मर्कटेश्वर राज्यात मर्कट नावाचा एक शूर राजा राज्य करीत होता. राजा आपल्या प्रजेवर पुत्रवत प्रेम करीत असे. सर्व सुखसोई उपलब्ध असल्याने प्रजाही खूप सुखी होती. प्रजा होती सुखी पण राजा होता दुःखी. त्याच्या  दुःखाचे कारण काय ? तर जन्मत:च राजाला होती एक लांबसडक वनरासारखी शेपटी. आपली शेपटी कुणालाही दिसू नये म्हणून राजाला नेहमीच जागरुक राहावे लागे, सिंहासनावरही बसताना राजाला शेपटी लपवून बसावे लागे. ती भली मोट्ठी शेपटी लपवण्याचा राजाला फार वीट आला होता. प्रजेला भेटण्याचे टाळण्यासाठी तो माहिन्यातून एकदाच राजदरबार बोलवत असे आणि कामाशिवाय कुणालाही भेटत नसे.
लहानपणापासून अनेक वैद्य, हकीम झाले पण राजाला काही गुण येईना आणि त्या शेपटीचा समूळ नायनाट काही केल्या होईना.
एके दिवशी राजाला त्याच्या राज्याबाहेर एक महान विद्वान साधू स्वामी महाराज आलेत अशी सेवकांकडून राजाला बातमी मिळते. अशा स्वामी महाराजांची सेवा करता यावी असे मनाशी ठरवून बातमी मिळताच राजा स्वतः त्या साधू स्वामी महाराजांकडे जातो, त्यांचे शिष्यत्व स्विकारतो, त्यांची सर्वतोपरी सेवा करतो. यातच अनेक महिने सरुन जातात.
राजाच्या सेवेला प्रसन्न होऊन साधू स्वामी गुरुमहाराज राजाला एकांतात बोलावतात आणि प्रसन्न होऊन राजाच्या डोक्यावर हात ठेवून त्याला त्याच्या पूर्वजन्माची आठवण करून देतात.
ज्या पूर्व जन्मात राजा क्षत्रिय होता आणि शस्त्रविद्या शिकताना त्याने अनेक वानरांची शेपटी तलवारीने धडा वेगळी केली होती. त्या वानरजातीचा शाप म्हणून राजाचा या जन्मी वानर योनीत जन्म झाला आणि त्याला जन्मापासून लाभली ती ही वानरांसारखी भली मोट्ठी शेपटी.
राजाला त्याचा पूर्वजन्म ऐकून फारच दुःख होते. अपराधी पणाची भावना त्याच्या मनात घर करुन राहते. आपण नकळत केलेल्या चूकीची शिक्षा आपण भोगतोय, याची जाणीव होते. राजा साधू स्वामी महाराजांना विनंती करतो, आता तुम्हीच मार्गदर्शन करा, यावर योग्य ते प्रायश्चित सुचवा ……??? साधू स्वामी महाराज यावर उपाय म्हणून राजाला आपल्या राज्यात वानरांचे आणि अन्य वन्य प्राण्यांचे पुनर्वसन करण्याचे आदेश देतात. राजाही अगदी निमूटपणे गुरूंच्या आज्ञेचे काटेकोरपणे पालन करायचं ठरवतो.
मर्कटेश्वर राज्या शेजारीच असलेल्या मोठ्या जागेत अनेक झाडे लावून, त्यांच संगोपन करुन राजा एक जंगल निर्माण करतो. तेथे मुक्या प्राण्यांची यथायोग्य व्यवस्था करतो. त्या हिरव्यागार जंगलात हळूहळू अनेक वानरे आणि त्या सोबत सगळेच प्राणी, पक्षी राहायला येऊ लागतात, अनेकविध प्राणी पक्षी तेथे तळ ठोकून आपापला घरोबा वाढवू लागतात. राजा स्वतः जातीने सगळ्यांची काळजी घेत असतो. जंगलात जशी जशी वानरांची संख्या वाढू लागते तशी तशी राजाची शेपटीही हळू हळू छोटी होऊन एकाएकी नाहीशी होते. अशाप्रकारे केलेल्या पापाचे प्रायश्चित घेऊन राजा शाप मुक्त होतो आणि मर्कटेश्वर राज्य प्राणीमित्र राज्य म्हणून नावरुपाला येतं.
म्हणूनच मित्रहो, चांगली कर्म करा. कुणालाही दुखावू नका, नकळत चूका करु नका. मुक्या प्राणी मात्रांवर दया करा, त्यांचे आशिर्वाद घ्या. बघा तुम्हीही खूप सुखी आणि आनंदी व्हाल.