तुम्ही फक्त आठवण काढलीत, तर कोण लागलीच भेटायला येईल का ?….. तो येतो
तुम्ही न मागता तुमच्या मनातलं, तुम्हाला जे हवंय ते, उमजून कुणी देईल का ?……. तो देतो
सगळं जग तुमच्या विरोधात असताना, ” तू तुझ्या जागी बरोबर आहेस.” असं खांद्यावर हात ठेऊन, कुणी म्हणतं का ? …. तो म्हणतो
तुम्ही स्वच्छंदी हसावं म्हणून सतत कुणी प्रयत्न करतं का ?….. तो करतो
तुम्ही खूप उदास असाल, तर ” सगळं ठिक होईल” हा विश्वास कुणी तुमच्या मनात निर्माण करतं का ?….. तो करतो.
तुमच्या दुःखावर हळुवार मायने कुणी फुंकर घालतं का ?….. तो घालतो
या आणि अशा अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य आणि सुकर होतात…
फक्त आणि फक्त आयुष्यात कोणत्याना न कोणत्या रूपात, कोणत्याही एका वळणावर …….
मित्र म्हणून …. हा कृष्ण भेटायला हवा…….
आणि हा भेटलेला कृष्ण आपल्याला ओळखताही यायला हवा.
जन्मतः आपल्याला चिकटलेल्या नात्यांच्या पलीकडे … आपल्याला आपल्याहीपेक्षा जास्त ओळखणारा … स्वतःपेक्षा जास्त जपणारा ….
भावनांच्या गोंगाटात आपल्या कानांवर हात ठेवणारा … असा कुणीतरी ….. सापडायला हवा ….
हो ….. हा कृष्ण एकदा भेटायलाच हवा.
आपण कसेही असलो….कितीही गरीब असलो … एक याचक म्हणून त्याच्या समोर जाऊन उभं राहिलो …
तरीही कडकडून मिठी मारून “मी आहे …. तुला आता इतर कुठेही जायची गरजच पडणार नाही”
हे सांगायला ….. आपल्यासारख्या सुदाम्यासाठी राजमहालातून अनवाणी धावत येणारा….
प्रेमाने जवळ घेणारा….. आपल्या भेटीने आनंदी होणारा…. हा कृष्ण भेटायला हवा.
काळाच्या कोळश्याने सारवलेलं आयुष्य सरताना …. नात्यांची घट्ट वीण सैल पडताना … एकाकीपण छळताना… पश्चातापाच्या आगीत जळताना…
वाढणार वय आणि वेळेपरत्वे त्याचे उमगलेले गूढार्थ …. हे सगळं बाजूला सारून …
कर्माचे सडे शिंपायला ….आनंदाने झिंगायला…. वयानूरुप चेहऱ्यावर पडणाऱ्या प्रत्येक सुरकुतीवर हात फिरवायला …
मनातलं मनमोकळेपणाने सांगायला …. दुःखाचं गणित मांडायला…. मांडलेलं सोडवायला … सोडवलेलं समजवायला …… एकदातरी हा कृष्ण भेटायला हवा.
महाभारतात द्रौपदीनेही कृष्णाला “सखा” म्हणून संबोधलंय. ज्याला मनातलं सगळं सांगून मनाची घागर रिकामी करता येते…. उत्तर प्रत्येकवेळी त्याकडे सापडेलच असं नाही… पण प्रश्नाची ताकद कमी होते…. ऐकताना तो कान होतो…. आपल्या हातून चांगलं घडलं तर यथेच्छ सन्मान होतो … आपण लढताना तलवारीची म्यान होतो…. चार युक्तीच्या गोष्टी सांगून अंतरीचं ज्ञान होतो… तो खरा मित्र.
कृष्णानंही हे बहीणभावाचं नातं द्रौपदीला आपली लाडकी “सखी” असं संबोधून मैत्रीनंच निभावलाय.
त्या काळातही पुरुष आणि स्त्री यांची मैत्री इतकी निस्वार्थ आणि निर्मळ असू शकते हे कालपटलावर लक्ख कोरणारा….
