चित्रनगरीवर राजा चित्रसेन अनेक दशके राज्य करीत होता. राजा चित्रसेन हा कलासक्त होता. अनेक गायक, वादक, रंगकर्मी त्याच्या चित्रनगरीत राजाश्रयाला होते. नेहमी प्रजेसाठी तत्पर, न्यायप्रिय, शूर, पराक्रमी असा हा राजा शरीराने पूर्णपणे सुदृढ असून अर्ध्या चेहऱ्याने मात्र थोडा विद्रुप होता. प्रजेवर पुत्रवत प्रेम करणाऱ्या प्रजेचेही राजावर खूप प्रेम आणि विश्वास होता, म्हणूनच राज्यात कुठेही राजाच्या विद्रुप अर्ध्या चेहऱ्याची कधीही चर्चा होत नसे.
एके दिवशी राज्यात दूर देशातून एक चित्रकार येतो. या चित्रकाराचे कौशल्य असे कि तो कोणत्याची व्यक्तीचे काही क्षणातच अगदी हुबेहूब व्यक्तिचित्र रेखाटत असे. अगदी माफक दारात हा चित्रकार आपल्या दैवी देणगीचा आनंद समस्त गावकऱ्यांना देत असे. चित्रांच्या मौखिक स्तुतीने, आपल्या राज्यात एक कुशल चित्रकार आला आहे हि बातमी राजवाड्यात वाऱ्यासारखी पसरली, राजा चित्रसेनाच्याही कानावर पडली. राजाने चित्रकाराला राजवाड्यात बोलावून घेतले, त्याचे यथेच्छ स्वागत केले, आपलेपणाने त्याची विचारपूस केली आणि चित्रकाराने आपले एखादे चित्र हुबेहूब काढावे अशी इच्छा व्यक्त केली.
दरबारात राजाची हि इच्छा ऐकून एकूणच शांतता पसरली. चित्रकाराच्या चित्रात आपल्या लाडक्या राजाची विदुपता स्पष्ट दिसेल आणि भर दरबारात राजाचा अपमान होईल म्हणून संपूर्ण दरबार चिंताक्रांत झाला. चित्रकार मात्र शांत उभा होता. महाराजांची आज्ञा स्वीकारून त्याने आपले सगळे रंगाचे सामान दरबारात मागवून घेतले आणि चित्र काढायला सुरवात केली.
तिथे चित्रकार हळू हळू राजाकडे पाहून चित्राला आकार देत होता तसे इथे प्रजेत दबक्या आवाजात कुजबुज चालू होती. ‘चित्रकाराचे चित्र कसे असेल?, राजाला हे चित्र आवडेल का?, चित्रकाराला राजाची खरी सुंदरता दिसेल का?’ अशा अनेक प्रश्नांची चर्चा दरबारी सुरु होती.
चित्रकाराचे चित्र जसे पूर्ण झाले तसे राजा ते पाहण्यासाठी राज सिंहासनावरून खाली उतरला. राजा जसा खाली उतरला तसा साऱ्या प्रजेच्या हृदयाचा ठोका चुकला. राजा चित्र समोर येऊन उभा राहला आणि अगदी हरखून गेला. राजाची नजर त्या चित्रावरच खिळून राहिली. असेच काही क्षण निघून गेले. राजाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू उमटले, ते पाहून प्रजेलाही खूप आनंद झाला. राजाला झालेलं समाधान पाहण्यासाठी सगळेच दरबारी एकाएकी चित्रासमोर गर्दी करु लागले. चित्र पाहतात आणि अवाक झाले. सगळ्याच दरबारा समोर असतो कलेचा एक उत्कृष्ट नमुना सादर झाला होता.
चित्रकाराने राजाचे अगदी हुबेहूब चित्र काढलेले होते. ज्या चित्रात राजा एका अरण्यात उभा राहून धनुष्यावर बाण चढवून, प्रत्यंजा ओढून एका वाघाची शिकार करण्यात मग्न होता. चित्रातील विशेष बाब म्हणजे हि शिकार करताना राजाचा अर्धाच चेहरा दिसत होता, ज्या चेहऱ्यावर पराक्रमाचे, शोर्याचे तेज ओसंडून वाहत होते.
दरबारातील प्रत्येक व्यक्ती आता त्या चित्रकाराचे तोंडभरून कौतुक करीत होते. राजालाही त्या चित्राचे आणि त्या चित्रकाराचे खूप अप्रूप वाटले आणि चित्रकाराच्या बुद्धीकौशल्यही सतेज असल्याची जाणीव झाली. राजाने चित्रकाराला यथेच्छ बक्षीस दिले आणि राजदरबारी राजाश्रयासठी ठेऊन घेतले.
म्हणूनच मित्रहो, आपल्याकडे जी कोणती कला असेल ती जपली पाहिजे, त्या कलेचा योग्य वापर केला पाहिजे आणि आपल्या कलेतून इतरांना सतत आनंदच दिला पाहिजे.