का जीव जडतो कुणावर  …? 

माहित नाही. …

हवी- हवीशी वाटणारी माणसं, कायम आयुष्यात रहात नाहीत. वाळू घट्ट धरुन ठेवलेली मूठ हळूहळू सैल पडावी, अन् हातची सगळी वाळूच गळून पडावी…. अगदी असंच होतं.

हे माहीतही असतं ना .. … आपलं … आपल्याला 

एक न एक दिवस ती निघून जाणार आहेत… कणभर देऊन…..नाहीतर मणभर घेऊन.
आपल्याला माहित नसलं तरीही … मनाला सगळं माहित असतं … सगळं जाणवत असतं … कळत असतं… फक्त समजून घ्यायचं नसतं….. नेहमीप्रमाणे.

काही वर्ष … काही महिने .. काही दिवस … काही क्षण … त्यांचं आपल्या आयुष्यात असणं आपल्याला आवडलेलं असतं … अगदी मनापासून. ….पण हवं हवंस इतक्या सहज सोडून देईल ते मन कसलं …

त्यांनी कायम आपल्याच सोबत राहावं … त्यांसोबत आपलंही आयुष्य समृद्ध व्हावं .. असं आपलं-आपलं आपणच ठरवून टाकलेलं असतं…. त्यांना स्वतःशी बांधून, त्यांना गृहीत धरून.

त्यांचा प्रत्येक शब्द नि शब्द झेलत, त्यांच्यासाठीच फूलत, त्यांच्या आनंदासाठी प्रयत्नांच्या तारेवरची आपलीच कसरत पेलत, आपलं बरं चालू असतं.

कापसाचं पीस वाऱ्यावर अलगत तरंगत राहावं … तसं. … सगळं अगदी हळूवार चालत असतं … अन् आपण चालत असलो तरीही जग थांबलेलं असतं.

आपला वेळ, आपले विचार, आपलं जग सगळं सगळं व्यापून टाकलेलं असतं … त्यांनी …. आपण, आपल्यात उरत नाही.

समरस होऊन जातो … त्या व्यक्तीशी.

आपल्याला आवडणारी माणसं आपल्या डोळ्यासमोर असणं हे भाग्यच … हो ना ???

माझंच काय ?… प्रत्येकाचं हे असंच असतं

प्रेम करून घेणारी समोरची व्यक्ती बदलेल कदाचित … पण, प्रेम… प्रेम बदलणार नाही. ती भावनाच इतकी शुद्ध आणि शाश्वत आहे ना …

ज्याला प्रेम कळलं तो तरला… नाहीतर… बुडाला.

ती भावना ननक्की काय करते ? तर भरभरून जगायला शिकवते, नवी उमेद निर्माण करते, स्वप्न बघायला प्रेरणा देते आणि ती पूर्ण करायला उर्जा देते.

तुम्ही कुणावर प्रेम केलंयत का ? तुमचंही हे असंच होतं का ??

म्हणजे …. बघाना …. 

आत्ता या क्षणाला ती व्यक्ती काय करत असेल … ? 

या प्रश्नाचं आपलं आपल्याला सापडलेलं उत्तर … खूप प्रयत्न करून आपण शोधलेलं असतं . 

आपल्याला आवडलेलं असतं …. आपल्याला सुखावत असतं … 

ते उत्तर काय माहितीय … 

आपण सतत त्या प्रिय व्यक्तीचा विचार करत असतो ना …. 

त्यामुळे आपल्याला कायम असंच वाटत असतं, ती व्यक्ती आपल्याच सारखं सतत आपलाच विचार करत असेल…. हो ना.

कुणीतरी आपला विचार करतं … आपल्यावर प्रेम करतं … एकदम भारी आहे नाही….

गुदगुदल्या होतात … हा हा हा हा ….

गालातल्या गालात आनंदाचे उमाळे फुटतात ….

डोळे उघडले तरी … तोच चेहरा

आणि डोळे बंद केले तरीही तोच. … 

त्या चेहऱ्यावरचे हसरे भावही बदलत नाहीत …. 

ते मोहात पाडत असतात आपल्याला.

आपल्या हृदयातला प्रेमाचा झरा हा असाच अविरत आपलंच मन भिजवत असतो.  

आपण काय करायचं ?

आपण फक्त भिजायचं …. चिंब व्हायचं ….

असे क्षण ….. त्या क्षणांनी होणारा आनंद … आणि .. तो आनंद देणारी ती माणसं … सहसा भेटत नाहीत.

ती दुर्मिळ झाली आहेत … पण आपण शोधायची …. शोधून जपायची ….. आपल्यासाठी … आपल्या आनंदासाठी.

हातची वाळू गळून गेली तरी त्या वाळूचे अनेक कण हाताला तसेच चिटकून असतात…. आपला हात घट्ट धरुन… आपण आपला हात झटकायचा नाही….. हाताच्या बोटांनीच जरा गोंजारायचं त्या कणांना आणि कणांसकट मूठ पुन्हा वळायची…. ते कण आपले म्हणून…. आपल्यासाठीच.

कारण एकाच … आपण प्रेमळ आहोत …. आपण निस्वार्थ प्रेम करू शकतो आणि करूनही घेऊ शकतो.

कधीही …

कुठेही ….

कुणावरही ….


शुभं भवतू ….. कृष्णार्पणमस्तु
©™ श्री. अनुप साळगांवकर-  मुंबई