जे कठीण आहे ते सहज शक्य करणारा… नात्यातल्याही मैत्रीला खूप वेगळं सिद्ध करणारा.
वस्त्रहरणाच्या वेळी संपूर्ण सभा स्तब्ध, निश्चल उभी असताना, कुणाकडूनच मदतीची काहीच अपेक्षा नसताना, तिने अगदी शेवटचा पर्याय म्हणून त्याला हाक मारलीय …
आणि तिच्या एका हाकेवर, आपल्या बोटाला झालेल्या जखमेवर आपल्या सखेनं बांधलेली चिंधी हळुवार सोडवून त्याने तिला त्याच हाताने वस्त्र पुरवलीयत…. आणि तिची लाज राखून तिचं रक्षणही केलंय.
आपल्याही हाकेला प्रतिसाद देणारा, त्याने पुरवलेल्या वस्त्रांमध्ये आपलंही भूत, भविष्य, वर्तमान सुरक्षित ठेवणारा …… हा कृष्ण एकदातरी भेटायला हवा.
आपल्या आजूबाजूला, आपल्या संपर्कात तो असेलच असे नाही … शोधून तो सापडेलच असे नाही…. नात्यात तो अडकेलच असं नाही…. मित्रांमधे तो गवसेलच असं नाही….
पण तो आहे ….. आज न उद्या तो नक्की भेटेल … ही भावनाच जगण्याची उर्मी देते.
तो नसला तरीही तो असण्याचा होणार भास … त्याचे आधाराचे शब्द … त्याचे सुंदर विचार … एक नवी प्रेरणा … पंखात बळ देते… झेपावण्या आकाश देते…. उडायचं मात्र आपलं आपणच.
त्याचे विचार… त्याचं वागणं… त्याचं बोलणं…
आपल्याला आपलसं करतात … त्याच्याशी कायम जोडून ठेवतात.
पण तरीही …. हा कृष्ण प्रत्यक्ष भेटायलाच हवा.
त्याची ती…. सर्वांना मंत्रमुग्ध करणारी, आपलसं करणारी , भान हरपायला भाग पाडणारी …. बासरी ……नक्की त्या कृष्णाकडे होती का हो ?
कि ती फक्त मैत्रीच होती ?
हो…. त्यांने निर्माण केलेल्या विश्वासाची मनात रुंजी घालणारी …. निस्वार्थ … मैत्रीच होती.
ज्या मैत्रीचे स्वर बासरीतून आजही प्रत्येकाच्या हृदयात वाजतात.
अर्जुन नावाचा वृक्ष जसा छान आणि उंचच उंच वाढतो, विचारांची तितकीच उंची असणाऱ्या अर्जुनालाही “धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे ” असं निक्षून सांगणारा.
“युद्ध हे अटळ आहे, तू फक्त निमित्त आहेस, तू फक्त तुझं कर्म कर.” हे पटवून देणारा. आपलं विराट स्वरूप दाखवून ते पाहण्यासाठी लागणारी दिव्य दृष्टीही देणारा.
वेळीच परखड पण खरी साथ … मग ती सारथी म्हणून असेना… निस्वार्थी देणारा … हा कृष्ण भेटायला हवा.
मंदिरात जसे घंटा वाजवल्यावर नाद निर्माण होतो. वाजवणे थांबवले तरीही काही काळ त्या नादाचा ध्वनी आपल्या कानात गुंजत राहतो …
तसाच हा कृष्ण … कधी येतो … चार शब्द सांगतो … त्याला हवं ते … हवं तसं करून घेतो…
अगदी त्या घंटेच्याच नादासारखं त्याच अस्तित्व सतत जिवंत ठेवतो… ते अस्तित्व स्विकारता आलं पाहीजे… कृष्णाला कायम धरुन ठेवता आलं पाहिजे.
तेव्हा फक्त शंभर होते आज कोट्यावधी कौरव आपल्या अवती-भोवती असतील.
वाईटाचं – चांगल्याशी, सत्याचं – असत्याशी धर्म युद्ध आजही चालू आहे
प्रत्येक क्षेत्र कुरुक्षेत्र आहे
म्हणूनच …..
