परतीच्या प्रवासाची पावलं थोडी जड होतात. गुरुचरण सोडून कुठे जाऊच नये असंच वाटत राहतं. परतीच्या वाटेवर तो जन्मापासूनचा आपला प्रपंचाचा खेळ सतत आठवतो, मायेचा वारा कानात शिरु पाहतो….. म्हणूनच …..कदाचित् …… पावलं जड होत राहतात…..श्री गुरु चरणांजवळ या कशाचीही भीती नसते…..गुरु तारुन नेतातच….. भक्ताला भक्ताच्याही नकळत. आम्ही परतीचा प्रवास सुरु केला आणि पुन्हा पायऱ्या चढत उतरत गुरु गोरखनाथ मंदिरा जवळ येऊन ठेपलो. पहाटेचे ४ वाजले असतील. मंदिरापुढेच एक छप्पर असलेली छोटी आरामासाठी जागा आहे. चालून चालून पायांनी हात वर केले होते. सगळेच खूपच दामले असल्याने सगळ्यांनी अंग टाकले. थंडीही खूप जाणवत होती. मी ही माझी बॕग डोक्याखाली घेतली. डोळे कधी मिटले कळलेचं नाही. आम्ही सगळे उठलो …… घड्याळ पाहतो तर एक तास उलटून गेला होता. आता पायांना गती दिलीच पाहीजे असे ठरवून, एकदम ताजे तवाने होऊन आम्ही भरभर उतरायला लागलो. आता चांगलेच उजाडले होते. केशरी तांबूस सूर्य नारायणाचे दर्शन झाले. पौणिमेचा विरत जाणारा चंद्र आणि उगवणारा सूर्य हा योग खूप क्वचितच पाहायला मिळतो….पाहून मनाला समाधान वाटलं….. गिरनार पर्वताच्या बाजूला नजर टाकली की भव्य दातार पर्वत दिसतो. आजूबाजूला गिरचे अभयारण्य आहे……. खुप धनदाट असं. वरून पहिले असता हि हिरवळ डोळ्यांना अत्यंत आल्हाददाई वाटते. गिरनारचा पहाटेचा निसर्ग खुपच मनोहर दर्शन घडवतो…..आपल्याला स्वतःशी बांधून ठेवतो. चालता चालता अनेकविध पक्षांचे गुंजन कानी पडते….. मन प्रसन्न होते. अगदी क्षणा- क्षणाला आकाशात ढगांचा ताफा बदलतो…..एखादा पांढरा शुभ्र……तर एखादा काळसर राखाडी…… सुर्याच्या अनेकविध छटा तर पापणी लवते- न- लवते तोवर रंग बदलून मोहीत करतात……पाहता पाहता आपलीच नजर हलणार नाही…….इतकं मोहक निसर्ग सौंदर्य…… मनपटलावर ही सारी चित्र रंगवून मी छाती भरून मोकळा श्वास घेतला, नामस्मरणाला आणि पायाला थोडा वेग दिला तोवर अंबाजी मंदिर आलेच. दर्शनाची प्रचंड इच्छा, पण पुन्हा तेच सांगेन……. आपल्या इच्छेपेक्षा मातेची इच्छा हवी. अंबाजी मातेचं मंदिर उघडायला आजूनही तासाभराचा अवकाश होता. आम्ही कळसाचे दर्शन घेऊन खाली उतरण्याचा निर्णय घेतला…..दर्शनासाठी मन थोडं कासावीस झालं खरं…… मी भरभर मंदिराच्या पायऱ्या चढून वर गेलो. मंदिराच्या उंबरठ्यावर डोकं टेकून नमस्कार केला. उंबरठ्यावरचं कुंकु कपाळाला लागलं……एक अनामिक विजेसारखा प्रवाह शरीरभर सळसळला. देवीच्या दैवी शक्तीचा प्रत्यय आला. “पुढल्या वेळेस नक्की दार उघड आई…..मी पुन्हा दर्शनाला येईन” म्हणून मनोभावे प्रार्थनाही केली. ती आई आहे…. दयाळू आहे…..ती माझी ही इच्छा नक्कीच पूर्ण करेल……हा माझा विश्वास आहे. अंबाजी मंदिराच्या पर्वतावरून खाली सगळी जैन मंदिरे स्पष्ट, ऐसपैस दिसतात. नेमिनाथ मंदिराचा वाड्याचा परिसर तर खूप मोठा आणि प्रशस्थ दिसतो. प्रत्येक मंदिरावर केलेलं नक्षीकाम विलोभनीय आहे. उतरून खाली येताना नेमिनाथ मंदिर प्रवेशद्वार दिसले……. थांबलो. मी आणि श्री. सुधीर जोर्वेकर येताना आम्ही दोघंच भरभर उतरत होतो. आम्ही दर्शन करुन येऊ असं ठरवलं.
