“आबा, आव यंदा इठ्ठलाला भेटाया जायचं कि नाय ….???” छोट्या कृष्णाने प्रश्न विचारला.
शेतीच्या कामात एकाएकी कृष्णाचा प्रश्न ऐकून आबाचा चेहराच मावळला, कामाची रयाच गेली ….
“बगू…” म्हणत कृष्णाकडे पाठ फिरवून आबा वितभर पाण्यात भात लावू लागला.
डोक्यात तेच मागल्या संचारबंदिचे विचार. मागल्या टायमाला लेकाला समजावणं कठीण झाल्तं. आता काय उत्तर देनार. “पांडुरंगा तूच बघ यंदाचं काय ते…. एकादशी तोंडावर आलीया.” असं म्हणून हातातलं रोप जमिनीला चिटकवणार एवढ्यात कृष्णा चिखल तुडवत आबाच्या पायात घोळत धोतर धरून उभा राहिला
“सांग ना रं….,वारीला न्हेणारं नवं ….”
“आर्रर्रssss पांडुरंगचं येतूय बघ यंदा तुला भेटाया….. ” आबा पटदिशी बोलून गेला. 
कृष्णाने चटकन धोतर सोडलं, त्याचा चेहरा फुलला “राम कृष्ण हरी ….. राम कृष्ण हरी … ” म्हणत चिखल तुडवत नाचत राहिला. त्याचा आबा त्याच्याकडं पाहतच राहयला. या एवढ्याशा जीवाला काय त्या वारीचं नि इठ्ठलाचं वेड. त्या पांडुरंगानं आजवर सांभाळलं तोच घेईल बघून…. यंदाचं काय ते….. आबानं  सगळा भार पांडुरंगावर टाकला आणि निश्चिंत झाला.
कृष्णाचा जन्मच एकादशीचा. पांडुरंग पावला म्हणून घरभर त्याच्या आजानं लई कालवा केल्तां. गावभर साखर वाटतं फिरला होता. लहानपानापासनं कृष्णाला खांद्यावर घेऊन आजा दरवर्षी वारीला जायचा. इठ्ठलाच्या पायी डोकं टेकून यायचा, कृष्णाला पांडूरंगाच्या पायावर घालायचा, नाहीचं डोकं टेकता आलं तर कळसाला लोटांगण घालून माघारी फिरायचा. वर्षभर “राम कृष्ण हरी ….. राम कृष्ण हरी …” म्हणत आनंदानं जगायचा. ते टाळ-मृदूंग, ती भजनं, ते रिंगण, ती भगवी पताका, तो जयघोष सगळं सगळंच कृष्णाच्या मनावर लहानपनापासनं कोरलं गेलं. मागल्या टायमाला ते काय संचारबंदी झाली त्या कारनानं वारी हुकली. लई जिव्हारी लागलं म्हाताऱ्याच्या. समद्यांनी लई समजावलं…. पण काय उपयोग झाला न्हाय. त्यात त्या कोरोनान पछाडलं. “राम कृष्ण हरी ….. राम कृष्ण हरी …” म्हणतचं डोळे मिटले. जाताना कृष्णाच्या डोक्यावर हात ठेवून डोळ्यात वारी आणि हृदयात पांडुरंग ठेऊन गेला. तेव्हापासनं कृष्णा  “राम कृष्ण हरी ….. राम कृष्ण हरी …” म्हणतोय.
