ओढ लागली की इच्छा उत्पन्न होते. इच्छा असली कि मार्ग सापडतो.
या सापडलेल्या मार्गावर नामसाधना करत, अविरत चालत राहायचं
पायाची गतिज ऊर्जा डोक्यापर्यंत पोहोचली कि सुरु होतो तो शक्तीचा प्रवास
मग आपण चालत नाही …
ती शक्ती आपल्याला चालवते, मार्ग दाखवते आणि गंतव्यस्थानापर्यंत पोहचवते.
वारी करायचीय …. वारी करायचीय …गेली अनेक वर्षे मनात होतंच
एक दिवस तरी चालायचं … चालता चालता अनुभवायचं
म्हंटलं यंदा जाऊच …
जेवढं जमेल तेवढंच का होईना … चालू
मग काय …..नाकापेक्षा मोती जड …. सगळीच जय्यत तयारी
ट्रेकिंगची सॅक काढली … भरायला घेतली
जुने बूट फाटले होते. …. नवीन घेतले
पाऊस पाण्यासाठी विंडशीटरआणि थंडी वा-यासाठी ज़िप्पर
मला सगळं व्यवस्थित लागतंच
अहो ऐन वेळी … कुठे धावपळ करणार ना
आणि आपण एकटे असू, तेव्हा आपली काळजी आपणच घेतलेली बरी … नाही का ??
आपण सहज म्हणून एखादी गोष्ट करायला जातो आणि मग त्या गोष्टीचं गांभीर्य हळू हळू आपल्या लक्षात येतंच
गोष्टी जितक्या सहजपणे घडतात तितक्याच त्या समृद्ध करून जातात… नकळत शिकवून जातात…. विचार करायला भाग पडतात.
मग विचारांत ती सहजता राहत नाही …. सजगता होते …
डोळसपणे अनुभवण्याची अनुभूती वेगळीच
“रामकृण हरी … जय जय रामकृष्ण हरी “
“विठूचा गजर … हरिनामाचा झेंडा रोविला”
चालता चालता दिवस उलटून कसा गेला कळलंच नाही
आता जरा आड वाटेला शे-दोनशे पावलांवर हनुमानाचं मंदिर दिसलं.
म्हटलं आज अनायसे शनिवार आहे … दर्शनाला जाऊन येऊ
आत मंदिरात मला दर्शनाला यजयच होतं, म्हणून मी एका जवळच्या वडाच्या पारावर आपलं सामान ठेवलं ….
ठेऊ कि नको माझ्या मनात घालमेल
चोरीला गेलं तर ..?? शेजारीच एक खेडूत बाई बसली होती …रुईचे हार विकत होती. तिने माझ्या कडे बघतलं … तिला माझी तारांबळ, मनाची घालमेल …. सगळं कळलं असेल
ती पटकन म्हणाली ” ठेव रं राजा …. दर्शनाला जाऊन ई … मी बघते तोवर … जा पटदिशी… सांजेची आरत मिळंल “
हुश्श … मी लगबगीनं पायातले शूज आणि सॅक तिच्याजवळ ठेवली आणि निघालो
नुकताच पाऊस झाला होता … फारसा नाही … थोडाच रिपरिप पडला होता.
परावरून देवळात महाद्वारापर्यंत खूप चिखल झाला होता
झपझप पाय उचलून मंदिरात जाऊन आधी पाय धुतले
पंचमुखी हनुमानाचं दिव्य दर्शन झालं… सुखावलो. सांजेची आरतीने मन प्रसन्न झालं…. धडधडणारं काळीज शांत झालं
आता परत जाऊन वारी गाठली पाहिजे, म्हणून घाई करून निघालो
परत वडाजवळ येताना पाय चिखलात माखलेच….
मी पारावर येऊन बसलो
पाय पुन्हा धुवायला हवे होते … त्याशिवाय शूज कसे घालणार … शूज नवीन होते ना….
आजूबाजूला पाहिलं … पाय धुवायची सोय काही कुठे दिसत नव्हती
आता ते पुसायला तरी हवे .. म्हणून मी सॅक मध्ये एखादा खराब कापड आहे का ते शोधात होतो
बाजूची ची बाई… रुईवाली … माझी सगळी गडबड पाहत होती .. गालातल्या गालात हसली
मी बावचळलो … काय बोलावं तिला …. जाऊ दे…
न राहवून तीच म्हणाली … ” फडकं पायजे व्हय … ?”
” हो ते पाय …. “
“बसल्या जागेहून झाडापाठी हात घाल … जे लागलं हाताला ते घ्या वडून … आणि पुसा पाय ” मी हात लांब करून झाडपाठी घातला
हाताला लागेल ते कापड ओढल …. ओढत ओढत संपेच ना… राव
संपूर्ण ओढून काढला तर …. हिरव्या रंगाची अक्खी साड़ी
“ताई चुकून हि तुमची साडी लागली बघा हाताला …. ठेवतो घडी करून “
“आवं … पुसा त्यानंच … “
“काय …?? याने …. साडीने …. नको अहो … धुतलेली दिसतेय””
“आरं राजा … जे पाय इथपत्तूर वारी चालून आले … ते माझ्या साडीला लागले तर काळाभुगा कपाळी लागल्याचं समाधान मिळलं”
मी अवाक …. डोक्यात अस्स गर्रकन काहीतरी फिरलं … आणि सुन्न
आरतीने शांत झालेलं मन पुन्हा प्रार्थनेत उतरलं, मला पुढे काय बोलावं सूचेच ना
मनाच्या पाटीवर कुणीतरी झपकन बोळा फिरवावा
आणि पाटी कोरी व्हावी … असं काहीसं
त्याच चिखलानं माखलेल्या पायात तसेच शूज घातले …. ती साडी डोक्याला लावली, घडीकरून त्या बाईच्या हातात दिली, तिला नमस्कार केला आणि … तडक निघालो
काय आहे हे ???
