एका घनदाट जंगलात, टुमदार मोठ्या झाडावर खारूताई आणि पोपटराव दोघे राहत होते. दोघे एकमेकांचे खूप छान मित्रही होते. दोघांचीही घरे छान मोठ्ठाली होती. खारूताई जमिनीवरून उचललेल्या डहाळया, पाने, कापूस आणि इतर मउ वस्तूंनी बनवलेल्या घरट्यात राहायची. पोपटरावांची एक मस्त ढोली होती. खारुताईला फळांच्या बिया, हिरव्या भाज्यांचे तृण फार आवडायचे. आक्रोड हे फळ तर तिचे प्राणप्रिय. भरपूर प्रथिने आणि स्निग्ध पदार्थांनीयुक्त आहारामुळे कदाचित खारूताईला झोपही खूप यायची. इतरवेळी ती आपली झुबकेदार शेपटी ऐटीत मिरवीत सर-सर झाडावर चढायची, भर-भर खाली उतरायची….. दिवसभर वर-खाली  करत रहायची, पण डोक्यावर घामाचा एक टिपूस नाही……सदैव टवटवीत.
पोपटराव मस्त आपल्या धुंदीत पंख पसरुन बागडायचे. आपल्या आवडीचे पेरू शोधत दिवसभर या झाडावरून त्या झाडावर घिरट्या घालत राहायचे. आपल्या मंजूळ शिळेने सगळ्यांना आनंद द्यायचे.
खारुताईला दिवसभर झाडावरुन वर खाली करता करता, एकदा तिच्या झाडाखाली दोन पेरू सापडले तिने ते फार चतुराईने एक एक करून आपल्या घरट्यात आणून ठेवले
पोपटरावांनाही दिवसभर भटकून चार आक्रोड सापडले. आपल्या खारुताईला आक्रोड खूप आवडतात हे त्यांच्या ध्यानात होतेच. पोपटराव ते आक्रोड घेऊन लागलीच शिळ घालत खारुताईला भेटायला आले, “तुला आक्रोड आवडतात ना …….हे घे ” असं म्हणून पोपटरावांनी खारुताईला चारही आक्रोड देऊन टाकले. खारुताईला आक्रोड पाहून खुश झाली. खारुताईनेही पोपटरावांना एक पेरू दिला आणि म्हणाली “मलाही आज एक पेरू सापडला…… तो तू खा” पोपटरावांनाही तो पेरु पाहुन खूप आनंद झाला. दोघांनी आपला खाऊ भरभर संपवला, खूप मस्त गप्पा मारल्या आणि रात्र झाल्यावर आपापल्या घरी निघून गेले.
पोपटरावांना ढोलीत गेल्या गेल्या आवडीचा पोटभर पेरू खाऊन मऊसूत कापसाच्या गादीवर निवांत झोप लागली. खारुताईला मात्र झोप येईना…..ती सतत मऊसूत गादीवर इकडून तिकडे कूस बदलत राहिली…..तिच्या मनात एकाच विचार येत होता….. तो विचार काही केल्या तिला काही झोपू देईना….तो विचार असा, “कि मी जसा एक पेरू लपवला तसा पोपटरावांनीही एखादा आक्रोड लपवला असेल का ? तो हि आक्रोड आपल्याला मिळाला तर कित्ती मज्जा येईल ?” या एका प्रश्नाने तिला रात्रभर झोपच आली नाही.

सकाळी सकाळी पोपटराव एकदम ताजे तवाने होऊन फांदीवर बसून शिट्ट्या वाजवत होते. झोप पूर्ण झाल्याने खूप आनंदी आणि ताजेतवाने दिसत होते. खारुताई मात्र दमल्यासारखी, निस्तेज, शक्तीहीन दिसत होती. पोपटरावांनी तिची विचारपूस केली असता खारुताईने त्यांना सगळी खरी-खरी हकीकत सांगितली, तिने दुसराही पेरू त्यांना दिला आणि आपली चूक काबुल केली. पोपटरावांनाही खारुताईच्या खरेपणाचे खुप कौतुक वाटले. खारुताईला तिच्या खोटेपणाची चूक समजली, त्याची शिक्षाही तिने रात्रभर भोगली म्हणून त्यांनी तिला शाबासकी दिली आणि दूर आभाळात भूर्र उडून गेले. पोपटरावांसारखा समजूतदार मित्र आपल्याला मिळाला याचा खारुताईलाही आनंद झाला. म्हणूनच, मित्रहो कधीही, कुणाशीही खोटे बोलू नका. तुमचा खोटेपणा तुम्हाला कधीही शांत झोपू देणार नाही. मनात जगवा खरे बोलण्याचे रोप, तेव्हाच येईल …….”सुखाची झोप.”