातले ते लहान मोठे सागरी जीव या सा-याला घाबरून,
या सगळ्यांपासून स्वतःचा जीव वाचवत सोनेरी परी जीवाला घाबरुन एका शिंपल्यात जाऊन बसते. हळूहळू तो शिंपला आपले तोंड बंद करतो आणि परी त्यात कायमची अडकून पडते. या शिंपल्यातून आता आपण काही बाहेर पडत नाही, हे तिला कळते. बिचारी खूप काळजीत पडते.
आपण अडकून पडलोय या दु:खापेक्षा आपलं सौंदर्य अबाधित राहावं म्हणून मनोमन देवाकडे प्रार्थना करते. मनापासून केलेली प्रार्थना ही देवापर्यंत पोहोचतेच.
अनेक वर्ष उलटून जातात आणि एके दिवशी तो शिंपला आपले तोंड उघडतो तेव्हा अडकून पडलेल्या त्या सोनेरी परीचा शिंपल्यात एक सुंदरसा मोती झालेला असतो.
आजही समुद्रतळाशी अनेक लहान मोठे शिंपल्यात मोती सापडतात. स्वतःच्या अपरिमित सौंदर्याने आपल्याला मोहात पाडतात. 
म्हणूनच मित्रांनो, सृष्टी सौंदर्याने जे आपल्याला मिळेल ते आपण अगदी मनापासून जपायला हवं. ते सौंदर्य देणाऱ्या देवाचेही मनोमन आभार मानले पाहीजेत म्हणजे जे मिळालंय त्याचा गर्व होणार नाही.