जय गिरिनारी – पुष्प १

आपल्याला एखाद्या गोष्टीचे वेध लागले की, आपण आपल्या मनातल्या मनात अगदी आदी पासून अंता पर्यंत सगळंच ठरवून मोकळे होतो. हे असं होईल……..ते तसं होईल…… पण ते सगळं तसंच होईल की नाही…….हे ठरवणारे आपण पामर कोण?……. सगळंच विधीलिखी असतं. मलाही सोबत कोण कोण असेल?, किती मोठा गृप असेल? या बद्दल खूपच उत्सुकता होती. मी एकटाच जाणार होतो ना…… म्हणून …… सोबतीची गरजही होती. माणसाला आधाराची गरज ही प्रत्येक क्षणी हवीच असते….. नाही का? मग ती आपल्या माणसांची असो वा देवाची. कुणाचाच आधार दिसला नाही की हे मन त्या ईश्वरी शक्तीपुढे नतमस्तक होतं….. आधार शोधण्यासाठी त्याचाच धावा करतं.

ऐके दिवशी कामात असताना अचानक मॕसेज आला आणि मला माझे तिकीट मोबाईल वर मिळाले. लगेच तारीख, वार, वेळ पाहीली. तिकिटात माझ्या सोबत अजून तीन नावे होती, श्री. प्रकाश करंबळे, श्री. रविंद्र मोरे आणि श्री. सुधीर जोर्वेकर. ही तीन नावे आणि मी चौथा असे चौघांचे एकच तिकिट होते. ही तीन नावे पाहूनच आनंद झाला. मनात एक चांदणी लख्ख चमकली. प्रवासात सोबत म्हणून ब्रम्हा, विष्णू आणि महेश असे हे त्रिमूर्ती दत्तप्रभू सोबतीला आहेत म्हटल्यावर यात्रा निर्विघन होणार याची एकाएकी खात्रीच पटली. मला जी एकटेपणाची भीती वाटत होती, ती कुढल्या कुठे पळून गेली. खरंच…. देव आपली कित्ती काळजी घेत असतो. यात्रेच्या आदल्या दिवशी आमच्या टूर मॕनेजरचा मॕसेज आला. ‘सगळ्यांनी जरा लवकर मुंबई सेंट्रल स्टेशनला पोहोचा. म्हणजे एकमेकांशी छान ओळख होईल.’ मी वेळेवर पोहोचलो. ट्रेनही लागली होती. पण ठरलेल्या जागेवर कुणीच उभे नव्हते. टूर मॕनेजरचाही पत्ता नाही. खुप वाट पाहीली. वाॕट्सप वरुन नंबर शोधून यांपैकी कुणालातरी फोन लावूया म्हणून मोबाईल काढला. हातात धरला आणि पाहतो तर काय? ब्लँक स्क्रीन….. मोबाईल सुरुच होईना…….. काय करावं सुचेच ना…. तेवढयात ट्रेनचा भोंगा झाला. मी पटकन चढलो. माझी सिट शोधली…..धपकन बसलो……काही क्षण काय चालू आहे ….. कळायला मार्गच नाही. मोबाईल बंद केला… चालू केला… सिमकार्ड काढलं….परत घातलं….. मोबाईल चालेच ना…… माझं काय चालू होतं मलाच समजे ना….. एक विस- बावीस वर्षाचा मुलगा मला येऊन सीटवर पाहून गेला. मी फार लक्ष दिलं नाही. डोळे गच्च मिटून घेतले….एक दिर्घ श्वास घेतला आणि ठरवलं. इथवर आलोय ….. या पुढेही जाईन…… एकटा ….. तर एकटा…. माझ्या दत्त प्रभूंना भेटून तर येईनच. डोळे उघडले…..तेवढ्यात मोबाईलची लाईट पेटली…… मोबाईल चालू झाला…..उसासा सोडला. पटापट नंबर शोधला. डाईल करणार तेवढयात ट्रेन थांबली. आता काय झालं म्हणून बाहेर डोकावलं तर बोरीवली स्टेशन. मोबाईल हातात तसाच. अनेक प्रवासी चढले, आणि याच प्रवाशांमधे सापडले माझे त्रिमूर्ती. माझ्या आजूबाजूला बसले…… बॕगा ठेवल्या……मुखदर्शन झालं…..ओळखही झाली. त्यांचीही हि पहिलीच गिरनार यात्रा होती. प्रवास सुरु झाला…..प्रवासात समजलं…. तो विस-बावीस वर्षाचा मुलगा…… अरे तोच आमचा टूर गाईड होता…… महेंद्र….. आम्ही त्याला गमतीत महेंद्र (महेंद्र बाहूबली) म्हणायचो.