मौनाचं महाभारत लढायला
स्पर्धेच्या कुरुक्षेत्रात टिकून राहायला
पडलो तर सावरायला
भांबावलो तर थांबवायला
कर्तृत्वाच्या रथावर….
धैर्याचा लगाम सांभाळणारा सारथी म्हणून ….
मित्र बनून ….
हा कृष्ण एकदातरी भेटायलाच हवा.
शुभं भवतू …
कृष्णार्पणमस्तू
श्री. अनुप साळगावकर
December 10, 2021 at 4:34 pm
उत्कृष्ट
December 10, 2021 at 5:45 pm
फार छान. अगदीं खरे आहे. प्रत्येकाला जीवना मध्ये कृष्ण भेटायलाच हवा.
December 10, 2021 at 11:16 pm
धन्यवाद
December 12, 2021 at 1:31 pm
।। श्री गुरूदेव दत्त।।
प्रत्येक वाक्य नव्हे तर प्रत्येक शब्द भावपूर्ण।तरीपण मनाचं एकटेपण दूर करणारे काही शब्द…….
अनवाणी धावत येणारा, वाढणार वय,उमगलेले गूढार्थ, सुरुकुतीवर हात फिरवायला, कोट्यवधी कौरव …….
मला तर वाटत की लेखक च माझ्या जीवनात कृष्ण म्हणून अवतरला आहे।
असच लिहीत रहावे हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना। पूर्ण विराम।
December 23, 2021 at 7:03 pm
Jai shree krishna
June 13, 2022 at 3:44 pm
खूप सुंदर, रसाळ भाषा, आधार देणारा हा कृष्ण समोर उभा केला
December 27, 2022 at 3:43 pm
Im excited to discover this web site. I want to to thank you for your time just for this fantastic read!! I definitely appreciated every part of it and I have you book marked to look at new information in your site.
September 6, 2023 at 4:49 pm
Very nice 👍🙂
September 6, 2023 at 5:56 pm
खूप सुंदर लिहिलंय, मंत्रमुग्ध व्हायला बासरीच लागते असं नाही तर शब्दही पुरतात. दाखवून दिलत तुम्ही. तुम्हाला गवसलाय कृष्ण, तुमच्या लेखणीच्या रूपाने….. लिहीत राहा.
September 6, 2023 at 5:43 pm
👌👌🙏🙏फार सुन्दर शब्दांकन. कृष्ण हा सदैव आपल्या भोवतीच आसतो. पण आपण त्याला ओळखता आले पाहिजे. हे फक्त त्याचा ध्यास व आसक्ती आसल्यावरच कोणत्याही स्वरूपात भेट होते.
आम्हालाही तुमच्या स्वरूपात कृष्ण दिसतो की जो आम्हाला हे सुंदर विचार आत्मसात करावयाची आणि जीवन आनंददायी जगण्यास मदत करतो.
असेच सुन्दर विचार आम्हाला सदैव मिळू दे हीच तुम्हाला विनंती🙏🙏
September 6, 2023 at 6:00 pm
खुप सुंदर लिहिलंय. मंत्रमुग्ध करायला बासरीच लागते असं नाही तर शब्दही पुरतात. दाखवून दिलत तुम्ही. तुम्हाला गवसलाय कृष्ण तुमच्या लेखणीच्या रूपाने…. लिहीत राहा.— भाग्यश्री
September 7, 2023 at 1:40 am
सुंदर लिहिलंय..
September 7, 2023 at 3:24 am
खुप छान लिहिलंय 💐जय श्री कृष्ण
September 7, 2023 at 4:51 am
खरच खूप छान लेख आहे अणि खरोखरच प्रत्येकाला एक कृष्णा नक्कीच भेटोत..
September 7, 2023 at 8:34 am
खुप सुंदर खरंच श्री कृष्ण सारखा मित्र जिवनात
एकदा तरी प्रत्यक्षात भेटायला हवा
September 7, 2023 at 10:00 am
Khupch chhan rachna aani varnan aahe…..