धर्मो रक्षति रक्षितः
धर्माचं रक्षण करणाऱ्याचं रक्षण धर्म करतो.
ग्रीसच्या एका वाचनालयात पुस्तकातून प्रो. रघुनाथ राव, जे पुरातत्व विभागात संशोधक आहेत, ते भगवान श्री कृष्णाच्या रत्नजडित, सोन्याच्या कृष्णवळ्याच्या शोधात काही संदर्भ चोरतात आणि भारतात परतात.
द्वारकेच्या एका अरण्यात श्री कृष्ण एका उंच अशा झाडावर बासरी वाजवत आहे.
बासरीच्या प्रत्येक सुरांत न्हाऊन निघणारी सृष्टी, नवचैतन्यात आकंठ बूडाली असताना, पारधी एका पक्षाचा वेध घेतो, पक्षी हूलकावणी देतो आणि तोच बाण कृष्णाच्या उजव्या पायाच्या अंगठ्याचा वेध घेतो.
श्री कृष्णाच्या मानव अवताराची सांगता होते आणि तक्षणी समुद्रात स्थित व्दारकेचा पाण्यात लय होतो.
भागवत पुराणानुसार ५,००० वर्षांपूर्वी श्री विष्णूंच्या आठव्या, श्री कृष्ण या अवताराची समाप्ती आणि द्वारका समुद्राधीन होणं या गोष्टीने चित्रपटाची सुरुवात होते.
हा अवतार संपणार आणि द्वारका बुडणार हे विधिलिखित ठरलेलं असलं तरीही येणाऱ्या कलियुगात मोठ्या महामारी पासून लोकांचं रक्षण करण्यासाठी श्री कृष्ण, उद्धवाला (कृष्णसखा) ज्ञानाचा उपदेश करतात आणि पायातलं एक कृष्णवळ जपून ठेवण्याची सूचना करतात.
उद्धवने जपून ठेवण्यासाठी, लपवून ठेवलेलं ते कृष्णवळे, त्या शोधण्यासाठी पुरातन काळापासून चांगल्या आणि वाईट शक्तींचा आणि व्यक्तींचा शोध, हा या चित्रपटाचा मुख्य विषय आहे.
सुरुवातीपासून शोधकथा कुठेही रेंगाळत नाही, कंटाळवाणी वाटत नाही. कृष्ण आणि त्याचं रत्नजडित कृष्णवळ्याच्या शोधात पुढे जात राहते, याचं एकमेव कारणच “कृष्ण ” आहे. सर्वार्थाने पूर्णावतार असणारा कृष्ण हा शक्ती, बुद्धी आणि युक्ती यांचा त्रिवेणी संगम आहे.
एका रहस्याने सुरु झालेला हा चित्रपट, अगदी शेवट पर्यंत ती उत्कंठा वाढवत रहातो, ती उत्कंठा टिकून ठेवणं हे दिग्दर्शकाचं यश आहे.
दिग्दर्शक हेच चित्रपटाचे लेखक सुद्धा असल्याने, आपल्याला नक्की काय पोहोचवायचं आहे, हे त्यांना बरोबर माहित आहे. चित्रपटाची मांडणी खूपच रंजक आहे. नायकासोबत आपलाही रहस्यमयी प्रवास सुरु होत. प्रेक्षक खुर्चीशी बांधला जातो, आपल्याकडे सतत पिनपॉईंट करणारा मोबाईल आहे याचाही विसर पडतो.
पुराणकथा आणि इतिहास यातला फरक अगदी मुद्देसूद मांडला आहे. भारतीय पुराणकथा या फक्त दंतकथा नाहीत तर त्या बद्दल संशोधन होऊन अनेक पुरावेही सापडले आहेत.
भारतीय पुराणकथा ह्या सत्य कथा आहेत. त्यातूनच पूर्णावतार असलेल्या प्रेमाचा संदेश देणाऱ्या श्री कृष्णाच्या अवताराची गोष्ट सिद्ध होते.
चित्रपटाची सगळ्यात महत्वाची आणि जमेची बाजू ही, कृष्ण कथा आहे. कथेसाठी दृष्य वापरण्यात आलेलं ऍनिमेशन अफलातून आहे.
कल्पनाशक्तीचा पुरेपूर वापर करून Visualize Effect तर्कशुद्ध वापरले आहेत त्यामुळे आपण पडद्यावर कार्टून बघत आहोत असं अजिबात वाटत नाही. द्वापारयुग चित्रातून जिवंत होतं आणि आपण कृष्णाशी समरस होतो.
