एका छोट्याशा गावात एका गरीब माहुताकडे ऐरावत नावाचा एक मोठ्ठा हत्ती असतो. हत्ती काळ्या राखाडी रंगाचा, पांढऱ्या शुभ्र सुळ्यांचा, लांब लांब सोंडेचा आणि डौलदार चालीचा म्हणून सगळ्या गावाचा लाडका असतो. हत्ती स्वभावाला खूप शांत आणि समजूतदार असतो. माहूत आणि  हत्ती दोघेही मिळून गावकऱ्यांना खूप मदत करत असतात. हत्तीवर बसून गावात फिरताना सगळे गावकरी खूप आदराने त्या दोघांकडे पाहत असतात.
गावभर फिरताना कुठे कुणाच्या अवजड वस्तू वाहून ने, कुणाच्या शेतीच्या कामला मदत कर, दूर नदीवरून पाणी भरून घेऊन ये अशी अनेक कामे माहूत हत्तीच्या मदतीने करत असे. गाव अगदीच खेडेगाव असल्याने आणि नदी फार दूर असल्याने गावात पाण्याचा प्रश्न फारच बिकट असतो. पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्याचा नीट विनियोग होत नसतो. गावात विहिरींचीही संख्याही कमी असल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात गावाला पाणी टंचाई प्रचंड प्रमाणात होत असे.
या पाण्याच्या प्राश्नावर तोडगा म्हणून माहुताला एक छान कल्पना सुचते. पाऊस सुरु होऊन काहीच दिवस झाले असतात. लाल मातीचा सुगंध गावभर दरवळत असतो. अशाच एका रात्री माहूत हत्तीला घेऊन एका माळरानावर कुदळ फावडा घेऊन जातो. चांगली मोठी जागा बघून मऊसूत मातीचा अंदाज घेऊन खणायला सुरवात करतो. हत्तीला काही क्षण कळतच नाही चालू आहे. थोड्या वेळाने एक छोटासा खड्डा तयार होतो. माहूत बिचारा दमून जातो. थोडावेळ आरामकरण्यासाठी झाडाचा आधार घेतो. माहूताला दमून झोपी गेलेलं पाहून, हत्ती माहुताला मदत करायची ठरवतो आणि त्या खड्यात जाऊन बसतो. त्या मऊ मातीत लोळून लोळून हत्ती काही वेळातच तो खड्डा प्रचंड मोठा करतो. माहूताची झोप होताच, माहुताला हा प्रचंड मोठा खड्डा पाहून आनंद होतो तो हत्तीला शाब्बासकी देतो. पहाट होण्यासाठी काहीच काळ शिल्लक असतो तेवढ्यात जोराचा पाऊस येतो आणि पाहता पाहता तो संपूर्ण खड्डा भरून जातो. आता त्या खड्याचे एक सुंदर तळे झालेले असते. दिवस उजाडताच शेतीच्या कामासाठी निघालेले सगळे गावकरी त्या तळ्याशेजारी जमा होतात. ऐरावत हत्तीला चिखलात माखलेला पाहून गावकऱ्याना या तळ्याच्या नियोजनाची कल्पना येते. हि गोष्ट संपूर्ण गावात पसरते आणि सगळ्या गावात आनंदी आनंद होतो, कारण आत्ता गावच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटलेला असतो. गावात आल्यावर हत्त्तीचे आणि माहुताने सगळे गावकरी मिळून खूप कौतुक करतात, माहुताने आभार मानतात आणि हत्तीला बक्षीस म्हणून एक रेशमी झूल देतात. आता ती रेशमी झूल घालून गावभर फिरताना हत्ती एकदम राजबिंडा दिसत असतो.
म्हणूनच, मित्रहो पाणी हे जीवन आहे, आपण पाणी जपून वापरले पाहिजे. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या अनेक प्रश्नांना आपण नक्की तोंड देऊ शकू.