जय गिरिनारी – पुष्प ४

अंबा मातेच्या मंदिराशेजारीच गुरु गोरक्षनाथ शिखराकडेजाण्यासाठी रस्ता आहे. पायऱ्यांपाशी कमरेएवढा कडा आहे. मी माझे सहप्रवासी येईपर्यंत चढून त्या कड्यावर जाऊन बसलो. खाली पाहीलं तर खोल, अंधारी दरी. थोडा टेकून बसलो…… एकाएकी डोळे बंदच झाले……सहप्रवाशाने उठवले….. दोन क्षणच……. पण एवढी गाढ झोप लागली…… ती ही निश्चिंत…….सगळा थकवा हवेत विरुन गेला…… बाजूला खोल दरी असूनही भीती नाही वाटली. इतकी निर्भयता कुठून येते. अहो साधं मला आमच्या इमारतीच्या गच्चीवरुन खाली पाहीलं तरी भिरभिरी येते. ही निर्भयताच तर या पर्वताचा आपल्याला आधार आहे. जो आधार कायम या प्रवासात आपली सोबत करतो…… आपल्याला निश्चिंत करतो. आपल्याला आपलंस करुन घेतो. मग कोणतचं भय राहत नाही. आपण नकळत त्या दैवी शक्तीच्या वलयात वेढले जातो…..त्या शक्तीशी एकरुप होतो……. “निशंक हो… निर्भय हो… मना रे…. प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे” या शब्दांचीही प्रचिती येथे येतेच येते. इथून पुढे सरळ समोर दुसऱ्या डोंगरावर ५,५०० पायऱ्यांवर श्री गोरखनाथ मंदिर हे स्थान दिसते. त्या स्थानाला भेट देताना मधे एक शंभर दिडशे पावलांचा सरळ रस्ता आहे. या रस्त्याचे वैशिष्ट्य असं की या रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप खोल दरी आहे. चालताना वारा इतका प्रचंड वेगाने घोंगावत आसतो….. आपल्या कानात सुर्रssss सुर्रssss रुंजी घालत असतो…..पावलं थोडी लटपटतात……. तरीही चालत राहतात…….अविरत……अंगावर सरसरुन काटा येतो…..आणि ……..आपला दत्त दर्शनाचा संकल्प आणखी दृढ होतो. आम्ही पोहचलो तेव्हा साधारण सकाळचा पहीला प्रहर म्हणजे एक-दिड वाजला असेल. पायऱ्यांच्या उजव्या हाताला गोरक्षनाथांची अखंड धूनी आहे आणि डाव्या हाताला मंदिर आहे. बांघकाम जरा चालू आहे. मंदिर तसे छोटेच आहे ८ X १० चौ.फूट असेल. आत उभी गोरक्षनाथांची मूर्ती आहे. ही मूर्ती चतुर्भूज, शिवस्वरुप आहे. आम्ही नतमस्तक होऊन दर्शन घेतले. कोपऱ्यात बसलेल्या एका सद्गृहस्थाने हातावर खाडी साखरेचा प्रसाद ठेवला. पटकन खडीसाखर तोंडात टाकली. त्या साखरेचा आणि दर्शनाचा गोडवा एकच. इकडे विभूती देतात, मंदिरा समोरच धूनी जवळ एक महाराज विभूती वाटप करत होते. विभूतीसाठी बरीच गर्दी होती, म्हणून आम्ही घेतली नाही. हे गिरनार पर्वतवरील शिखरांपैकी सर्वांत उंच स्थान आहे. समुद्र सपाटीपासून ३,६६६ फुटावर हे स्थान येते. पुढे डाव्या हाताला १० X १० चौ. फूट चौथ-यावर एक खुपच लहन, दिड-दोन फूटाचे छोटेखानी फार जूने मंदिर आहे. यात गोरक्षनाथांचीच संगमरवरी मूर्ती विराजमान आहे. मंदिरा समोरच पितळेची थोडी मोठी घंटा आहे. या मंदिरासमोर चौथ-यावर बसलं कि प्रचंड हवेच्या झोतात आपण अधांतरी उडत असल्याचा भास होतो. प्रत्येक भावीक ती घंटा वाजवून पुढे जातो. तो घंटानाद वातावरणात कमालीची उर्जा निर्माण करतो. याच स्थानाला “गुरु गोरक्षनाथ टुंक” असेही म्हणतात. या स्थानावर गेली बारा वर्षे मंदिराची व्यवस्था मंहत श्री. सोमनाथ हे पाहतात. त्यांचा श्री. दत्त संप्रदायातील “सेवा” या शब्दावर नितांत विश्वास आहे.  या पवित्र स्थानामागची कथा अशी, की श्री. दत्तात्रयांच्या सेवेसाठी नाथ संप्रदायातले गुरु गोरक्षनाथ गिरनारी आले. त्यांनी दत्ताची खूप मनोभावे सेवा केली. त्यांना प्रत्यक्ष दत्तमहाराजांनी पर्वतावर दर्शन देऊन कृपांकित केले आहे. नवनाथानां गुरु दत्तात्रेयांनी याच ठिकाणी गुरुमंत्र दिला होता. नवनाथ संप्रदायातील श्री गोरक्षनाथांनी याच ठिकाणी घोर तपश्चर्या केली आणि आजही गुप्त रूपाने गोरक्षनाथांचा येथे वावर आहे अशी भाविकांची धारणा आहे. साधारण गुरूचे स्थान हे शिष्यापेक्षा उंचीवर असते. गोरक्षनाथांनी महाराजांकडे प्रार्थना केली होती की “गुरुचरणांचे दर्शन मला सतत व्हावे” गुरूसेवेचे फलीत म्हणून दत्तमहाराजांनी हे मान्य केले. यामुळे गोरक्षशिखर सर्वात उंचावर आहे. समोरच गुरु गोरक्षनाथांची अखंडधुनी आहे व याच स्थानावर गुरु गोरक्षनाथांनी चौऱ्याऐंशी सिध्दांना उपदेश केला. शेजारीच एक पाप पुण्याची खिडकी (बारी) आहे. म्हणजे एक छोटा बोगदा आहे. एका बाजूने त्यात आत शिरायचे व दुसऱ्या बाजूने सरपटत बाहेर पडायचे. यातून बाहेर पडणाऱ्यास मोक्षाचा मार्ग मिळतो असा समज आहे. इथेही थोडी गर्दीच होती आणि अंधार फार होता, म्हणून आम्ही दर्शन घेउन पुढे निघालो.आपल्या यात्रेचा दुसरा पर्वत आणि दुसरा टप्पा इथेच संपतो. इथून अगदी नजरेसमोर पाहीले असता पुढे एका सुळक्यावर निळसर रंगाचे छोटेखानी मंदिर दिसते. हेच ते गुरु दत्तमहाराजांचे दिव्य पादुकांचे गुरुशिखर स्थान आहे. ज्या गुरुशिखराच्या दर्शननानेच मनात एक उर्मी दाटून येते. नजरेच्या टप्यात एखादं किलोमीटरवर दिसणारं हे स्थान गाठण्यासाठी मात्र शक्तीची उपासना करावी लागते. आपण उभे आहोत ते गुरु गोरक्षनाथांचं शिखर पुढे पूर्णपणे खाली उतरुन हे श्री. दत्त शिखर पुन्हा चढावे लागते. गुरु गोरक्षटुंक नंतर यात्रेकरूंना थोडासा दिलासा मिळतो. कारण पुढच्या शिखरावर जाण्यासाठी साधारण १,५०० पायऱ्या डाव्या हाताला खाली उतराव्या लागतात.