सकाळचे सात वाजून गेले असतील म्हणून मंदिर उघडले होते. आम्ही पटकन दर्शन घेऊन येऊ म्हणून आत शिरलो. मंदिराच्या सुरक्षारक्षकाने पादत्राणे, सामान, काठी सारे एका कोपऱ्यात ठेवण्याची सूचना केली. हात पाय धूतले आणि मंदिर परिसरात प्रवेश केला. मंदिर परिसर खूपच प्रशस्थ आहे आणि प्रत्येक खांब, घुमटावर बारीक, अप्रतिम कोरीव काम केलेले आहे. बघणाऱ्याला हे कलाविश्व थक्क करणारे आहे. “एवढ्या उंचीवर एवढे मोठे मंदिर कसे बनवले असेल ?” हा एकच विचार माझ्या मनात रुंजी घालत होता. बांधणाऱ्याला आणि त्यांच्या कल्पनाशक्तीलाही मनोमन नमस्कार केला. मंदिराची साफसफाई सुरुच होती. एकही कागदाचा कपटा नाही….. की बारीकसारीक दगड नाही….. सगळंच एकदम आरशासारखं….. स्वच्छ……लखलखीत. आम्ही दोघं गाभाऱ्यात दर्शनासाठी गेलो. गाभाऱ्यात जरा अंधार होता. आपण दिवाळीला काचेच्या ग्लासात पाण्यावर तेल ओतून जे दिवे उजळवतो, तशा अनेक मिणमिणत्या दिव्यांनी गाभारा उजळला होता. अगदी तिरुपती सारखंच, त्या दिव्यांच्या मंद प्रकाशात नेमिनाथ महाराजांचे दर्शन झाले. काळ्या पाशाणातील ही अतिशय सुबक नितळ मूर्ती, नक्षीदार सुवर्ण मुकूट, चांदिचे डोळे आणि चेहऱ्यावर स्मित हास्य. दोन मिनिटे आपला आपल्या नजरेवर विश्वास बसणार नाही एवढे सुंदर सगुण रुप. मी तर काळ्या पाशाणातील अशी मूर्ती प्रथमच पाहीली, मुंबईत पाहिल्या आहेत त्या सगळ्या मुर्त्या संगमरवरी, पाढ-या शुभ्र आहेत. थोडावेळ बसलो….. प्रसन्न वाटले. ह्या मंदिराचा परीसर शुभ्र दगडाचा तर मंदिर काळ्या पाशाणात कोरले आहे. गाभाऱ्यातून बाहेर आलो तर….जैन भक्तांची जरा गडबडच चालू होती. विचारल्यावर समजलं मंदिरा शेजारच्या खोलीत नागराज आले आहेत. आम्हालाही दर्शन होईल म्हणून आम्हीही थोडे थांबलोही…. पण नागराजांचीच इच्छा दिसत नाही, दर्शन देण्याची…..ते बाहेर येईच ना…..म्हणून पुन्हा सामान घेतलं आणि परतीच्या वाटेला लागलो.
भगवान नेमिनाथांबद्दल सांगायचं झालं तर हे जैनांचे बावीसावे तिर्थकर. गिरनारचा उल्लेख करताना नेमिनाथांबरोबरच महासती राजूलदेवीचे नावही घ्यावेच लागेल. राजा उग्रसेन यांची कन्या राजूल हीचा विवाह श्री कृष्णाने नेमिनाथांशी ठरवला असा पुराणात उल्लेख आहे. भगवान नेमिनाथ राजूल देवींसोबत विवाह करण्यासाठी बारातींसह जूनागढवरुन गिरनारला जाण्यासाठी निघाले. उग्रसेन राजाच्या दरबारात पोहोचताना वाटेत त्यांना रस्त्याशेजारी अनेक पशू बांधलेले दिसले. राजाला विचारणा केली असता, ती बारातींचे आदरतिथ्य करण्यासाठी जेवणाची सोय असल्याचं कळलं. ह्या सा-याला आपणच जबाबदार असून, त्या निष्पाप पशूंचे -हदयद्रावक चित्कार ऐकून नेमिनाथांचे मत परीवर्तन झाले, अगदी त्याच क्षणी त्यांना वैराग्य आले. नेमिनाथांनी तात्काळ रितरस जैन धर्माची दिक्षा घेऊन, लग्नबंधनात न अडकता गिरनार पर्वतावर कठोर तपश्चर्या करण्याचे ठरवले. महासती राजूल देवींनीही नेमिनाथांचा मार्ग स्विकारला. त्यांनीही आर्यिका दिक्षा घेऊन गिरनार पर्वतावरच तपसाधना केली. नेमिनाथांचे महानिर्वाणही श्री श्रेत्र गिरनार पर्वतावरच झाले, त्यांनी अनंत तपश्चर्या करुन जेथे देह ठेवला तेथेच हे जैन मंदिर विद्यमान आहे. भगवान नेमिनाथांच्या निर्वाणा नंतर अनेक देव, इंद्र आणि भक्तांनी गिरनारवर निर्वाणकल्याण महोत्सव साजरा केला. तेव्हापासूनच गिरनारची ख्याती जैन तिर्थक्षेत्र आणि प्रसिद्ध सिद्धक्षेत्र म्हणून जगभर पसरली.
परतीच्या प्रवासातली माझ्या मनाची स्थिती, पायऱ्यांवर दिसलेली वन्य वानरे, या गिरनार यात्रा प्रवासाची चिरशांती प्रदान करणारी सांगता….. सगळं सांगणार आहे पुढील शेवटच्या भागात….. पुढल्या रविवारी …..जय गिरिनारी.
July 25, 2020 at 10:21 pm
वाचून मन प्रसन्न झाले.फार सुंदर
July 26, 2020 at 3:56 pm
खुप सुंदर मन प्रसन्न करणारे वर्णन.
स्वत: तीथे अससल्याचा भास झाला.
असच छान लिहीत रहा.
खूप खूप शुभेच्छा.
॥जय गिरीनारी॥
July 25, 2020 at 10:46 pm
sunder
July 26, 2020 at 9:53 am
Khup sundar anubhav.,,.. Jai Girnari
July 26, 2020 at 10:15 am
खुप सुंदर प्रचिती हे सारं वाचताना…. मन थेट महाराजां चरणी जाऊन पोहोचते…. लिहीत रहा …. आनंद देत रहा…. जय गिरिनारी.
October 31, 2024 at 2:06 am
Awaiting moderation
buy prometrium for sale – clomiphene 100mg us cheap clomiphene for sale