चलचित्रनिर्माण कला ( Cinematography) अतिशय उत्तम आहे. वर्तमानातून भूतकाळात जाताना वापरण्यात येणारी रंगसंगती, चित्रकथा, पार्श्वसंगीत आपल्याला या दोन्ही काळाशी समांतर ठेवतात.
सेट छोटे असले तरीही खूप विचार करून, अत्यंत प्रभावी बनवले आहेत. “तमसो मा ज्योतिर्गमय” अंधार आणि प्रकाशाचा वापर प्रभावी केला आहे. एक -एक फ्रेम अगदी कथानुरूप गोष्टीसाठी पूरक वापरण्यात आली आहे.
चित्रपटाचं संगीत Kaala Bhairava (Music Director) यांनी खूपच सुंदर दिलंय. एका रहस्याच्या शोधात, जो काही प्रवास होतो संगीत त्या प्रवासाचा अजिबात कंटाळा येऊ देत नाही.
चित्रपटाची गाणीही अगदी मोजकीच म्हणजे दोन आहेत. ती अगदी बॅकग्राऊंडला वाजत राहतात. प्रवासाचा आनंद द्विगुणित करतात.
नायक आणि नायिका एकही आयटम सॉंग करत नाहीत, उगाच एकमेकांना मिठ्या मारत नाहीत, प्रेमाचे नको ते चाळे करत नाहीत. त्यामुळेच चित्रपट कथेला कुठेही Speed Break लागत नाही.
सगळ्यात महत्वाचा मुद्द्दा चित्रपटाचं बजेट फक्त २५-३० करोड एवढंच आहे. आजच्या बॉलीवूड चित्रपटांचं बजेट हे १००-३०० करोड पर्यंत पोहोचलेलं असताना, इतक्या कमी बजेटमध्ये उत्कृष्ट चित्रपट बनवता येतो हे Chandoo Mondeti (दिग्दर्शक) आणि Abhishek Agarwal Arts People Media Factory ( Production ) यांनी पटवून दिल आहे.
कृष्णवळ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास हा सोपा नाही. सुगावा लागण्यासाठी सुरुवाती पासूनच काही छोटे शोध लागत जातात आणि आता पुढे काय? याची उत्कंठा वाढवत राहतात.
नायक ( Nikhil Siddhartha ) हा अतिशय उत्सुक स्वभावाचा आहे. दिसणाऱ्या परिणामांची कारणं आहेत आणि ती शोधून काढली पाहिजेत, यावर त्याचा विश्वास आहे. सुरुवातीला दिसणाऱ्या प्रो. राव यांची नात ( Anupama Parameswaran) ही या प्रवासात नायकाला प्रामाणिक मदत करते. द्वारकेपासून सुरु झालेला हा प्रवास पुढे कृष्ण जन्मभूमी मथुरा, कृष्ण तपोभूमी चंद्रशिला असा करत कैलासा पर्यंत पोहोचतो. प्रवासाचा नकाशा दाखवण्यासाठी सप्तर्षी ताऱ्यांचा करण्यात आलेला उपयोग वाखडण्याजोगा आहे. कृष्णाशी निगडित स्थळं गोवर्धन पर्वत, कृष्ण तलाव, बेट द्वारका, भौगोलिक गोष्टी यांचा पुरेपूर उपयोग करून घेतला आहे. मंत्रशक्ती, हृदयाची गती आणि श्वास यांचा मनशक्तीसाठी वापर आपण किती चांगल्या प्रकारे करू शकतो यावर विश्वास ठेवायला हा चित्रपट भाग पाडतो.
चित्रपटात अभिरा नावाची एक हिंसक जमात दाखवण्यात आली आहे. कृष्णाची संबंधित कोणत्याही वस्तुधारकाला ती जमात जीवे मारते. हिंसक असूनसुद्धा त्यांचंही कृष्णावर निरतिशय प्रेम आहे. माणूस चांगला-वाईट कसाही असो, तो कृष्ण आणि त्याने दिलेलं उपदेश यांच्या अजूनही प्रेमात आहे, हे दाखवण्यासाठी या जमातीचा केलेला वापर अधोरेखित झाला आहे.
