नर्मदे हर…. !!!
या नामातच जादू आहे.
आणि माझी मैया आहेच जादूगार …
तिचं दर्शन जो कुणी घेईल …. तो तिचाच होऊन जातो.
“दर्शनमात्रे मन कामनापूर्ती” तुम्ही फक्त तिचं दर्शन घ्या …
ती तुमचं मन जाणते आणि न मागता तुमच्यासाठी जे योग्य आहे ते भरभरून देते.
नर्मदा पुराणात सांगितले आहे … गंगेच्या स्नानाने तर नर्मदेच्या नुसत्या दर्शनानेच मोक्ष प्राप्ती होते.
८ मार्चला महाशिवरात्री नंतरचा १० मार्चचा रविवार .. नर्मदा माईच्या दर्शनाचा पुन्हा योग जुळून आला.
उज्जैनला श्री महाकालेश्वराच्या दर्शनाला गेलो होतो. दर्शन, सौंदर्यस्थळ पाहून झाल्यावर दुसऱ्याच दिवशी ओंकारेश्वरला जाण्याचा प्लान ठरला.
मला श्री ओंकारेश्वराच्या दर्शनापेक्षा मैय्याला पाहण्याची आणि भेटण्याची ओढ जरा जास्तच लागली होती.
मैय्याला भेटण्याचा काळ खूपच थोडा होता … कारण संध्याकाळी आमची मुंबईला परतण्यासाठी इंदोरहून ट्रेन होती.
पण या थोड्याशा सहवासात तिने खूप काही दिलंय …आणि फक्त दिलयं …
तिच्या दर्शनानेच मी अंतर्बाह्य सुखावून गेलोय.
ओंकारेश्वरला या तिरावर श्री मामलेश्वर महाराज मंदिर आणि दुसऱ्या तीरावर श्री ओंकारेश्वर महाराज मंदिर …
या दोन्ही तिरांना जोडणारी …. भलं मोठं, ३०० फूट खोल पात्र असणारी, विस्तीर्ण पण काहीशी शांत अशी माझी … नर्मदा मैया …
पाहिलंत ” माझी“….. हा तिच्याविषयीचा आपलेपणाही माझ्यात तिनेच निर्माण केलाय …
आपलं मन ….. ती किती…. आणि कसं… वाचते..?? आणि आपल्याला कसं जपते, याचा कालच तिच्या सोबत असतानाचा माझा मला आलेला अनुभव सांगतो …
श्री मामलेश्वर मंदिरापासून थोडं खाली उतरून, बोटीत बसून श्री ओंकारेश्वराच्या दर्शनाला आम्ही जाणार होतो.
उतरताना आजूबाजूला बरीच ढकलगाडीवर दुकानं आहेत … शीतपेयाची, फुलांची, प्रसादाची, रुद्राक्षांच्या माळांची …
जाता जात मला एक दुकान दिसलं …. आणि त्या दुकानात एक चप्पल जोड दिसली … आपली कोल्हापुरी असते ना … तशाच प्रकारची पण काही साधीशी ….
मला खूप आवडली … “येताना बघू ..!” असा विचार करून पुढे झालो .. समोर नजर जाईल तिथे नर्मदा मैय्याचं पात्र डोळ्यांना सुखावत होतं . घाटावर बोट लागली होती, बोटीत बसलो …
मैय्याच्या पाण्यात हात बुडवला आणि विलक्षण समाधान झालं… तो थंडगार स्पर्श क्षणात माझी तिच्याशी नाळ जोडून गेला….
त्या पाण्यात माझी बोटं खेळत होती, की ती खेळवत होती … माझं मलाच कळेना …
बोट नदीत फिरत होती आणि माझी मैया मला तिच्या निसर्ग सौंदर्यात गुंतवत होती …
समोर दिसणारं ओंकारेश्वराचं मंदिर, मंदिरापाठी उभी भव्य जगतगुरु शंकराचार्यांची उभी मूर्ती, उजवीकडे उभं नर्मदेवर बांधलेलं धरण आणि आजूबाजूला उभे काळे खडक.
