ब्रह्म देवाने ही सुंदर सृष्टी निर्माण केली. फुलं-पानं, झाडं-वेली, दगड-गोटे ही त्यांचीच किमया, म्हणूनच त्यांना “जगतपिता” म्हणतात. सृष्टी जशी निर्माण झाली तसे त्यांनी अनेक सजीवही जन्माला घातले. हे सृष्टी सौंदर्य वाढवताना असंख्य प्राणी, अनेकविध पक्षी त्यांनीच तर निर्माण केले. अनेकविध आकार, नाविण्याचे नवरंग ही सगळी त्यांचीच सर्जनशीलता. “जे जे डोळ्यांना स्पष्ट आहे ते कालानुक्रमे नष्ट आहे.” हा या सृजन सृष्टीचा अत्यंत महत्वाचा नियम आहे. पृथ्वीवर जन्म घेणाऱ्या प्रत्येक सजीवाला कालानुक्रमे जगण्याच्या मर्यादा आहेत. या नियमाला अनुसरून ब्रह्म देवाने प्रत्येक सजीवाला वर्षागणिक आयुष्य देण्याचं ठरवलं.
सगळ्या सजीवांना प्राणी पक्षी झाडे वेली यांना देवलोकी बोलावण्यात आलं. कोण कोण या निसर्गाच्या उत्क्रांतीसाठी किती-किती आणि कसा-कसा हातभार  लावू शकेल, या वरून प्रत्येक जीवाला आयुष्य जगण्याच्या वार्षिक मर्यादा देण्यात आल्या. हत्तीला ७० वर्ष, कासवाला १०० वर्ष, गरुडाला ८० वर्ष, बेडकाला १४ वर्ष, सश्याला १० वर्ष, असे एक एक करून सगळ्या पक्षी प्राण्यांना आयुष्य  होते. सगळे खूपच आनंदी होते. सगळ्याच पशू पक्षांना आयुष्य वाटता वाटता सगळ्यात शेवटी नंबर आला तो….. फुलपाखराचा. फुलपाखरालाही आयुष्य मिळालं, तेही फक्त १५ दिवसाचं.  हे १५ दिवसाचं आयुष्य फुलपाखराला देताना ब्रह्मदेव म्हणाले, “हे फुलपाखरा, सांग तू या आयुष्याचा कसा उपयोग करशील ?, निसर्गाला कशी मदत करशील?” फुलपाखरू या प्रश्नावर हसून म्हणाले, ” हे देवा, मी माझ्या आयुष्यात सगळ्यांना आनंद देणार आहे. मी स्वतःच्या सुखाचा विचार न करता, त्या पलीकडे जाऊन माझ्या आजूबाजूला असणाऱ्या, दररोज फुलणाऱ्या प्रत्येक फुलाकडे जाणार आहे, त्या फुलाची आपुलकीने विचारपूस करणार आहे. त्यांच्याशी मैत्री करणार आहे. त्यांना सोबत करुन, त्यांचं असं कुणीतरी त्यांच्यापाशी आहे याची त्यांना जाणीव करून देणार आहे. मी माझं हे आयुष्य सृष्टीतील सर्व फुलांना समर्पित करणार आहे.” ब्रह्मदेवाला फुलपाखरांचं हे उत्तर ऐकून खूप आनंद झाला. आपण निर्माण केलेली सृष्टी आपापसात छान समन्वय साधत आहे याचे ब्रम्हदेवाला फार अप्रुप वाटले आणि मग देवाने बक्षिस म्हणून फुलपाखराला दिले ते अगणित रंग.
    आपल्याला बक्षीस म्हणून मिळालेल्या इंद्रधनुष्यी रंगात रंगून आजही फुलपाखरू निसर्गात प्रत्येक फुलांबरोबर मैत्री करत आहे, प्रत्येक फुलाला आपलंसं करत आहे. म्हणूनच मित्रहो आपलं आयुष्य किती आहे ते जाणून घेण्यापेक्षा आपल्या जवळच्या प्रत्येक माणसाला आपलंसं करा, सगळ्यांवर निस्वार्थ प्रेम करा, जीव लावा आणि फुलपाखरासारखं आपलं आयुष्य समृद्ध करा. सुख वाटताना नसावी मर्यादा ……. तरच समृद्ध होईल आर्युमर्यादा.