पश्चिम भारतातील गुजरात राज्यामध्ये (सौराष्ट) जुनागड या शहरापासून गिरनार तळ ५ कि. मी. अंतरावर आहे. मुंबईहुन ११ ऑक्टोबरला निघून आम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे १२ ऑक्टोबर २०१९ ला दुपारी गिरनारला (भवनाथ- तलेठी ) येथे पायथ्याशी असलेल्या हॉटेल मध्ये उतरलो. हॉटेलचे नावही यात्रेला साजेसेच होते ” मंगलम”, म्हणजेच सगळं मंगल होणार आहे, याची दत्तप्रभूंनी वर्दीच दिली होती. समोरच गिरनार पर्वत दर्शन झाले. या पर्वताचा विस्तार सुमारे ४ योजनं म्हणजेच १६ गावांपर्यत आहे. सुमारे २८ चौ. कि. मी.एवढा व्याप्त आहे. सगळीकडेच गुजराती पाट्या, काही इंग्रजीतही होत्या त्यामुळे सोईचे झाले. गुजराती भाषा समजून घेणे तसे फार कठीण नाही बघा. जिलेबी सारखी अक्षरं आणि माणसंही तितकीच गोड. गुजरात मधले रस्ते बाकी खूप छान आहेत मोठे, लांबसडक आणि मुख्य म्हणजे….. खड्डे विरहित. तलेठी गावात पोहोचलं आणि पायथ्यपासूनच वर पाहीलं कि गिरनार पर्वत सुंदर दिसतो. दुपारचे ऊन असल्यामुळे उन्हात किरणांनी न्हाऊन निघतो. नुकताच परतीचा पाऊस झेलून हिरवागार. अर्ध्या पेक्षा जास्त उंचीवर छोटे देवळाचे कळस दिसतात. तिथे साधारण नेमिनाथ भगवान हे जैन तिर्थ मंदिर आहे. उंच डोंगराच्या माथ्यवर एक लालसर नारींगी रंगाचे मंदिर दिसते ते श्री अंबाजी मातेचे मंदिर आहे.

गिरनार यात्रा हि तीन टप्यात विभागली गेली आहे. तीन टप्यांचे तीन वेगळे पर्वत आहे. पहिला पर्वत पूर्ण चढून गेल्यावर दुसरा पर्वत दिसतो जो सर्वात उंच आहे आणि मग दुसऱ्यावरून तिसरा दिसतो. तलेठी गावातून पायथ्यापासून पहिले असता फक्त एकाच पहिला पर्वत दिसतो ज्या पर्वताआड इतर  दोन्ही पर्वत झाकून जातात. पहिला टप्पा (पहिला पर्वत) राजा भर्तृहरी (ऊज्जेन राज्याचा राजा आणि गुरु गोरक्षनाथांचे प्रिय शिष्य) आणि गोपीचंद ( भर्तृहरींचा भाचा) गुंफा, जैन देरासर मंदिर, अंबाजी माता मंदिर. दुसरा टप्पा (दुसरा पर्वत) गुरु गोरखनाथ मंदिर आणि धुनी.  तिसरा टप्पा (तिसरा पर्वत) श्री. गुरु शिखर (दत्त पादुका), कमंडलू कुंड. या यात्रेकरिता एकूणच १०,००० पायऱ्या आहेत.

