गोष्ट जुनी असली तरी विचार आजही झालाच पाहिजे. आपल्या चूका मान्य करुन त्या सुधारण्याचा प्रयत्न आपण नेहमीच केला पाहीजे. यातच संपूर्ण सजीवसृष्टीचं भलं आहे. प्राणी आणि पक्षी यांच्या पाठीवर निसर्गाने पृथ्वीवर कल्पक “मनुष्यप्राणी” जन्माला घातला. सगळ्या सजीवांत अत्यंत हुशार आणि बुद्धिमान असा हा एकमेव मनुष्यप्राणी. निसर्गाने जे जे जन्माला घातलं त्या प्रत्येकासाठी केले काही नियम. हे साधे, सरळ, सोपे नियम याचसाठी की, एकूणच निसर्गाचा हा अमूल्य ठेवा जपला जावा आणि विलोभनिय असं हे निसर्ग सौंदर्य कायम अबाधित राहावं हा निर्मळ हेतू. मनुष्य, प्राणी, पक्षी यांना जगण्यासाठी जे जे लागेल ते ते सारं निसर्गाकडूनच अमाप पुरवलं जायचं. कधीही निसर्गाकडे मागायची गरज पडली नाही, की कधी ओरबाडून घ्यायची आवश्यकता निर्माण झाली नाही. मानवाच्या अन्न , वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजांनाही निसर्गाने निस्वार्थीपणे तथास्तु म्हंटल.
अशा या दानशूर निसर्गात, पूर्वी समुद्र किनारी वाळू ऐवजी शुभ्र मीठ पसरलेलं असायचं आणि समुद्राचं पाणीही अगदी अमृतासारखं गोड असायचं. स्वच्छ निळाशार तो समुद्र, त्याचं अमृततुल्य पाणी आणि त्या किनारी पसरलेलं शुभ्र मीठ म्हणजे निसर्गाची निराळी किमयाच. सजीवांची तहान भागवण्यासाठी याच पाण्याचा सर्वतोपरी वापर होऊ लागला. अनेक पक्षी, प्राणी आपापल्या गरजांसाठी किनाऱ्याभोवतीच विसावू लागले. सगळं काही सुरळीत आणि अलबेल चालू होतं.
आदिमानवाचा जन्म झाला. हळूहळू मानवाची उत्कांतीही झाली आणि अन्नाला चव यावी म्हणून तो या किनाऱ्यावरील मिठाचाही वापर करू लागला. पण, मीठ आणि पाणी वापराचा निसर्ग नियम असा कि, ” अन्नाला लागेल तेवढेच मीठ आणि पाणी समुद्रावरून न्यायचे. जास्तीचे न्यायचे नाही आणि उरलेले फेकायचे नाही.” नियमाचा उद्देश असा कि निसर्गाचा कमीत कमी -हास होईल आणि निसर्ग सौंदर्य कायम अबाधित राहीलं.
पण जशी जशी बुद्धीची वाढ झाली, तसा हा मानव अहंकारी, लोभी आणि स्वार्थी होऊ लागला.  स्वतःच्या स्वार्थासाठी मानवाने निसर्गाचे अनेक नियम मोडले तसा हा ही नियम मोडला. निसर्गाने जशी क्रिया तशीच प्रतिक्रिया दिली. समुद्राला एक मोठी भरती आली त्यात समुद्रकिनाऱ्यावरचे सारे मीठ समुद्रात वाहून गेले आणि किनाऱ्यावर उरली ती मीठाखालची रखरखीत फक्त वाळू . मीठ पाण्यात विरघळल्यामुळे समुद्राचे सारे पाणी खरट झाले. इतके खारट कि ते पिण्यायोग्यही राहिले नाही. तेव्हापासून आजतागायत आपल्या सगळ्याचं समुद्राचं पाणी खारट झालं. तहान भागविण्यासाठी आजही खारट झालेलं समुद्राचं पाणी अनेक प्रक्रिया करून आपल्यला पिण्यायोग्य बनवावं लागतंय. त्या प्रक्रियेला अमाप खर्च येतो.
निसर्गाच्या बाबतीत बेसुमार तोडली जाणारी झाडे, त्यामुळे होणारी जमिनीची धूप, वाढणारे तापमान, अपुरा पाऊस, बिघडलेलं निसर्गचक्र असे एक न अनेक नियम आपण कळत-नकळत मोडलेत.
निसर्गाला आपण नेहमीच गृहीत धरलंय.निसर्गावर नियंत्रण ठेवण्याचा आपला प्रयत्न हा त्या निसर्गाचा अपमान आहे. कदाचित म्हणूनच निसर्ग विविध रूपांनी आपल्याला हेच पटवून देत असतो कि आपण या निसर्गाचा भाग म्हणून नगण्य आहोत.
या निसर्गावर विजय मिळवण्याची आपण कल्पना तरी कशी करू शकतो. आपण जर काही करू शकतो तर निसर्गाने दिलेलं हे दान जपू शकतो, हा खजिना खरंच खूप अमूल्य आहे. आपण निसर्ग नियम पालन करू शकतो आणि त्या अविरत उर्जेसमोर समर्पित होऊ शकतो.

म्हणूनच मित्रहो निसर्गाच्या जवळ जा, निसर्गाला वेळ द्या, त्यावर प्रेम करा. निसर्ग नियमांचे पालन करा. स्वतःचा आणि संपूर्ण सजीवसृष्टीचा उद्धार करा.