नव्वदच्या घरात पोहोचलेलं तुझं वजन शंभरी कधी पार करेल … याचा काही थांग नाही.
जितकं वजनदार शरीर, तितकंच वजनदार व्यक्तिमत्व. लाभलेल्या या शरीराचा तुला कधीच कमीपणा वाटला नाही. स्विकारलंस तू….. आनंदाने. सारं साजेसंच होतं तुला. माणूस आपल्या आकाराएवढंच प्रेम इतरांवर करू शकतो, हे तुला भेटल्यावर मला नव्याने उमगलं.
आपण देवाला “अरे…. ”  म्हणूनच हाक मारतो…. त्यामागे तो आपला आहे हा विश्वास आहे.
तुझ्याबद्दलही हा विश्वास जाणवतो, म्हणून तशीच हाक आजपासून तुलाही.
“सकल देवां आधी ….. तू देव माझा” यात हे “माझा” म्हणण्यातच तो हक्क आहे….. आपलेपणा आहे. कुणाचंतरी होण्याची जादू आहे.
तू आहेसही ….. माझा
ऑफिसचं दार उघडलं कि समोरच दिसायचास तू ….. प्रसन्न वाटायचं तुला बघूनच.
तुझ्या अवती भोवती नुसतं रेंगाळलं ना….. तरी तुझ्या प्रसन्नतेची वलयं भारुन टाकायची…. बाहेरच्या वर्दळीतून मनाचा गाभारा शांत व्हायचा…. श्वासांची मंद घंटा किणकिणत रहायची…. तशी ऐकूही यायची…. कायम मंगलमय.
ऑफिसमध्ये सगळ्यात आधी यायचास तू आणि सगळे निघाले कि निघायचास
“बॉस आहे यायलाच पाहिजे …. ” सगळे असंच म्हणायचे. 
तुझ्यासारखं वेळ पाळणं मला काही जमत नाही बुवा …..
हे वेळेबाबत तुझं समर्पण तुला असामान्य बनवतं. तुझी निष्ठा, तुझं सातत्य तुला समृद्ध बनवतं.
नेहमीच ठरलेला पांढराशुभ्र रंगाचा शर्ट. पॅन्टचे रंग कितीही बदलले तरीही शर्ट मात्र पांढराच.
तुला शोभूनही दिसायचा…….  त्याबद्दल तुला विचारायची कधीच  हिम्मतच झाली नाही माझी.
आदरयुक्त भीती ….. बाकी काही नाही.
पांढरा शर्ट घालून ऑफिसच्या खुर्चीत बसलास कि, गोबऱ्या गोबऱ्या गालात मला उकडीच्या मोदकासारखाच दिसायचा.
हसू आवरायचं नाही मला ….. मला हसताना पाहून ” आज खूप आनंदी … ” असं विचारायचास.
त्या आनंदी चेहऱ्यामागचं कारण …. उकडीचे मोदक … जे मला खूप आवडतात….आणि  तुला पाहून त्यांची खूप आठवण येते.
सुट्टी मागायला गेलं कि, ” हो ठीक आहे ..! ” एवढंच बोलायचास.
कधीही कुणाला कारण विचारलं नाहीस की, नकार दिला नाहीस. “Work is worship” ही तुझी साधना आहे. तुला मिळालेला Success ही त्या साधनेपाठी उभी असलेली शक्ती.
आपल्या ग्रुप मधलं कुणी आलं नाही कि स्वतःसोबत त्यांचीही सगळी कामं झटपट करायचास.
त्याबद्दल तुला कधीही कुणी Thanks म्हटलं नाही.
“बॉस आहे करायलाच पाहिजे …. ” हे ठरलेलं शब्द.
इतरांच्या रागाची, उद्धटपणाची, भीती वाटायची…
मला तुझ्या साधेपणाची वाटायची. तुझ्यासारखी सहजता, तो साधेपणा आपल्यात नाही, याची थोडी लाजही वाटायची.
किती साधं, सरळ राहणं तुझं. आपण छान दिसावं म्हणून भपकेबाज प्रयत्न नाहीत, कुणीही मान द्यावा म्हणून चढाओढ नाही, कुणाशी कसलीच स्पर्धा नाही, त्यामुळे येणारं नैराश्य नाही, कुठेही स्वतःला सिद्ध करायची धडपड नाही. …..सगळंच निर्विकार.
सोपं नाही अरे …
सगळ्यांचं सगळं किती सहज करायचास तू ….
समस्या काहीही असो ……. समाधान मात्र तू ….
सगळे किती छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुझ्याकडे यायचे …. कधीही कंटाळा आला नाही तुला, चिडचिड झाली नाही, आवाज तर कधीच वाढला नाही.
सगळ्या समस्यांचा तुझ्याकडे खात्रीशीर उपाय असणारच, हा विश्वास त्यांच्याही मनात निर्माण केलयस तू. बोलण्यातही तोच मोदकाचा गोडवा. ऐकत रहावसं वाटायचं. तुझ्याशी बोलताना तू घरचाच वाटायचास… … एक हवाहवासा वाटणारा आधार जाणवायचा.
मनातलं ओठांवर कधी यायचं …. कळायचंही नाही. सगळ्या प्रश्नांची उत्तरं सहज मिळायची आणि एक समाधानाचं सापडायचं.
ऐकून घ्यायचास ….. समजून घ्यायचास …. मदत करायचास …. मार्ग दाखवायचास …. कधीही राग नाही ….. चिडचिड नाही……  “मी” पणाचा लवलेश नाही.
हे जमायला हवं … शिकायचं मला … तुझा हात धरून… तुझ्याकडून
यंदा गणपतीच्या पहिल्या दिवशी चतुर्थीला तुझ्या हातावर उकडीचा मोदक ठेवला … तो मोदक चहू बाजूंनी किती आश्चर्याने पाहिलास तू ….
माझ्यासमोर दोन घासात डोळे मिटून गपागप खल्लास पण ….
इतकं उतावीळ मी तुला या पूर्वी कधीही पाहिलं नव्हतं…. गंम्मत वाटली…
“मला खूप आवडतात उकडीचे मोदक “ हे त्यानंतरच तुझं इच्छापूर्ती झाल्याचं वाक्य.
मला आवडणारे उकडीचे मोदक तुलाही आवडतात ही एकच गोष्ट आपल्याला एकमेकांशी कायम बांधून ठेवण्यासाठी पुरेशी आहे. आणि “Thank You” …. सगळ्यासाठीच….
सगळ्यांना आपलंस करण्यासाठी …. सांभाळून घेण्यासाठी …. भरभरून हवं ते देण्यासाठी …. निस्प्रुह रहाण्यासाठी …
असाच रहा …. कायम ….. कुणीही काहीही म्हटलं तरीही.
भरभरुन सुख देणारा सुखकर्ता आहेस तू….
कोणत्याही संकटातून तारुन नेशील असा विघ्नहर्ता आहेस तू….
ज्ञानाचं सर्जन व्हावं आणि आज्ञानाचं विसर्जन व्हावं असा बुद्धीदाता आहेस तू…
सकलांना सांभाळून घेशील असा आधिपती आहेस तू….
प्रसन्न वदनम…. सुमुखी आहेस तू…
तुझा हाच साधेपणाच तुला ते देवत्व प्राप्त करून देतो. 
माझ्यासाठी तूच …. एकमेवाद्वितीय …. माझा  “कॉर्पोरेट गणपती”
शुभं भवतू …
कल्याणमस्तू
श्री. अनुप साळगांवकर

परतीचा पाऊस – फेसबुक लिंक