भगवान दत्तात्रेयाची सगुण उपासना करताना चरण पादुकांची उपासना हिच सर्वश्रेष्ठ मानली जाते. तसेच आकाशातील चांदण्याचे अवलोकन करणे हाही काही साधकांचा दत्त उपासनेचाच भाग असल्यामुळे या स्थानावरून पहाटेच्या अथवा रात्रीच्या वेळी अवकाशाचे विहंगम दृश्य दिसते, ते येथे येऊनच अनुभवावे. पावसाळ्यात तर येथील अनुभवाचे शब्दात वर्णन करणेच अशक्य आहे. ढगसुध्दा शिखरापासून खाली असतात. आपल्यासारख्या सामान्य माणसाचे मन हे दुर्गुणांचे माहेरघर आहे कदाचित् म्हणूनच या गुरु शिखरापर्यंत जाण्यासाठी १०,००० पाय-या चढून जाव्या लागतात. प्रत्येक पायरीवर एक एक दुर्गुणाचा त्याग करीतच आपण चढायचे….”स्व” ला शोधायचे…. अंतर्मुख व्हायचे….. शेवटच्या पायरीवर आपण त्यागाचाही त्याग करायचा आहे. काम, क्रोध, मोह, माया, मद, मस्तर, पाश हे एवढेच दुर्गुण नाहीत. तर त्यांच्या अनेक शाखा, उपशाखा, पोटशाखाही आहेत. त्या आपल्या जन्मापासूनच आपल्या मनाच्या गाभाऱ्यात खोलवर रुजल्या आहेत. आपल्या नकळत जोपासल्या गेल्या आहेत. प्रत्येक पायरी चढताना त्या समूळ नाहीशा होतील आणि प्रत्यक्ष श्री.दत्त भेटतील अशी प्रत्येक भक्ताला अनन्य आशा आहे. अनेकांना याचा लाभ झाला आहे, तो आपल्यलाही व्हावा हा या गिरिनार यात्रेमागचा खरा उद्धेश आहे. 

