पाऊस आणि धरणी एकमेकांचे खूप छान आणि जुने मित्र होते. मित्र म्हटलं कि, आपलेपणा, मनमोकळेपणा, रुसवे-फुगवे, हक्क, जबाबदारी या सगळ्या गोष्टी आल्याच. पावसाचं आणि धरणीचं मैत्रीचं नातंही असंच सुंदर आणि निरागस होतं. पाऊस दूर आभाळाच्या देशातून दरवर्षी, अगदी न चुकता धरणीला भेटायला यायचा, मनमोकळं बरसून धरणीला ओलंचिंब करायचा. तो आला कि धरणीलाही खूप आनंद व्हायचा. तिच्या डोंगररांगा हिरव्यागार दिसायच्या, काडेकपारीतून फेसाळ धबधबे आनंदाने उचंबळून वाहू लागायचे, शेतात इवली इवली रोपे वाऱ्यावर डोलू लागायची, बळीराजा सुखावून जायचा आणि हे सारं पाहून धरणी तृप्त व्हायची.
दरवर्षीचा पावसाचा असाच दिनक्रम चालू होता. पण यावर्षी पाऊस ठरलेल्या वेळेत आला नाही, आपला मित्र आपल्याला विसरला कि काय ??? असा विचार करून धरणीला काळजी वाटू लागली. थंड हवेच्या झुळुकी सोबत मिळणार त्याचा निरोप अजूनतरी मिळाला नाही. पावसाच्या या अशा बेफिकीर वागण्याचा धरणीला खूप राग आला.
यंदा जरा उशीराच झाला खरा, पण जेव्हा तो धरणीला भेटायला ढग घेऊन आला तेव्हा उशीरा येण्यावरून तिचं आणि पावसाचं जोरदार कडाक्याचं भांडण झालं.
“काही निरोप नाही , काही नाही … आता आठवण झाली होय … एवढ्या उशिरा तरी का आलायस भेटायला ?”
धरणीच्या अशा कठोर बोलण्याने पावसाला खूप वाईट वाटले. त्यावर “पुन्हा तुला भेटायला इतके कष्ट घेऊन येणार नाही ” पाऊस चिडून म्हणाला आणि निघून गेला.
“गेला तर जाऊ देत” असं मनात म्हणून धरणी सुद्धा पावसावर रुसून बसली. असेच काही दिवस, मग महिने उलटून गेले. हळूहळू रुसून बसलेल्या धरणीचा सगळा मेकअप बिघडला, नदी-नाले पाण्याअभावी सुकून गेले, झाले-वेली कोमेजून गेल्या, शेते ओसाड पडली, प्राणिजनांची उपासमार झाली, जमिनीची धूप वाढली आणि जमिनीला तडे जाऊ लागले, धरणीचे फार हाल सुरु झाले. पावसावाचून पुढचे दिवस ढकलणे तिला खूप कठीण होऊ लागले.पावसाने परत यावे म्हणून धरणी मनोमनी याचना करू लागली. आपण आपल्या कठोर शब्दांबद्दल पावसाची माफी मागितली पाहिजे, असेही तिला वाटले.
पाऊस बिचारा भोळा, दूर आभाळातून हे सारे काही पाहत होता. ओसाड धरणाचे दुःख पावसालाही सहन झाले नाही त्याला तिची खूप दया आली.आपल्या लाडक्या मैत्रिणीला भेटण्यासाठी त्याचेही मन आतुर झाले मग त्याने मागचा पुढचा कसलाही विचार न करता ढग केले गोळा आणि वाऱ्यावर स्वार होऊन तो धरणीच्या भेटीला आला. प्रचंड विजांचा कडकडाट करत तो धरणीला भेटला आणि जोरदार बरसला. त्याच्या त्या ओल्या स्पर्शाने धरणी शहारली, सुकून, कोमेजून गेलेली, तहानलेली धरणी पुन्हा एकदा तृप्त झाली.आपल्या मदतीला पाऊस न बोलावता आला त्यामुळे त्याची मैत्री निस्वार्थी आहे, हे आता तिलाही पटले. आपण रागाच्या भरात खूप वाईट वागलो, बोललो याची जाणीव झाली तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आले आणि पावसाला मिठी मारत म्हणाली , “पुन्हा नको भांडू, माझ्या पासून दूर राहून माझे असे अश्रू नको सांडू”. दोघे एकमेकांना वर्षभराने भेटले तेव्हा एकमेकांकडे पाहून दोघांचेही मन आले भरून, काय उपयोग झाला उगाच भांडण करून ?
अगदी तेव्हापासून दोघांनीही ठरवले कारण काहीही असो या पुढे कधीच भांडायचे नाही. आणि तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी न चुकता, न बोलावता पाऊस धरणीच्या भेटीला येतो, धरणीला ओलावा देतो, निसर्गाला नवचैतन्य देतो आणि वर्षोनुवर्षे जपलेल्या मैत्रीची आठवण करून देतो.
मित्रहो, कधी कधी आपणही परिस्थिती न समजून घेता आपल्या जिवलग मित्रांशी वाईट वागतो, त्यांना लागेल असे बोलतो.
असे चुकीचे वागण्याने, बोलण्याने आपले मित्र कायमचे आपल्यापासून दुरावतात.
आपल्याला संयमाने प्रसंग सांभाळता आला पाहिजे. आपल्या माणसांना समजून घेता आले पाहिजे आणि प्रेमाने समजावता आले पाहिजे.
आपले मित्र कितीही दूर गेले तरी ते आपलेच आहेत याची जाणीव असली पाहिजे आणि म्हणून मित्र चुकले तरीही त्यांच्या मदतीसाठी आपण नेहमीच तयार असले पाहिजे.
November 19, 2024 at 1:10 pm
Awaiting moderation
バイアグラ гЃЇйЂљиІ©гЃ§гЃ®иіј – バイアグラ и–¬е±ЂгЃ§иІ·гЃ€г‚‹ г‚їгѓЂгѓ©гѓ•г‚Јгѓ« и–¬е±ЂгЃ§иІ·гЃ€г‚‹