यंदा न्याया आजा न्हाय तरी डोस्क्यात वारी आणि इठ्ठलं हेच एकच खूळ……

आज एकादशी ……
पहाटे उठल्या पासून कृष्णाचं वारीचं टुमनं सुरु…. “आबा आवरा…. आपल्याला जायचं नं वारीत…. पाडुरंग काय येत नाय बा…..आपणच जाऊ ” आबा कृष्णाला घेऊन वारीला सांगून शेताकडे निघाला. चालता चालता सकाळची कोवळी उन्ह सारून अर्ध्या वाटेतच आभाळ एकीकी भरून आलं. काळाकुट्ट अंधार पसरला. गार हवा अंगावर शहारा देऊन गेली. विजांच्या कडकडाटाने आबाचा जीव कृष्णाच्या काळजीपोटी कासावीस झाला. हातातली शेतीची हत्यारं तशीच टाकत. पाऊस कोसळण्याआधी त्याने कृष्णाला कडेवर घेतलं आणि माघारी फिरला. झाप झाप घराकडची वाट चालू लागला. चालताना वाटेतच पावसानं गाठलंच.  हा जोरदार पाऊस. दिवसापन रातीचा प्रहर. पुढचं काय बी दिसेना. आषाढातला एकादशीचा पाऊस म्हणजे उधाणच. पाऊस काही थांबण्यातला नव्हता. आबाला काय करावं सुचेना. त्यात “वारीला जायचं …. ” म्हणतं पावसागत कृष्णाची कानाकडं तीच रिपरिप …. पायवाटा पाण्यात बुडू लागल्या. हळूहळू वाट काढत घरच्या रस्त्याला लागला.
आबासोबत कडेवरचा कृष्णा पार भिजून गेला होता. त्याच्या डोक्यावर कोसळणारा पाऊस पार पायावरुन निथळत होता. चालता चालता आबानं एका झोपडीवजा छताचा आधार घेतला. कृष्णाला घेऊन आबा एका आडोश्याला उभा राहिला. झोपडीच दार उघडंच  होतं. पोराला खाली उतरवून त्यानं त्या झोपडीत हाका देऊन पाहीलं तर आत कुणीच नव्हतं. झोपडीत आत थोडावेळ थांबून निघू असं म्हणून आबा कृष्णाला घेऊन आत शिरला.
“वारीला जायचं …. “
“वारीला जायचं …. ” असं म्हणत हात पाय आपटत कृष्णानं हैराण करून सोडलं. त्याला समजावून काय बी समजेना …..
आबा काळजीत पडला…. काय करावं सुचेना ….. मोडकळीस पडलेल्या त्या झोपडीत नजर टाकली तर ती बी रिकामीच. कोपऱ्यावरच्या खांबाला हळदीत भिजवून वाळवलेला एक पंचा तेवढा टांगलेला दिसला. आबानं लागलीच तो पंचा घेतला. कृष्णाला समजावत त्यानं लेकाचं डोकं आधी कोरडं केलं आणि तोच पंचा डोक्यावर पागोट्यासारखा गुंडाळला. कृष्णानं रडत कढत झोपडीचा एक कोपरा पकडला. तो बाहेरचा पाऊस बघत, त्या पंचा अडकवलेल्या  खांबाला मिठी मारून उभा राहिला.
विजांचा प्रकाश आणि आवाज झोपडी दणाणून टाकत होता. पावसाचा रतीब सुरुच होता.
मध्यापासून वरडून “वारीला जायचं …. ”  “वारीला जायचं …. ” म्हणणारा कृष्णा आता जरा शांत झाला. कृष्णाचे रडणारे डोळे आता हसरे आणि बोलके झाले. आबाला जरा हायसं वाटलं. त्यानं झोपडीतून बाहेर पाहिलं, पाऊस काय ओसरणारा नव्हता. आबानं कृष्णाला “चल बीगी….घरला जाऊ …. “असं म्हणत खांबापासनं सोडवत  पाठीवर घातलं. कृष्णा काही न बोलता आबाच्या पाठीवर पहुडला. आबानं झोपडीतुन काढता पाय घेतला नी झपझप पावलं टाकीत तो घराकडं धावला.
पाऊस रिपरिपत होता. कृष्णाने मागून दोन तंगड्या आबाच्या कमरेभोवती करकचून घेतल्या आणि हात गळ्याभोवती घालून आबाला घट्ट धरलं होतं. 
