जन्मांगम – भाग १

चिमे पाठोपाठ अनंताही देवळाच्या पायऱ्यांपाशी येऊन धडकला. तिच्या डाव्या हाताला उभा राहीला. डोक्यात चांदणं चमकल्यागत तो ही देऊळभर उजळ दिव्यांचा प्रकाश पाहून थक्क झाला. चिमेला पडलेले तेच प्रश्न त्यालाही पडले…… मंदिरभर हे जीवंत दिवे… आज….कूनी….काहून….?????
अनंताने आधारासाठी आपला उजवा हात, चिमेच्या डाव्या खांद्यावर हात ठेवला…. चिमी दचकली….भिर्रकन फिरली….बाजूला वळून पाहाते तर….. अनंता…. तिने अनंताला कडकडून मिठी मारली. दोघांनी नजरेला नजर देत एकमेकांना पाहीलं. दोघांच्याही डोळ्यांत तेच अनुत्तरीत प्रश्न. आता आधाराला अनंता सापडल्यावर ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ढसाढसा रडू लागली. रडता रडता तिचं लक्ष हातातल्या नारळावर गेलं….तशी चटदिशी सावध झाली.

“चिमे……कायला आली हितं….एकटी”
“मागनं एवढं वरडून तुला ऐकू ऐईना गा….”
“यड्यागत काहून पळत सुटलीय….”
अनंतानी बोलता बोलता तिचा डावा हात घट्ट धरुन ठेवला होता. तीनं त्याच्या हाततून आपला हात सोडवत घराकडून आणलेला शेंडीसकट नारळ त्याच्या डोळ्यासमोर धरला…..
डोळ्यातून फुटलेला पाझर पदराने टिपत तीनं त्याला सकाळपातूर घडलेलं समदं बीनदिक्कत सांगत सुटली….
सकाळी दारावर आलेली आक्की…. तिचा कानात घूमणारा शाप…. सगळं… सगळंच
त्यानं समदं ऐकल्यावर तिला धीर दिला…
“आता हीतवर पळ काढत आलीच हाईस तर…. दे नारळ तुज्या म्हसोबाला…. तुझा जीव शांत हुईल……मग परतून जाऊ घरला….. रात लई चढली बग”
सभामंडपातली दिव्यांची रोषणाई पाहत….बावचळत दोघं एकमेकांचा हात धरुन गर्भगृहात शिरले. काळोखाने भरलेल्या कोपऱ्यांना सुखावत गाभाऱ्यात समईचा मंद प्रकाश तेवत होता. चिमी आणि अनंता म्हसोबाच्या मुखवट्यासमोर उभे रहाताच मुखवट्यामागच्या नक्षिदार खिडकीतून एक पिवळसर प्रकाश गाभाऱ्याच्या प्रत्येक कोपऱ्यात पसरला. अनंतानं चटदिशी प्रसंगाच भान राखत शेंडीवाला नारळ चिमेच्या हातातून घेतला. स्वतःच्या दोन्ही हातात धरुन नारळाची शेंडी म्हसोबाच्या दिशेने करुन पुढे केला. चिमेनं आपला उजवा हात अनंताच्य उजव्या हाताला लावला. नारळ चौथऱ्यावर ठेवला गेला. त्याला दोघांनी हळद कुंकू वाहून नमस्कार केला.

नारळ जसा अर्पण झाला अगदी तक्षणी चहुबाजूंनी हुँsss….. हुँsss…. हुँsss…. हुँsss… असा आवाज कानावर पडू लागला. दोघं दचकली. गाभाऱ्यात दोघेच असताना अचानक हा आवाज… चिमेनं लागलीच उजवा हात आपल्या पोटावर ठेवून स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न केला. अनंताची नजर चहुदिशांना फिरु लागली. तो चटकन गाभाऱ्याबाहेर आला. आवाजाचा शोध घेऊ लागला. सभामंडप रीत होतं. तो मंदिराच्या आवारात आवाजाचा वेध घेत फिरु लागला. ज्वारीची शेतं एकमेकांवर आदळत चट्ट….. चट्ट…. आवाज करत होती. पण गाभाऱ्यातला आवाज वेगळाच होता. त्याला डोस्यात भूसा भरल्यागत काहीच सुचत नव्हतं. फिरता फिरता मंदिराच्या मागच्या बाजूला आला आणि डोळे वसाडून थबकलाच……. मंदिरामागे अनंतापासून शंभर मीटरवर पिवळसर अग्नी प्रकाशात जमिनीवर उजळलं होतं ते….. जन्मांगम….त्याच्या पल्याड केस मोकळे सोडून, हिरवा पदर वाऱ्यावर मोकाट सोडून, दोन्ही हात मांड्यांवर बांधून, हुँकार देत बसली होती….. ती …… तीच….. आक्की.

