फार जुनी गोष्ट आहे. खूप खूप वर्षांपूर्वी जेव्हा जगाची उत्पत्तीच झाली नव्हती.
जेव्हा पृथ्वीवर कोणत्याच प्राण्याचं अस्थित्व नव्हतं.
मानवाने तर या जगात पाऊलंच रोवलं नव्हतं, तेव्हाची हि गोष्ट.
तेव्हा सगळ्या सुंदर पऱ्या पृथ्वीवर रहायच्या. पृथ्वीच्या निसर्ग सौंदयाने भारावलेल्या त्या दिवसभर इकडे – तिकडे एकत्रच फिरायच्या, निसर्गाचा मनमुराद आनंद लुटायच्या आणि फिरून फिरून दमल्या कि आभाळ पांघरून झोपायच्या. 
असंच एकदा सहज फिरता फिरता त्या सगळ्या पऱ्या एका खडकाळ प्रदेशात येऊन पोहोचल्या. त्या सुंदर प्रदेशात अनेकविध, रंगीबेरंगी, विविध आकाराचे, काही ओबडधोबड तर काही अणुकूचीदार दगड पाहून आश्चर्यचकित झाल्या. काही दगड अत्यंत पारदर्शक, हि-यासारखे ….. सुर्यबिंब पडलं कि तेजस्वी लखाखणारे.
निसर्गाचं हे दिव्य सौंदर्य पाहत दगडांवरुन चालता चालता अचानक अंदाज चूकून काही पऱ्या ठेचाळल्या, काही पडल्या, तर काहींना त्या टोचणाऱ्या दगडांवर निटसं उभंही राहता येईना.
काही परींच्या पायात तर तीक्ष्ण दगड आला आणि त्या जागीच थबकल्या.
सुंदर परींना लागलेली ठेच पाहून जमिनीवरचे ते दगड देखील दुःखाने विव्हळले.
त्या दगडाचं दुःख पाहून त्यातील एक परी म्हणाली, “अरे …….. तू तर एक निर्जीव दगड…….तुला कशी झाली नाजूक परी जड…. ???”.
परीच्या प्रश्नावर स्मितहास्य करत दगड उत्तरला , ” हो……….. अगदी बरोबर मला तू जड नाहीसच आणि मी माझ्यासाठी, माझ्यावर पडणाऱ्या तुमच्या थोड्याफार वजनामूळे विव्हळलो नाहीच, मी तुमच्या साऱ्यांच्या नाजूक पाऱ्याला माझ्या विचित्र आकारामूळे ज्या जखमा झाल्या आहेत ना……… जखमा पाहून दुःखी झालो.”
दगडाचे बोलणे ऐकून साऱ्या पऱ्यांनी आपापले पायाचे तळवे तपासले तेव्हा त्यांना दिसल्या त्या गंभीर जखमा, तळव्यावर उभ्या – आडव्या, जाळीदार लाल रेषा, ज्या जखमांमधून रक्त येत होत. 
आपल्या पृथ्वीवरच्या फिरतीच्या सवयीमूळे झालेल्या जखमा पाहून, सगळ्या पऱ्यांना आपण दगडावर उगाच रागावलो याची जाणीव झाली तशी त्यांनी दगडाची माफीही मागितली. 
आपल्याला जखमा देणाऱ्या पृथ्वीवर आपण पुन्हा पाऊल ठेवणार नाही, अशी सगळ्या पऱ्यांनी मिळून कठोर प्रतिज्ञा केली, आणि एकत्रच सा-यांनी मिळून निळ्याभोर आभाळी उडी घेतली.
तेव्हापासून प्रत्येक परी,
उडू लागली अधांतरी.