गोष्ट तशी २०१९ सालची, महिना नक्कीच नोव्हेंबर असेल. आज सांगण्याचं कारण असं की, आज २३ जुलै २०२१, गुरुपौर्णिमा. आपल्या गुरुंच स्मरण करून त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस. आपले गुरु आपल्या पाठीशी कायम उभे असतात, याचा प्रत्यय आपल्याला येतच असतो. जाणून घायला, समजून घ्यायला आपल्या मानाचे डोळे उघडे हवेत. प्रसंग घडवून आणणारे ही तेच आणि तो प्रसंग समजावा म्हणून अर्जुनासारखी दिव्य दृष्टी देणारेही तेच.  “गुरु” नावाच्या एका अतींद्रिय शक्तीच्या संपर्कात तुम्ही एकदा आलात कि ती शक्ती तुमचा कार्यभार वाहते, तुम्हाला त्यांनी ठरवलेल्या इस्पित स्थळी पोहचवतेच.
माझ्या बाबतीत घटना अशी की, मी काही दिवस हवापालट म्हणून एकटा, पहिल्यांदाच बंगलोरला माझ्या मित्राकडे राहायला गेलो होतो. तो नियमित त्याच्या दिनचर्येप्रमाणे ऑफिसला जाणार होता आणि मी माझं-माझं असं बंगलोर आणि म्हैसूर फिरणार होतो. तो मला अगदी पोहचल्यापासून खूप छान  मार्गदर्शन करत होता. मी काय काय पाहिलं पाहिजे…?, कुठे कुठे कसं पोहोचता येईल….? याचा संपूर्ण आराखडा त्यानं माझ्यासाठी तयार करून ठेवला होता. मी संपूर्ण एक दिवस बंगलोर शहर फिरायचं, असं आमचं ठरलं. गूगलवर शोधून कोणती टूर अँड ट्रॅव्हल कंपनी अशा टूर अरेंन्ज करते त्याबद्दल आम्ही जरा शोध घेत होतो. आपल्याकडे जशा बेस्ट परिवहन आहेत तशाच बंगलोर मध्ये KSRTC (Karnataka State Road Transport Corporation) या सरकारी संस्था आहेत ज्या परिवहन सांभाळतात आणि त्याच अशा काही एक दोन दिवसाच्या टूरची व्यवस्था पाहतात.
आम्ही मोबाईल वरून दुसऱ्यादिवशी सकाळी सात वाजताची बंगलोर दर्शनची टूर बुक केली. सगळं आवरून सकाळी लावकर उठायचं म्हणून मी लवकर झोपलो.
पहाटे चार वाजता उठलो कारण बस डेपो माझ्या मित्राच्या घरापासून बराच लांब होता. तासाभरात आवरून मी पाच वाजता ओला बुक करून एकटाच घरातून निघालो. बस डेपोत पोहोचायला साधारण सहा वाजले. 
मी डेपोत परिवहनमंडळाच्या कार्यालयात गेलो. बाहेर बरीच मंडळी जमली होती. मला वाटलं बंगलोर दर्शनासाठी जमलेले सहप्रवासी असतील. मी जरा चौकशी करू म्हणून कार्यालयात तिकडच्या स्टाफला विचारलं तर ते म्हणाले मी रात्री ठरवलेली ती टूर रात्रीच रद्द करण्यात आली आहे आम्ही तसे संदेश पाठवले आहेत. तुम्ही जरा चेक करा.  माझ्या मोबाईलवर तर रद्द केल्याचा एकही संदेश आलेला नव्हता. त्यांच्याशी वाद घालण्यात काहीच फायदा नव्हता. एकतर त्यांची भाषा मला समजत नव्हती, मी या अशा अनोळखी शहरात एकटाच होतो आणि मला पहाटे अंधारल्या थंडीतली ती माझी बंगलोर मधली पहिली सकाळ सुंदर सुरु करायची होती.
मी शांतपणे डेपो बाहेर पडलो. क्षणभरच परत घरी जाऊ, असं या विचार आला पण, मित्र त्याची वेळ झाली की कामाला जाणार होता. मी एकटा घरी काय करू ? असं विचार करून मी गूगलसर्च करून  दुसऱ्या एक- दोन ट्रॅव्हल एजंन्टना फोन लावला. ते म्हणाले आमची टूर सात वाजता सुरु होणार असून बंगलोर इस्कॉन टेंम्पल हे त्यांचं पाहिलं ठिकाण आहे. तुम्ही आम्हाला तिकडेच साधारण सडेसात वाजेपर्यंत भेटा.
माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मी होकार कळवळा आणि आता आपण काहीही करून सातच्या आधी इस्कॉन टेंम्पल गाठायचं ठरवलं. मला फार आनंद झाला माझ्या आवडत्या श्री कृष्णाच्या दर्शनानं आज दिवसाची सुरुवात होणार होती.  साधारण सव्वासहा साडेसहा वाजले असतील. बाहेर अजूनही अंधारच होता. रस्त्यावरच्या पिवळ्या दिव्यांचा प्रकाश गाड्यांची वर्दळ कमी असूनही मनाला शांतता प्रदान करत होता. मी गूगल मॅप उघडून इस्कॉन टेंम्पल साधारण कुठे आणि किती लांब आहे ते पाहिलं तर ते जवळच अगदी दीड-दोन किलोमीटरवर होत आणि ते सात वाजता उघडणार होतं. मला जरा बरं वाटलं. आता कोणत्याही वाहाना शिवाय मंदिरात पोहोचता येणार होतं. “मी चालत सातच्या आत पोहोचेन.” साधारण असा माझा अंदाज होता. रास्ता जरा वळणावळचा होता. मी, “पुढचं पुढे पाहू…., आधी इस्कॉन टेंम्पल गाठू……  कृष्णाचं दर्शन घेऊ….  तो सगळं काही ठीक करेल.” असं ठरवून पुढं चालूं लागलो.
चालत चालत थोडं पुढं गेल्यावर एका ब्रिज खाली येऊन थांबलो. त्या सर्कल वरून रस्त्याचे बरेच फाटे फुटत होते.  नक्की कुठे जायचं मला समजेना. कुणाला विचारावं तर रस्त्यावर वर्दळही अगदी खूप कमी होती. पलीकडे जाऊन विचारू म्हणूंन मी रास्ता ओलांडला. सोमोरच एक बाईकस्वार मुलगा दिसला. काळी बाईक, काळे हॅन्ड ग्लोज आणि काळे हेल्मेट.  मी जरा पुढे होऊन, “इस्कॉन टेम्पल कुठे आहे …??” असं विचारलं तर तो “माझ्या मागे बसा मी सोडतो” असं आणि एवढंच म्हणाला. मी कसलाही पाठचा- पुढचा विचार न करता बसलोही. त्यानं बाईकला जोराची किक मारली आणि आम्ही भूर्रर्रर्रकन  निघालो. पहाटेच्या उजळच्या प्रकाशात कानावर पडणाऱ्या  थंड वाऱ्यात डोळे मिटतो न मिटतो तोच आम्ही पाच मिनटाच्या आत मंदिराच्या गेटपाशी येऊन थांबलो. मी “Thank  you” म्हणून  त्याचे आभार मानले … तो भूर्रर्रर्कन निघूनही गेला. त्याचा चेहरा दिसला नाही, कि तो पुढे एक शब्दही बोलला नाही. मंदिर बरोबर सातला उघडलं. मी पाय धुवून, जाऊन गाभाऱ्यात उभा राहिलो. गुरुजींनी मुर्तीपुढील झगमगणारे पडदे सरकवले. डोळे दिपून गेले… सुवर्ण पाषाणातली …. झगमगणाऱ्या वस्त्रातील …. बासरीधारी कृष्ण आणि त्याला साजेशी हसऱ्या चेहऱ्याची राधा. पाहतच राहावंसं वाटतं. खूपच सुबक मुर्त्या आहेत. डोळे भरुन पाहताना, राधाकृष्ण यांचं दिव्या दर्शन होतं. आरासही खूप सुंदर करतात. अगदी डोळ्याचं पारणं फिटेल अशी. माझ्या मनासारखं सुंदर दर्शन झालं. दर्शन झाल्यावर बलभोग म्हणून खिचडीचा प्रसाद देतात.  हवा तेवढा खा … मी पोटभर खाल्ला आणि निघालो … मंदिराच्या गेटपाशी पहाटेच संभाषण झालेला टूरवाला भेटला आणि माझी पुढची बंगलोर दर्शनाची टूर सुरु झाली.
सांगायचा मुद्दा आहे हाच आहे. राधेचा कृष्णही काळाचं होता आणि मला पहाटेच्या अंधारात भेटणार कृष्णही काळाच. जो हॕल्मेटच्या आत कसा दिसतो माझं मलाच माहित नाही. पण तो मला भेटला…..त्याने मला मदत केलीय….पहाटेच्या अंधारातून पहाटेच्या प्रकाशात नेऊन सोडलंय….मला हव्याहव्यशा वाटणाऱ्या माझ्या कृष्णसखाच्या दर्शनाने माझ्या दिवसाची सुरुवात झालीय…..हे खरं आहे…. आणि हेच सत्य आहे.
देव हि कुणी व्यक्ती नाही, ती एक शक्ती आहे. ती शक्ती कोणत्याही रूपात तुमच्या समोर येईल, कधी..? कुठे ..? नकळत तुमची मदत करील, हे सांगता येणार नाही. जाणून घायला, समजून घ्यायला आपल्या मानाचे डोळे उघडे हवेत.
शुभं भवतू …..

कृष्णार्पणमस्तु
लेखक – ©™ श्री. अनुप साळगांवकर