इतकं समर्पण … कुठून येतं हे सगळं
देवाबद्दलचा हा भाव खरा …. हा भाव नसेल तर आपण हात जोडले…. तो पण दगड आणि…. मनात “मी” पणाचा जपून ठेवलेला…… दगडच
मलाच माझी लाज वाटायला लागली माझं माझं … असं काय चाललं होतं …
माझ्या पायाचा टीचभर चिखल पुसायला तिनं तिची नेसायची वीतभर साडी देऊ केली
मनाचा किती हा मोठेपणा … पण तो असूनही मिरवायचा नाही … साधेपणाने जपायचा … सोपं नाही हो
मला माझ्या पायाचा चिखल दिसला. माझ्या मनाला लागलेल्या “मी ” पणाच्या चिखलाचं काय ?? तो कसा धुवून निघणार आहे. कदाचित तेच ही वारी शिकवतेय … आणि म्हणूनच मी इथे आहे.
देव खरंच देव्हाऱ्यात नाही अहो … तो इथे आहे…..तुमच्या – माझ्यात …
गरजणारे मेघ असुदे … लखलखत्या विजेची रेघ असूदे
निनावी दिशा असुदे .. मुक्याची भाषा असुदे
ब्रम्हानंदाचा नाद असुदे … पांडुरंगाला साद असुदे
तो आहे …. तो सगळीकडे आहे
आसक्ती सोडून …. हे असं निस्पृह होऊन जगता आलं पाहिजे.
त्या खेडूत बाईने…. तिच्या शब्दांने, माझ्या पायावरचा नाही, पण मनावरचा चिखल नक्कीच पुसून टाकलाय
आजही या अशा गोष्टी घडतात … आपलं आपल्यालाच अंतर्मुख करतात
मनाच्या कोऱ्या पाटीवर पुन्हा शब्द उमटतात
वडाच्या या परावरी , अशी शिकविते वारी
चिखल मनाचा पुशीला, आत पांडूरंग पूजिला
शुभं भवतू …
कल्याणमस्तू
श्री. अनुप साळगांवकर
July 9, 2022 at 5:18 pm
अनूप तू अनुपम व्यक्तिमत्व आहेस
July 9, 2022 at 7:48 pm
तुझ्या लेखनाणे वारी अनुभव हुन वाचायला मिळाली खूपच सुंदर लेखन आणि तुझा अनुभव जय पांडुरंग हरी
वासुदेव हरी ^:^
July 10, 2022 at 9:04 am
🙏👍
July 10, 2022 at 3:12 pm
Khoop sunder
June 25, 2023 at 3:39 pm
अतिशय सुंदर लेख. कधीही वारीला न गेलेल्यांनाही विठ्ठल आपल्यापेक्षा जास्त कळलेला असतो.
June 25, 2023 at 4:07 pm
👌👌वाह खुपचं छान लिहिलंय, वारीला गेल्या सारखं वाटतं. जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏🙏
June 25, 2023 at 4:49 pm
तुझं लेखन वाचलं आणि मलाच वारीची अनुभुती आली.
खूप छान लिहिले आहेस.
पांडुरंग हरी
June 26, 2023 at 10:30 am
Tumhi itka sunder varnan lihila
Ki ek kshanat man vari la gel
Khup chan anubhav mahti
Vadachya jhadakhali basleli
Aaji ticha premlal chehra
Sagla anubhavla
Aaplya sarkhya poshakhi
Mansana aajisarkha
Nirvyaj prem nahi
Jamnar 🌹🙏
Asech lihit raha ani aanand
Pasarvat raha 🌹
June 27, 2023 at 3:06 am
Kupa chan ahe
June 27, 2023 at 3:09 am
विठ्ठल विठ्ठल
June 29, 2023 at 7:46 am
जय हरी विठ्ठल. खूप छान शब्दलेखन.
वारीचा अनुभव सुंदर शब्दात वर्णन केले आहे.
खरोखरच वारी केल्यावरच आपण कोण आहोत आणि या ज्जगण्यासाठी प्रत्येक माणसाची चाललेली धडपड आणि मी पणा आपोआप दूर होतो.
प्रत्येकाला मिळालेले हे जीवन हे विधीलखित आहे आणि त्यावर प्रत्येकाचा विश्वास असला पाहिजे.
परमेश्वरा वर विश्वास आणि श्रद्धा आसल्यावर ह्या सर्व गोष्टी आपोआप घडतात.
जय हरी विठ्ठल
January 13, 2025 at 9:08 am
Awaiting moderation
isotretinoin 20mg cheap – order decadron 0,5 mg pills buy linezolid pill