जय गिरिनारी – पुष्प २
एकदा गुरुतत्वाची ओढ लागली की त्या तत्वापर्यंत पोहोचण्याचं बळ आपोआप मिळतं. मन प्रार्थनेत उतरतं आणि एकचं मागणं मागतं, “पंखात या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे..!!!”  हा ध्यासच लागणं महत्त्वाचं. एकदा तो लागला की, माणूस माणूसच रहात नाही. आपण नेहमीच म्हणतो, देव माणसात शोधावा, तसा तो देवपणाला पोहोचतो. प्रभू श्रीरामाचे तसेच पांडवांचेही वास्तव्य या गिरनार पर्वतावर झाल्याचे अनेक दाखले आपल्याला पुराणांत मिळतात. त्यांचीही छोटी छोटी मंदिरेही पर्वतावर आहेत. पुराणांमध्ये याचा श्वेताचल, श्वेतगिरी अशा नावाने उल्लेख आढळतो, तसेच गिरनार हा हिमालयापेक्षाही प्राचीन असल्याचा संदर्भही पुराणात मिळतो. वरील सर्व गोष्टी गिरनारच्या दिव्यत्वाशी निगडीत आहेत. गिरनार पर्वताचा हा परिसर अत्यंत निसर्गरम्य, विलोभनीय, वन्यप्राणी, जीव- जगताने संपन्न तसेच विविध औषधी वनस्पतीने युक्त असा आहे. कित्येक संतांना याच ठिकाणी श्री. दत्तप्रभूंनी साक्षात् दर्शन दिले आहे. अनादीकालापासून कित्येक सिद्धयोगी गिरनारच्या गुंफामध्ये आजतागायत साधना करत आहेत. बाबा किनाराम अघोरी, श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज, रघुनाथ निरंजन, नारायण महाराज, यांसारख्या संताना इथे दत्त महाराजांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ झाला आहे. ही भूमी योगी सिध्द महात्मे यांनी संपन्न केली आहे. म्हणूनच आजही अनेक जण गिरनार पर्वतावर त्यांच्या स्थानावर तपश्चर्येला बसलेले आढळून येतात. गिरनार पर्वताच्या पायथ्याला म्हणजेच तलेठीला भवनाथ मंदिर, भगवान महादेव मंदिर, मृगी कुंड, लंबे हनुमान मंदिर अशी प्राचीन प्रेक्षणीय स्थळे आहेत. असा हा श्री गिरनार  पर्वत तेजोमय भगवान श्रीदत्तप्रभू यांचे हे अनंत अक्षय निवासस्थान आहे.  