कुठेही नजर फिरवा .. तिच्या आजूबाजूचा निसर्ग आपल्याला भुलवत राहतो. जल तत्व इतकं आपल्या मनाला स्थिर करतं, त्याने सात्विक भाव वाढू लागतो.
मी ओळखीच्या सगळ्यांना विडिओ कॉल करून मैय्याचं दर्शन दिलं.
इतक्यात बोट समोरच्या किनाऱ्याला लागली … आम्ही श्री ओंमकारेश्वर जोतिर्लिंगाच्या दर्शनाला निघालो …
रविवार असल्याने जरा जास्त गर्दी होती … पण… चलता है … भोले बाबा हैं … तोह सब मुमकीन है ..!!!
आम्ही रांगेत लागलो … पण चप्पला काढायला विसरलो … रांगेतच एका दुकानाबाहेर चप्पला काढल्या ..
दर्शनाला दोन-अडीज तास लागले … गाभारा जरा लहान आहे … पण दर्शन छान झालं …
सगळ्यांना भूक लागली होती म्हणून मंदिर सोडून पटापट खाली उतरलो ….
ज्या दुकानाबाहेर चपला काढल्या, त्या दुकानाबाहेर दर्शनाच्या रांगेत प्रचंड गर्दी झाली होती …
चपला शोधण्यासाठी कसरत करावी लागणार होती… इतक्यात कळलं .. दुकानदारांनी सगळ्यांच्या चपला अजून खाली नेऊन टाकल्यात ..
आम्ही खाली पळालो … खाली एक खूप मोठ्ठा ढीग होता … सगळेच आपापल्या चपला शोधत होते …
सगळ्याच चपला इकडे-तिकडे झाल्या होत्या … खूपच शोध घेऊन मला माझी एकच चप्पल सापडली …
काही केल्या दुसरी सापडेच ना … मी थकून प्रयत्न सोडून दिला … अनवाणी पुन्हा बोटीत बसून किनारा गाठला
चपलेपेक्षा महत्वाचा पावलांना गुदगुदल्या करणारा त्या गारेगार पाण्याचा स्पर्श मला सुखावत होता…
घाटावर उतरल्यावर गोमुखाचं दर्शन घेऊन, मी श्री मामलेश्वर मंदिराच्या दिशेने चालू लागलो …
पुन्हा आजूबाजूची दुकान पाहताना मला तीच चप्पल दिसली, जी मी मंदिरात जाण्या आधी पहिली होती आणि मला आवडलीपण होती.
आता ती चप्पल विकत घेण्याशिवाय पर्याय नव्हता.
त्या विकणाऱ्या बाईला विचारून कळलं माझ्या मापाची आणि या प्रकारची ही एकच जोड आहे.
पैसे दिले .. चप्पल घातली … आणि परतीचा प्रवास सुरु झाला …
याच प्रवासात नर्मदा मैय्याने घडवून आणलेल्या चप्पल पुराणाचे सगळ कोडं सुटलं ….
आपल्या मनातले विचार ती कसे हेरते … ??
आपले लाड कसे पुरवते …???
त्यासाठी आपल्याही न कळत परिस्थिती कशी निर्माण करते …??
त्या परिस्थितीतून तिला हवं ते … हवं तसंच कस घडवून आणते ???
हे सगळं हळू हळू आपलं आपल्यालाच उलगडत जातं …
तिच्या प्रेमाचा बोध होतो …
आपल्यामुळे तिला उगा त्रास झाला, याचा थोडा खेदही होतो …
पण ती आई आहे …. आणि ती आहे म्हणूनच, आपण आहोत …
पिता जरी विटे -विटो, न जननी कुपुत्रा विटे
आपले कळत, नकळत झालेलं असंख्य अपराध तिच्या पाण्यात विरुन जातील, अशी शक्ती तिच्यात आहे.
आपण फक्त शरणागती स्विकारायची …
तिच्या प्रार्थनेसाठी, तिच्याच परवानगीने, तिच्याच पाण्यात उभं राहायचं, तिचं जल ओंजळीत घ्यायचं आणि तिलाच अर्पण करताना सांगायचं…….