घराची ओसरी दिसताच आबाच्या जीवात जीव आला. तरतर चालून त्यानं ओसरी गाठली. कृष्णाला पाठीवरुन उतरवून ओसरीत ठेवलं. तोच कृष्णा घरात धावला….. घरभर आनंदानं बागडला…..
स्वतःचं अंग झाडून, मातीचे पाय धूवून, हातापायाला झटके देत, आबा घरात आला….
कृष्णाची वली कापडं पैला बदलायची म्हणून त्यानं कृष्णाचा हात पकडला …. तोच दचकला …. हे काय इपरित…..
कृष्णा डोक्यापासून पायापर्यंत … रखरखीत, कोरडा ….
आबा आश्चर्याने चकमकला…. एवढ्या पावसात आम्ही दोगं पायपीट करून आलो … नि हा एवढा कोरडा …
त्यानं पुन्हा अंगभर हात फिरवून निरखून पाहीलं…. कृष्णा संपूर्ण कोरडा होता… अंगा कपाळावर पावसाचा एक थेंब बी न्हाई….. डोईवरचा पागोटा बी कोरडा, करकरीत.
“हे आसं कसं झालं… दुथडीभर पावसात भिजलेला कृष्णा आता एकाएकी कोरडा कसा झाला.” स्वतःशी पुटपुटत त्यानं घरभर भिरभिरणाऱ्या कृष्णाला धरुन जवळ केलं. कृष्णाच्या डोळ्यांत एक विलक्षण आनंद …. इच्छापूर्तीचं समाधान….
आबानं कृष्णाला काही विचारायच्या आत कृष्णा उत्तरला, “आबा इठ्ठल भेटला…. रामकृष्ण हरी….. रामकृष्ण हरी…” आणि परत घरभर भिरभिरत आनंदाने धावत सुटला.
कृष्णाला वारीला नेलं नाय म्हणून असं काय बी बोलतोय, असं आबाला वाटलं …
कृष्णाला जरा समजावून सांगू … चार घास खाऊ घालू… पोरं शानं हाय … ऐकेल …… म्हणून त्यानं घरभर धावत्या कृष्णाचा डावा हात धरला… कृष्णा गर्रर्रsssकन फिरला ….
डोक्यावर बांधलेला पागोटा सैल झाला … जमिनीवर पडला.
आबानं तो पंचा परत करायचा म्हणून उचलला आणि झटकला…..
आबा अवाक होऊन पाहतच राहिला
झटकल्यावर पागोट्यातून हा बचकाभर काळा भूगा आणि टवटवीत तुळशीची पानं जमिनीवर सांडली… आबा क्षणभर सुन्न झाला… हा क्षण समृद्ध करणारा होता.
त्याला सगळं समजलं होतं….
डोळ्यासमोर सगळं घडलं होतं….
झोपडीचं दार उघडं होतं…
खांबाला पंचा झुलत होता..
कृष्णाचा कैवारी आला होता…
कृष्णा त्याच्याच मिठीत विसावला होता…..
भक्तीचा मृदुंग आभाळात दणकत होता…
श्रद्धेची भगवी पताका वाऱ्यावर डोलत होती…..
देवावरचा विश्वास बेभान बरसत होता…
आबानं मनोमनी पांडूरंगाला नमन करुन, उजव्या हाताची बोट त्या भुग्यात बुडवून कपाळावर लावली ….
समोर उभ्या कृष्णाला डोळ्याच्या कडा ओलावून  पाहिलं …
कृष्णा गोड हसला आणि म्हणाला “राम कृष्ण हरी ….. राम कृष्ण हरी … “

निवेदनः सदर कथा काल्पनिक आहे. लेखनाचे सर्व अधिकार लेखकाकडे सुरक्षित आहेत.

लेखक – ©™ श्री. अनुप साळगांवकर