तीला या अवस्थेत पाहून अनंताच्या काळजात धस्स झालं. जमिनीवर लाल पिवळ्या अग्नीकणांनी तयार जन्मपत्रिकेत, उभ्या आडव्या रेषा, चमचमते ग्रह-तारे गोळा करुन…. पहील्या घरातला राहू आणि सप्तमातला केतू यांत एका बाजूला अडकलेले सुर्य, चंद्र, मंगळ, बुध, बृहस्पती, शुक्र आणि शनी हे सात ग्रह … म्हणजे योग कालसर्प.
“हे कुणाचं नशीब हाय…. आत्ता ही बया इथं काय करुन ह्यायली…. काय आक्रीत घडणारय…. चिमेला दूर कराया हवं…. हितनं घरी न्याया हवं…. “ सगळ्याच गुंतवणाऱ्या विचारांना पूर्ण विराम देऊन तो तिथून काढता पाय घेणार तोवर त्याचे पाय खिळा मारल्यागत जमिनीत रुतले, घट्ट झाले. सर्रsss सर्रsss वारा सुटून माती, धूळ, पाचोळा उडू लागला…. नाकातोंडात माती जाऊ लागली. अनंताने डोळे गच्च मिटून घेतले. मातीचे कण जाऊन डोळ्यांतून वाहणारं पाणी दोन्ही हातांनी पुसत त्याने समोर पाहीलं तर आक्केचे केस चेहरा वगळून त्या वाऱ्यावर भूरभूरत होते. तीने मान वर करुन एका नजरेचा कटाक्ष त्याच्यावर टाकला. तो जागीच दगड होऊन उभा राहीला. आक्केच्या कुंकवाला रक्तवर्णी कुंकवाचं तेज प्राप्त झालं होतं. या सगळ्या प्रकारात आजूबाजूचं वातावरण जरी उग्र असलं तरी तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण करुणा दिसत होती. आक्का शांत मुद्रेने मौन धारण करुन मांडी घालून जन्मकुंडलीसमोर बसली होती. आपल्या आजूबाजूला वाऱ्याने घातलेल्या थैमानाकडे तिचं जराही लक्ष नव्हतं. इतक्या प्रचंड वायुवेगातही ते अग्नीकणांनी युक्त जन्मांगम ऊजळत होतं. हा तोच प्रकाश होता जो म्हसोबाच्या मुखवट्यामागून गाभाराभर पसरला होता. अनंता दात घशात घालून हे सारं पहात होता.

आक्केनं अनंता समोरच वैश्विक शक्तीला आवाहन करुन विधीपूर्वक वैदिक आचमन केलं. एक दिर्घ श्वास घेऊन शांत चित्ताने शारीरातला प्राण आणि आपान वायू एका समान पातळीवर आणला. हळूहळू उदान वायूचे दमन करुन नाभीच्या केंद्रावर मणीपूर चक्र जागृत केलं. चक्राच्या तेजानं शरीराचा एक एक भाग प्रखर झाला. तीच्या नाभीवर दहा पाकळ्यांच तेजस्वी फुलासारखं काहीतरी फिरतंय आणि त्याचा प्रकाश शरीरभर पसरतोय हे पाहून भीतीने अनंताचे चांगलेच धाबे दणाणले. विचार करायची शक्तीच खुंटली. त्याला त्याचे फक्त डोळेच जीवंत असल्यासारखं वाटलं. तीने जागृत केलेले मणीपूरचक्र स्वतःच्या हृदयाच्या जागी आणून स्थिर केले. श्वासांचा खेळ करत तिने अतिशय कौशल्याने दोन भुवयांच्या मधोमध आणून आपला प्राणवायू स्थिर केला. तिच्या कपाळावरच्या कुंकवाचा आणि चक्राचा आकार क्षणार्धात एकरुप झाला. ती ध्यानचिंतन करुन हळूहळू योगमार्गाकडे जाऊ लागली. तीचे जड शरीर विकाररहीत झाले. जे हळूहळू वाऱ्यावर विरु लागले. शरीरातला प्रकाश मालवून तीच्या विकाररहीत देहातून एक दिव्य ज्योत उसळून वर आली.