आमच्या मंगलम हॉटेल शेजारीच हे महादेवाचे भवनाथ मंदिर होते. मागे भलेमोठे महादेवाचे शिवलिंग आणि पुढे सुवर्ण रंगाचे मंदिर अशी विलोभनीय रचना आहे. महाशिवरात्रीला येथे पाच दिवसांची जत्रा भरते. तेथेच मंदिराशेजारी मृगी कुंड आहे. शिवरात्रीच्या मेळ्याला या कुंडाजवळ भावनाथ महादेवाच्या दर्शनाला १० ते १२ लाख लोक जमा होतात. मृगी कुंडातील सिध्दांचे स्नान हे या यात्रेतील प्रमुख आकर्षण असते. अशी एक आख्यायिका आहे कि, स्वयं शिव महाशिवरात्रीला या कुंडात स्नानासाठी येतात. मृगी कुंडामध्ये महाशिवरात्रीला स्नानासाठी अनेक नागा साधू येतात. हे नागा साधू स्नानाला जेंव्हा उतरतात, त्या साधूंमध्ये असा एक साधू असतो, की जो मृगी कुंडात डुबकी मारल्यावर बाहेर येत नाही, अंतर्धान पावतो. तोच स्वयं शिव असतो अशी मान्यता आहे. मी थोडा आराम करून सायंकाळी ६ च्या सुमारास ह्या भावनाथ शिवमंदिर दर्शनासाठी गेलो. सोनेरी रंगाचे खांब आणि कमान असलेले हे मंदिर खुप ऐसपैस आहे. सुवर्ण वास्तूशिल्पकला अतिशय विलोभनीय आहे. मंदिर परिसर अतिशय स्वच्छ असून साधारण दोन अडीच फुटाचे काळ्या पाषाणातील शिवलिंग आहे. लिंगावर चंदनाने त्रिपुंड, डोळे आणि फुलांचा शुंगार केलेला असतो. शिवलींग दर्शनाने भगवान शिवशंकराच्या भैरव रुपाची आठवण होते. असेच जागृत उग्र रुपाचे शिवलिंग उज्जेनला महाकालेश्वर येथे आहे. या भावनाथ मंदिरा शेजारीच मी आधी वर्णन केलेले विख्यात मृगी कुंड आहे. २० X २० फूट लांब रुंद, फार खोल नाही, तळ अगदी स्पष्ट दिसतो. पाणीही खुपच शुद्ध आहे. पाण्यात काही छोटे-मोठे मासे विहार करीत होते. त्या माशांना पाहून त्यांना खाऊ घालण्याचा मोह मला झाला पण बाजूलाच गुजरातीत लिहिलेली पाटी नीट वाचली, त्यातल्या सूचना खरंच पटल्या, मंदिराची पवित्रता जपण्याकरीता स्वतःला आणि मनाला थोडा आवर घातला. अतिशय प्रसन्न असे हे भावनाथाचे मंदिर आणि मृगी कुंडाचा शांत परिसर आहे. रात्री नऊला गिरिनार पर्वतारोहणाला निघायचे म्हणून आता आराम करू असे ठरवून मी मंदिरातून निघालो. साधारण हाॕटेलवर परत येईपर्यंत सात-साडेसात वाजले असतील, येऊन थोडा आराम केला. आराम करता करता विचारचक्र इतक्या वेगात फिरायला लागली की उसंतच मिळेना. मी पायऱ्या चढू शकेन कि नाही ? किती वेळ लागेल ? प्रवास झेपेल का ? व्यवस्थित दर्शन होईल कि नाही ? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता माझे पाय अचानक दुखायला लागले. खरंतर विचार करुन डोके दुखायला हवे. अचानकच काय झाले, कळेच ना. पायाच्या पोट-या भरुन आल्या. थोडीफार कळही जाणवू लागली. तरीही मी मनाशी पक्के ठरवले होते, इथवर आलोय , आता माघार नाही. काहीही झाले तरी श्री दत्त दर्शन घेऊनच परतायचे. “श्री स्वामी समर्थ” नामाचा जप केला, पायाला थोडे तेल लावून मसाज केला. थोडे बरे वाटले. रात्री आठला सगळी तयारी करून जेवायला खाली उतरलो. पर्वत चढताना प्रवासात काही त्रास होऊ नये म्हणून हॉटेल मध्ये गरम गरम मूगडाळीची खिचडी आणि ताकाची कढी असा साधा बेत होता, चव फार छान होती. प्रसाद म्हणून पोटभर खिचडी खाऊन घेतली. अशा धार्मिक यात्रेत जे काही जेवायला मिळेल ते “अन्न हे पूर्णब्रह्म” मानून, प्रसाद म्हणून ग्रहण करावे. एकूणच गिरनारच्या पायथ्यला असलेले तलेठी हे एक साधं गाव आहे, जुनागड शहरापासून थोडं दूर आहे. गिरनार पर्वतामुळे या गावाला एक वेगळी ओळख मिळाली आहे, तसेच काहीशी हॉटेल्स, चहा -पाण्याची टपरी, छोटी दुकाने, रिक्षा स्टँड अशी छोटी मोठी उपजीविकेचे साधने उपलब्ध झाली आहेत. आमच्या मंगलम हॉटेल पासून गिरनार पर्वताच्या पायथ्याची कमान फक्त तीन मिनिटावर होती. बरोबर रात्री नऊ च्या सुमारास आम्ही चालायला सुरवात केली.

