वार्षिक परिक्षा संपून नुकत्याच उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या. सुट्या म्हणजे मुलांसाठी पर्वणीच. दे धम्माल ….!!!मित्रांची भेट, खेळणं, बागडणं, धिंगाणा करणं ही रोजची ठरलेली कामं. अभय आणि त्याचे पाच-सहा मित्र सुट्टी पडल्यापासून रोज सकाळ संध्याकाळ शेजारच्या बागेत खेळायला जायचे. त्यांच्या परिसरात हीच एकमेव बाग सुंदर आणि प्रशस्त होती. झाडा-फुलांचे विविध प्राणी, चालण्यासाठी सुसज्ज पदपथ, लहानांसाठी खेळायला विविध उपकरणे, मधोमध भले मोट्ठे तळे, एका छोटेखानी कोपऱ्यात व्यायाम करण्यासाठी सुसज्ज व्यायामशाळा अशा अनेक सोई, सुविधांनी युक्त अशी हि नयनरम्य बाग होती.
अभय रोज संध्याकाळीही आपल्या मित्रांसोबत या बागेत जात असे. कधी लपंडाव, कधी लंगडी, कधी लगोरी असे विविधरंगी खेळ खेळत असे. खेळून दमला कि दिवे लागणीच्या वेळी घरी परतत असे.
एक दिवस असेच अभय आणि त्याचे मित्र बागेत लपंडाव खेळात होते. खेळ चांगलाच रंगला होता. अभयवर राज्य होतं. अभय झाडाला रेलून, डोळे मिटून एक ते दहा आकडे मोजत होता. मोजता मोजता अभयला कुत्र्याच्या विव्हळण्याचा आवाज आला. पहिल्यांदा अभयने जरा दुर्लक्षच केलं. काही वेळाने तोच आवाज पुन्हा त्याच्या कानावर पडला. अभयला त्या आवाजात मदतीची हाक ऐकू आली. त्याने लागलीच आपयल्या सगळ्या मित्रांना गोळा केले आणि त्या आवाजाचा शोध सुरु केला. अभय आणि त्याच्या मित्रांनी बागेत सर्वत्र पाहिलं. प्रत्येक झाड, बागेचा कोपरा -न-कोपरा, इतर उपकरणे सारंकाही धुंडाळून पाहिलं.
आता अंधार वाढू लागला होता. बागेतले तळ्या भोवतीचे दिवे लागले होते. त्या दिव्यांच्या प्रकाशात अभयला एक छोटूस कुत्र्याचं पिल्लू त्या बागेतल्याच तळ्यात वेली-शेवाळ्यात अगदी गूरफटून अडकून पडलेललं दिसलं. बिचारं पोहता येत नसल्याने खूप घाबरलं होतं, घाबरून जिवाच्या आकांताने ओरडत होतं. अभयने त्या पिल्लाला त्या तळ्यातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. अभय त्या तळ्याचे कुंपण ओलांडून त्या तळ्यात उतरला खरा पण तळ्यात साचलेल्या शेवाळ्यामुळे अभयला तग धरून उभं राहता येईचं ना. पाय घसरू लागल्याने अभय पुन्हा काठावर आला. अभय आणि त्याच्या मित्रांना काय करावं ? कुणाची मदत घ्यावी ? काहीच सुचत नव्हतं.थोडा विचार करून सगळ्या मित्रांनी मग एकमताने एक युक्ती लढवली. सगळ्यांनी एकमेकांचे हात अगदी घट्ट धरले आणि एक मानवी साखळी तयार केली. त्या साखळीच्या मदतीने अभय त्या पिल्लाजवळ सहज पोहोचला. त्याने त्या पिल्लाला एका हातात घट्ट धरले आणि मित्रांच्या मदतीने काठावर आणले. तळ्यातून बाहेर आल्यावर पिल्लाला जरा हायसे वाटले. मग कुण्या एका मित्राने दूध आणले, कुणी बसायला गोणपाट आणले, कुणी बिस्किटे आणली, कुणी पाव आणला आणि कुत्र्याला पोटभर खाऊ घातले. ओरडून ओरडून भूक लागल्याने, खाऊन त्या कुत्र्याच्या पिल्लालाही तरतरी आली. एकदम ताजे तवाने वाटू लागले, भीती एक्दम दूर पळून गेली. बाग बंद होण्याची वेळ झाली. अभय आणि त्याच्या मित्रांनी त्या पिल्लाला आपल्या इमारतीच्या आवारात नेऊ म्हणून बागेच्या बाहेर आणले. बाहेर आल्या आल्या त्या पिल्लाने अभयच्या हातातून टुणकन उडी मारली आणि ते बगे शेजारीच असलेल्या आपल्या आईला जाऊन बिलगले. पिल्लाची चपळता बघून अभयच्या सगळ्या मित्रांना हसूच आवरे ना… सगळेच खो … खो … हसू लागले.
आपण सगळ्या मित्रांच्या मदतीने एका मुक्या प्राण्याचे प्राण वाचवले याचे अभय आणि त्याच्या मित्रांना समाधान वाटले.
म्हणूनच मित्र हो … मुक्या प्राण्यांवर दया करा, त्यांची काळजी घ्या, त्यांना प्रेम द्या. तुम्ही दिलेलं निस्वार्थी प्रेम तुमच्याकडे नक्की परत येईल.
©™ श्री. अनुप साळगांवकर – मुंबई
November 12, 2021 at 11:13 pm
Kupa chan ahe
November 13, 2021 at 11:20 am
एकीचे बळ सगळ्या संकटाचे निवारण सहजरीत्या दूर करते. बालपण हे फार निरागस असते. फार सुंदर रित्या शब्दांकन केले आहे. 🐕🐕👌👌🙏🙏
November 17, 2021 at 1:31 pm
।। श्री गुरूदेव दत्त।।
कथा छोट्यांची पण मोठ्यांसाठी लिहिलेली।त्यांचं बालपण परत आणणारी।आईकडे धाव घेणारी।सुंदर शब्दवेध।