“ हे जे काही मी माझं माझं म्हणून मिरवतोय ना … हे सगळं तुझंच आहे आहे… जे काही दिलं आहेस… देणार आहेस … नेलं आहेस… .. नेणार आहेस ….ते निभावण्याची शक्तीही तूच दे …!”
कृतान्तदूतकालभूतभीतिहारिवर्मदे
त्वदिपादकजं नमामि देवि नर्मदे !!
शुभं भवतू
कृष्णार्पणमस्तू
© अनुप साळगांवकर – दादर
दिनांक. १० मार्च २०२४
नर्मदा घाट – ओंकारेश्वर
श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर
श्री मामलेश्वर महादेव मंदिर
March 11, 2024 at 4:03 pm
हर हर नर्मदा मया खुप छान लेख आहे अनुप सर
March 11, 2024 at 4:05 pm
फार सुंदर अप्रतिम
March 11, 2024 at 4:16 pm
🙏🙏हर हर नर्मदे आई
फार सुंदर अनूभूती. यासाठी फार भाग्य लागते जे तुम्हाला लाभले.
सुंदर शब्दांकन. जसे गंगा मातेच्या स्नानाने आपल्या मनोकामन्या पूर्ण होतात त्याच नुसत्या नर्मदा मातेच्या दर्शनाने पूर्ण होतात. फक्त नर्मदा आईच्या जलाप्रमाणे आपले मन ही निर्मल असावे🙏🙏
March 11, 2024 at 4:30 pm
Beautiful ❤️
March 12, 2024 at 4:43 pm
👌खूप सुंदर लिहिलय💐
March 12, 2024 at 1:40 am
श्रद्धा असली की जीवन साध्य होत. नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर, भावपूर्ण लेख. नर्मदारूपी तुमच्या वाहत्या लेखणीने आम्हाला ओंकारेश्वराचे दर्शन घडवले. 🙏🙏 लिहीत राहा.
March 12, 2024 at 3:31 am
अप्रतिम! नेहमी प्रमाणे…
March 12, 2024 at 2:21 pm
नेहमी प्रमाणे सुंदर लेखन. असेच लिहीत राहा. नर्मदे हर नर्मदे हर 👏
March 12, 2024 at 3:44 pm
Sundar shabd rachna
March 12, 2024 at 4:59 pm
अतिशय सुंदर लेख.
खूपच आवडला
March 13, 2024 at 11:49 am
Narmade har Narmade har
Tumcha lekh vachtana me
Maiyala bhetlyacha aanand
Milala khup sunder!
Asech lihit raha tumche
Anubhav ani mala gharat
Basun Pratyaksha darshanacha
Aanand dya
Narmade har!
🙏🙏🙏🌹❤️
March 14, 2024 at 7:44 am
।।श्री गुरुदेव दत्त।।
गिरनारी अनुभुतीनंतर नर्मदा दर्शनाचा तुमचा अप्रतिम लेख –प्रत्येक शब्द आणि वाक्य म्हणजे मैय्या चे दिव्य दर्शनच ।
नर्मदेचे पात्र खोल—विस्तृत पण शांत जणू आईचा मायेचा हातच पाठीवरून फिरतो आहे।
तुमची आणि मैय्याची भेट वाचून शेगाव निवासी संत श्री गजानन महाराजांची नर्मदा भेट आठवली।तुमच्या बोटांना मायेचा स्पर्श झाला।काय अनुभव असेल।
दर्शनमात्रे कामना पूर्ती या ओळींचा खरा अर्थ उमजला।किती व्यापक ओळ आहे।सर्वकश लागू असलेली।मग गणपती असो की मा सप्तशृंगी की पंढरीची विठू माऊली—दर्शनमात्रे——
आणि शेवटी तर तुझे तुलाच अर्पण—जणू काही—–
तुझ्या वनातील तुझीच पुष्पे ,तुलाच अर्पण करू,
गुरु रे पूजा कशी मी करू,
सारे काही अप्रतिमच……
March 16, 2024 at 4:08 pm
Khup chan prachiti aali aahe
Narmade har