आक्काबाईच्या शरीरातून प्राणज्योत बहेर पडल्यावर तीचा अनंतावरचा ताबा सुटला. अनंताच्या हाता-पायांत जीव आला. तो पडत-धडपडत चिमेला सुखरुप घरी न्यायला गाभाऱ्यात आला. चिमी म्हसोबाच्या चौथऱ्यावर डोक टेकून पडली व्हती. अनंता चिमेला हात लावून उठवणार इतक्यात ती दिव्यज्योत गाभाऱ्यात कुठूनशी प्रकट झाली. फक्त समईच्या मंद प्रकाशात उजळणारा गाभारा आता त्या ज्योतीच्या दिव्य तेजानं दिपून गेला होता. ज्योत म्हसोबाच्या डोक्यावर स्थिरावली. अनंताला तेजोमय प्रकाशात फारसं काहीच दिसत नव्हतं. त्याला फक्त चिमी आणि आपलं पोर सुखरुप हवं होतं. त्यानं गर्भगळीत होऊन म्हसोबापुढं हात टेकले. “सोडवं रं बाबा ह्यातनं….. माझी चिमी लय देवभोळी हाय… तुझा एकबी नवस पूर्ण करन्यात तीनं कवा बी दिरंगाई केली न्हाय…. तुज्यावरची तिची भक्ती काय बी झालं तरी आटली न्हाय…. आज पोटूशी असून, दिसं भरलेलं असताना तुला नारळ देऊन पोराचं सुख मागाय तुज्या दारात बेगीन आली बग….बग रं बाबा तिच्याकडं … आज असं वंगाळ काय रं हुतयं हे….” त्यानं डोकं टेकलं.

क्षणभर डोळ्यातल्या पाण्याचा चौथऱ्यावर अभिषेख करुन हळूवार डोकं उचलून त्यानं डबडबलेल्या डोळ्यांनी वर पाहीलं तर…. म्हसोबाचा मुखवटा प्रचंड तेजस्वी दिसू लागला….. कपाळावरचा चंदन टिळा प्रखर झाला…. म्हसोबाच्या डोक्यावर स्थिरावलेली दिव्य ज्योत झपकन चिमेच्या पोटात सामावली….. गाभाऱ्यात एक दिव्य प्रकाश पसरला…. आता  अनंताला चिमीही दिसेनाशी झाली. चिमेनं “आयं गं मायsssss……” म्हणून एकच हंबरडा फोडला……. देवळापाठच्या जन्मकुंडलीत सहाव्या स्थानावरचा शुक्र आपली सर्व शक्ती पणाला लावून आठव्या स्थानात विराजमान झाला….. आकाशातला पौर्णिमेचा चंद्र पहाटेच्या पहील्या प्रहरात पुढे सरकला…. कालसर्प योग संपला….

नक्षीदार खिडकीतला पिळला प्रकाश लुप्त झाला. गाभाऱ्यातला प्रकाशही हळूहळू मावळू लागला…..त्यात अनंताला म्हसोबाचा जिवंत मुखवटा दिसला….. प्रत्यक्ष दर्शनाने त्याचे भारावून आपसूकच हात जोडले गेले. चौथऱ्यापाशी ग्लानीत पडलेली चिमी दिसली आणि ……. दिसलं ते…… चिमीच्या मांडीत गोंडस पोर…. तो पटकन पुढं गेला…..  त्यानं चिमीला भानावर आणलं…. दोघांनी एकमेकाकडं आनंदानं पाहीलं…. डोळेभरुन पोराकडं पाहीलं…. पोरानं चमचमत्या नजरेनं डोळे उघडले….. दोघं मनोमन सुखावले…… पोराला पदराआड घेऊन त्यांनी म्हसोबाला नमस्कार केला आणि म्हागारी फिरले. सभामंडपातून बाहेर पडताना मंडपातले दिवे किलकिले होऊन आपोआप विझले…… त्यांनी मागं वळून पाहीलं …. समईच्या शांत प्रकाशात म्हसोबाचा मुखवटा हसरा दिसला.
मंदिर परिसरात पहाटेच्या पहील्या प्रहरी जरी अंधार झाला असला तरी चिमे आन् अनंताचं अवघं आयुष्य उजळलं होतं. आक्केनं प्राणज्योत चिरंजीव ठेवून, शाप मोडीत काढून, तिचा आशिर्वाद खरा केला होता. तिच्या योगदानामुळे आज अनंता चिमीच्या पोराला फक्त दृष्टीच लाभली नव्हती तर लाभली होती ती…… दिव्यदृष्टी.

समाप्त

लेखन – श्री. अनुप साळगांवकर, मुंबई
©All Rights Reserves©

निवेदन – सदर कथा काल्पनिक आहे.