गिरनार चढण्यासाठी काठीची गरज असते, चढताना तोच एक भक्कम आधार असतो म्हणून मी आणि सहका-यांनी एका जवळच्या दुकानातून प्रती ३०/- रु प्रमाणे काठी घेतली. हि काठी परत आणून दिली कि २०/- रु. परत देतात. पहिल्याच पायरीवर डोकं टेकून दत्त महाराजांना शरण जा. निश्चिंत व्हा. महाराज सुखरूप नेऊन आणतील असं सगळ्यांकडून सांगण्यात आलं. आम्ही पहिल्या पायरीपाशी पोहचलो. थोडी गर्दी होती. अनेक यात्रेकरू नारळ फोडत होते. नमस्कार करत होते. पहिल्या पायरीच्या डावीकडे हनुमान मंदिर आहे. हे चढवावा हनुमान मंदिर. अनायसे शनिवारच होता, मारुती रायांनी दर्शन दिले सुखावून गेलो. त्यांना हात जोडून नमस्कार केला, “शक्ती द्या” म्हणून मनोभावे सांगितले. मीही पहिल्या पायरीला डोकं टेकून नाक घासून नमस्कार केला. महाराजांना आता तुम्हीच आहात, माझी यात्रा सफल संपूर्ण करा अशी प्रार्थना केली. एक वेगळीच अनामिक उर्जा शरीरभर संचारली. उजवा पाय पुढं टाकून गिरनार चढायला सुरवात केली तसा अंगावर एक सरसरुन काटा आला. कोजागिरिच्या चंद्राच्या साक्षीने एक परकाया प्रवेशच झाला. घड्याळी रात्रीचे ९.१५ वाजले होते.  पायऱ्या चढताना डाव्या हाताला खूप छोटी-मोठी अनेक मंदिरे आहेत. गणपती देवता, काली माता, शंकराची अशी विविध मंदिरे आहे, त्यांची दर्शने आणि आशिर्वाद घेऊन आम्ही पुढे चालत राहिलो. सुरवातीला दोन दोन पायऱ्या आहेत. त्या पुढे चालता चालता तीन चार होत जातात. हळू हळू चढू, घाई करायची नाही असे आम्हीच ठरवले होते. सुमारे २०० पायऱ्यावर डावीकडे श्री कालभैरवाच्या मुर्तीचे दर्शन होते. दर पौर्णिमेला गुरु शिखरावरील दत्त मंदिर रात्रभर उघडे असते आणि कोजागिरीला तर येथे फार गर्दी असते. दर्शनासाठी उत्सुख भाविकांची संख्या फारच वाढत आहे….आनंदच आहे. याचा प्रत्यक्ष प्रत्यय आम्हालाही आला. पायऱ्यांवर फारच भाविक दिसले साधारण दीड दोन हजार माणसे चढत असतील. सगळे आपापल्या परीने गुरु शिखरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. या भाविकांमध्ये महाराष्ट्रीयन भक्तांची संख्या फारच होती. काही लहान मुलेही होती. वयोवृद्धांसाठी डोलीचीही उत्तम सोय आहे. डोलीवाले माणसाच्या वजनानुसार साधारण ८,००० /- ते १०,०००/- घेतात. डोलीने जा….. पायी जा….. लहानांनी आई -वडीलांच्या कडेवरुन जा…… मनातली दत्त महाराजां बद्दलची श्रद्धा महत्त्वाची…….. ती श्रद्धा तुम्हाला बुद्धी देते……. मार्गदर्शन करते……. तीच श्रद्धाच आपल्याला एक अनामिक उर्जा देते, आणि ही उर्जा आपल्याला आपल्या इच्छित धेयापर्यंत पोहचवते.

गिरनार पर्वतताच्या रोमांचक पौराणिक कथा, अंबा माता कथा, यात्रेचा पहीला टप्पा, …… सगळ सांगणार आहे……. पुढच्या भागात…… पुढच्या रविवारी …..…जय गिरिनारी.

जय गिरिनारी – पुष्प ४

भावनाथ शिव मंदिर, तलेठी, गिरनार
गिरनार पर्वत पहिली पायरी
कोजागिरि पौर्णिमा
गिरनार पर्वत
यात्रेकरू
पौर्णिमा