थोडे अंतर पुढे खाली उतरल्यावर दोन मोठ्या सोनेरी कमानी लागतात. एक उजव्या बाजूच्या कमानीतून सुमारे ३०० पायऱ्या उतरल्यावर श्री कमंडलू स्थान आहे. डाव्या बाजूच्या कमानीतून पुढे समोर १,००० पायऱ्या चढल्यावर गुरूशिखर हे उभ्या सुळक्यासारखे सरळ उभे दिसते. आम्ही प्रथम श्री दत्तांच्या चरणकमलांचे दर्शन घेऊ असे ठरवून पुढे चढू लागलो. श्रीदत्तगुरुंच्या चरणपादुका उमटलेल्या या शिखरावर चढताना थंडी, वारा, पाऊस या प्रत्येक ऋतूचा अनुभव वेगळाच असतो. आम्हाला भरपूर थंडी जाणवली. सोसाट्याचा वारा सुटला होता. मी कानटोपी आणि इतरांनी उबदार झिपर (स्वेटर) घातले होते तरीही थंडीची जाणीव होत होती. मनोमनी श्री. दत्त दर्शनाची ओढ आता उत्कट झाली होती. काही क्षणातच आपण त्या दिव्य चरणकमलांसमोर उभे असू ही भावना मनात एक वेगळंच चैतन्य निर्माण करत होती. याच स्थानावर बसून भगवान श्रीदत्तात्रेयांनी १२,००० वर्षे तपश्चर्या केली आणि म्हणूनच हे त्यांचे अक्षय निवासस्थान आहे अशी श्रद्धा इथे येणाऱ्या सर्व दत्तभक्तांमध्ये आजही आहे आणि त्या दत्त पादूकांच्या दर्शनासाची ओढ इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर आपल्याला स्पष्ट दिसते.

आमचे झालेले श्री. दत्त दर्शन, कमंडलूकुंडाच्या उत्पत्तीची ५००० वर्षापूर्वीची कथा, सुवर्ण कमानी जवळून दिसणारा अत्यंत विलोभनीय नंदि पर्वत……. सारं काही सांगणार आहे…… शब्दांत मांडणार आहे…. पुढील भागात…. पुढच्या रविवारी ….. जय गिरिनारी

जय गिरिनारी – पुष्प ६

गुरु शिखर
तीन टप्पे – तीन पर्वत
पौर्णिमा
उजव्या हाताला गोरक्षनाथ मंदिर
गुरु गोरक्षनाथ अखंड धूनी
चौथ-यावरचं छोटेखानी गुरू गोरक्षनाथ मंदिर
गुरु गोरक्षनाथांना श्री दत्तदर्शन आणि अनुग्रह
सुवर्ण कमान श्री गुरु दत्त द्वार आणि श्री कमंडलू कुंड द्वार