१०,००० पायऱ्या चढुन जाणं हे शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी पाहणार असलं तरी दत्तभक्तांनी एकदा तरी जायलाच पाहिजे असं हे रमणीय स्थान आहे, याची प्रचिती तिथे गेल्यावर येतेच. वातावरणात दत्त नामाचा महीमा भरून राहीला आहे, तोच आपल्याला भारुन टाकतो. पायथ्यापासून वर पर्वतावर पहिले कि आंबा मातेचे मंदिर आपल्याला खुणावत राहते. दत्त चरणाची अनामिक ओढ लागते. मुखी श्री दत्तनाम नाचू लागते आणि मन हळू हळू स्थिर होत जाते. भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने पुनीत केलेले आणि बारा हजार वर्षे तपाने सिध्द केलेले स्थान म्हणजेच पूर्व इतिहासत गिरनार हा पर्वत अशी येथे दत्तभक्तांची अनन्य श्रध्दा आहे.  भौगोलिक दृष्ट्या असंख्य छोट्या मोठ्या पर्वतांचा, शिखरांचा आणि सुळके यांचा एकूणच समूह असलेला हा परिसर आहे. हवेत थोडा गारवा जाणवतो, संपूर्ण  वातावरण आल्हाददायी आहे. शिवपुराणात गिरनारचा उल्लेख रेवताचल पर्वत म्हणून करण्यात आला आहे. “रेवताचल” यात “चल” म्हणजे पूर्वी हे सगळे पर्वत चल असायचे थोडक्यात हवेत उडायचे असे आम्हांला सांगण्यात आले. स्कंद पुराणात रैवत, रेवताचल, कुमुद, उज्जयंत अशी गिरनारची नावे आढळतात. रेवताचल, कुमुद, उज्जयंत हि नावे त्रैमुर्ती (ब्रह्मा, विष्णू, शंकर) यांच्याशी निगडीत आहेत.

उंच गुरु शिखरावर श्री. दत्त महाराजांच्या पूज्य पादूका आहेत. श्री. दत्तात्रेयांच्या उपासनेत अनेक ठिकाणी पादुका पूजनास अनन्य महत्व आहे. श्री. दत्तात्रेय हे गुरु स्वरूपात सर्वत्र आढळत असल्यामुळे त्यांच्या चरणपूजेचा महिमा वाढलेला आहे. दत्त सांप्रदायात गुरूपेक्षा गुरु चरणांनाच महत्वाचे स्थान आहे. म्हणून दत्त पंथीयात श्रीगुरु व त्यांच्या चरण पादुका यांना फार महत्व आहे. श्री गुरूंच्या वा इष्ट देवतेच्या पादुका पूजण्याचा प्रकार फार पूर्वीपासूनचा आपल्या परंपरेचा भाग आहे. श्रीराम वनवासात असताना भरताने त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून आदर भाव दर्शविला होता. अतिशय प्रिय व्यक्तीविषयी, थोर व्यक्ती विषयी आदर दाखविणे म्हणजे त्यांच्या पायावर डोके ठेवणे. यातील आणखी एक रहस्य असे की, श्रेष्ठ सत्पुरुषांची सारी दैवशक्ती त्यांच्या चरणात एकवटलेली असते. त्यांच्या चरण-स्पर्शाने कंपनाद्वारा ती शक्ती भक्तांत संचारत असल्याचा अनेकांना अनुभव आलेला आहे. नुसत्या पादूका दर्शनानेही पापक्षलन होते, म्हणूनच अनेक दत्तस्थानांत दत्त मूर्तीपेक्षा दत्तपादुकांना महत्वाचे स्थान मिळाले आहे. गिरनार शिखरावर दत्तात्रेयांच्या काळ्या पाशाणातील चरण पादुकाच आहेत. गाणगापूर येथेही श्री नृसिंह सरस्वती यांनी निर्गुण पादुकाच मागे ठेवल्याची कथा आहे. नृसिंहवाडीलाही दत्त पादुकांचीच पूजाकेली जाते. देवगिरीवर जनार्दनस्वामींच्या समाधी स्थानी पादुकाच आहेत. विष्णूचाजसा शाळीग्राम, महादेवाचे शिवलींग तसेच दत्तोपासनेत दत्तांच्या पादुकांना महत्वाचे स्थान आहे. या दत्त पादुकांची पूजा सगुण व निर्गुण स्वरूपात केली जाते. पादूकांच्या दर्शनाने मनी प्रसन्न भाव निर्माण होतात आणि
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी । तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही ॥’ असे नम्रपणे नतमस्तक होऊन आपोआप शब्द ओठी येतात.

गिरनार परिसराची, भवनाथ मंदिराची आणि अलौकिक मृगी कुंडाची कथा सांगणार आहे…… पण …. पुढच्या भागात……पुढच्या रविवारी ….. जय गिरिनारी.

जय गिरिनारी – पुष्प ३

गुरुशिखर
गिरिनार पवित्र डोंगर
कोजागिरि चंद्र दर्शन
दि. २१ जून २०२० सुर्यग्रहण आणि गिरिनार पर्वत
तीन टप्पे… तीन पर्वत
सुर्यास्त