तू समोर बसलीस ना ….
कि विसर पडतोच …. सगळ्या जगाचा ….
सूर्य लयाला जातो … अंधार वाढत राहतो ….
हवेत गारवाही वाढतो … अंगावर सरसरून शहारा येतो
तुझा चेहरा सोडला तर …. आजूबाजूचं सगळंच धुरकट दिसायला लागतं
एक अलवार वाऱ्याची झुळूक येते … तुझ्या केसांच्या बटा गालावर रुळू लागतात, तुझा चेहरा झाकून जातो.
तू हाताच्या बोटांनी कपाळावरुन हळूच बाजूला सारुन कानामागे लोटतेस त्यांना … बळेबळे.
त्यांनाही तुला समोरून पाहायचं असतं …
हिरमोड होतो त्यांचा …
तुला असं ओठ मिटून शांत समोर पाहिलं ना ….
की माझं मला काय होतं …. कळतंच नाही ….
हा क्षण थांबलाय …..
जग स्तब्ध झालंय …..
हृदय बंद पडलंय….. असं काहीसं.
कानामागे मंद स्वरात पियानो वाजायला लागतो ….
ते सूर कानावर पडतात न पडतात … मी त्या स्वरांकडे ओढला जातो न जातो …. तोवरच ते गाणं ….
“चाहे तुम कुछ ना कहो, मैने सुन लिया…
के साथी प्यार का मुझे चुन लिया….  चुन लिया… “
क्लीन बोल्ड ….
वाऱ्यावर पंख होऊन उडत असल्यासारखं……
हे सगळं माझ्यासोबत घडत असताना …
तुझं काय सुरु असतं गं .,… ??
गालातल्या गालात हसून .. .. खालचा ओठ हळूच दाताखाली दाबून … दोन्ही भुवया एकमेकांजवळ आणून … कपाळावरच्या आठ्या वर ताणून … फक्त आणि फक्त माझी मजा बघण.
हो ….
हे असंच होत…. अगदी असंच होत ..
तुझी माझी भेट पहिली असो वा शेवटची ..
हे कायम असंच होणारय ….
तुझ्या कडे पाहत बसलं, कि भुवया दोन वेळा उडवून…
“असा काय पाहतोयस …वेड्यासारखा ?” हा तुझा मला प्रश्नही शब्दविरहित
भान हरपणं … यालाच म्हणतात का गं … ???
असेल कदाचित …
तुझ्या न बोलण्यातही एक गंमत आहे बघ… तुला सांगू ….. सांगतोच.
तू बोलत नाहीस म्हणून … मी हे असं माझं माझ्याशीच बोलत असतो …. तुझ्यावाट्याचंही …..
खरंच बोलून प्रेम व्यक्त करता येतं .. ..
ते न बोलता कसं करायचं … हे तू मला शिकवलंयस.
असं म्हणतात, या बायका ….. खूप बोलतात … गप्प बसतच नाहीत …
तू तशी नाहीसचं….
तू काहीच बोलत नाहीस …
तुझ्या चेहऱ्यावरचा प्रत्येक शब्द वाचता मात्र नक्की येतो …
स्पष्ट आणि अर्थपूर्ण.
तुझं मौन सगळं काही सांगून जातं …
हे तुझं न बोलताही बरंच काही बोलणं
याच्याच …
हो याच्याच …..
प्रेमात आहे मी ….

शुभं भवतू …
कल्याणमस्तू
श्री. अनुप साळगांवकर