“सत्कर्म करणाऱ्यालाच निसर्ग सहकार्य करतो.” “चमत्कार आहेत म्हणून देव आहे असं नाही, देव आहे म्हणून चमत्कार आहेत.” “देव ही कुणी शक्ती नाही ती व्यक्ती आहे.” “आपण कुणाची निवड करत नाही, प्रकृती आपली निवड करते.” असे देव किंवा निसर्गशक्ती यांचे समर्थन करणारे मोजकेच पण लक्षात राहणारे संवाद आहेत.
रत्नजडित सोन्याच्या कृष्णवळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी दोन सुगावे (Clue) आहेत. पहिल्या सुगाव्यासाठी नंदीबैलाचा करण्यात आलेला वापर अंगावर शहारे आणतो. त्यापुढे जाऊन दुसऱ्या सुगाव्यासाठी करण्यात आलेला प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेचा आणि सूर्य ऊर्जेचा वापर आपल्याला विज्ञानाशी बांधून ठेवतो. दोन्ही सुगाव्यांच्या शोधात ज्ञान, अध्यात्म आणि विज्ञान यांची सुरेख सांगड घातलेली दिसते.
चित्रपटाला एक महत्वाचा सीन Dr. Dhanvanthri Vedpathak ( Anupam Kher) नायकाला मार्गदर्शन करतात. डॉ. धन्वंतरी नायकाला समजावून सांगतात कि, देवाचा अंश जरी असला तरीही कृष्ण ही मानवी देह धारण केलेली या ग्रहावर जन्मलेली आणि वाढलेली व्यक्ती आहे, ज्याने जन्मतः विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली. धर्माला अनुसरून आयुष्य किती सुंदर पद्धतीने जगता येऊ शकतं हे एका आंधळ्या शास्त्रज्ञाने दृष्टी देण्याचं केलेलं काम अनुपम खेर यांनी खूपच कमी वेळात उत्कृष्ट केलं आहे. पूर्णावतार असणाऱ्या श्री कृष्णाला देव म्हणून न पाहता माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून बघा हा संदेश देताना खेर यांच्या तोंडी जे काही संवाद आहेत ते संवाद आपल्याला कृष्णाच्या आणखीन जवळ घेऊन जातात आणि प्रत्येक संवादाबरोबर कृष्ण चित्रांची उघडणारी फ्रेम बघणं हे दिव्य दृष्टी मिळाल्यासारखंच आहे.
प्रत्येक कलाकाराने आपली भूमिका अगदी चोख केली आहे. अजून एक महत्वाचा मुद्दा इकडे नमूद करावासा वाटतो, तो म्हणजे हिंदू कथेसाठी करण्यात आलेला एका मुसलमान पत्राचा प्रवेश. कोणत्याची वादात, किंवा धर्मबंधनात न अडकता एख्याद्या पात्राला पुरेपूर न्याय देऊन ते पात्र जिवंत करून, प्रेक्षकांच्या पसंतीस आणण हे शिवधनुष्य लेखक आणि लेखक असणाऱ्या दिग्दर्शकाने लीलया पेललं आहे.
चित्रपटाच्या शेवटी श्री कृष्णाचं अस्थित्व आणि देवत्व फक्त अरबी समुद्रापर्यंत मर्यादित नसून ते अटलांटिक महासागर आणि इतरही देशांमध्ये पोहोचलं आहे हे दाखवण्यासाठी नायकाला विदेशात एक चावी सापडते आणि रहस्याने बंद असलेला एक दरवाजा दूर कुठेतरी समुद्रात आहे असं दिसतं . … म्हणजे या चित्रपटाचा पुढील भागही अपेक्षित आहे.
कृष्णवळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुरु झालेला हा प्रवास सफळ होतो कि नाही ? त्यासाठी नायकाला अजून किती संघर्ष करावा लागतो ? बुद्धी आणि उत्सुकता माणसाला कशा घडवतात ? कृष्णकथा ह्या पुराणकथा आहेत कि इतिहास ? पाण्याखाली बुडालेल्या द्वारकेत अजून किती रहस्य बुडीत आहेत ?
या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधायला “कार्तिकेया २” ( IMDb Rating 8.9/10) हा तेलगू भाषेत प्रदर्शित (हिंदी अनुवादित) चित्रपट एकदा पाहायलाच हवा.
शुभं भवतू …
कल्याणमस्तू
श्री. अनुप साळगांवकर
Director: Chandoo Mondeti
Distributed by: Zee Studios
Cinematography: Karthik Gattamneni
Language: Telugu, HINDI
Music director: Kala Bhairava
December 2, 2024 at 10:22 am
Awaiting moderation
eriacta muscle – eriacta subtle forzest sparkler