“पौर्णिमेला म्हसोबाला त्याचा मानाचा नारळ व्हायलास न्हाय, तर जल्माला येनारं मूल आंधळं होईल.” दारावर थाप मारुन, असा जळजळीत शाप देऊन, हाताची बोटं कडाकडा मोडून दारावर आलेली आक्काबाई आज काहीही दान न घेता पुढं चालती झाली. क्षणभर तर काय झालं हे चिमेला कळंच ना. डोळे फाटून आसवांची धार लागली. सुन्न सारं घर ….. दिसभर निपचित पडल्यागत.
दिवस ओलांडता झाला तेव्हा अनंता शेतावरुन आला. पायवाट तुडवून येताना मातीत रापलेले पाय तसेच ठेवून ओसरीत उभा राहीला. बघतो तर समोर काळाकुट्ट अंधार …. दार सताड उघडंच … सांज झाली तरी आत कंदिल उजळला नव्हता… मागे पाहीलं तर तुळशीशेजारी दिवा लागला नव्हता. घरभर पसरलेल्या काळोखाचं नुसतं थैमान…
काय झालं आसंल…..?
“चिमे ….. ए चिमे”…. त्याची भिरभिरती नजर तीला शोधू लागली.
त्यानं पुन्यांदा मोठ्यानं आवाज दिला….. “चिमेsss…ए चिमेsss…”
“चिमी कुठं हायस… “
“काहीबाही बोल की गं…”
काहीच प्रतिसाद नाही. काळ्याकूट्ट अंधारात मन पण काळवंडायला लागलं.
पडत- धडपडत त्याने कंदिल शोधून कसाबसा उजळवला.
चिमी त्याच्या पुढ्यातच पडली होती.

“हीला घेरी बिरी आली कि काय… दिसभर काय खाल्लं कि नाय… बाय गोsss…” कपाळ पिटत स्वतःशीच बोलत कंदिल टांगून तो हातासरशी पेलाभर पाणी घेऊन आला… चिमेच्या चेहऱ्यावर जरा पाण्याचे हबके मारले… चिमेत थोडा जीव आला. डोळे किलकिले करुन तीने वर पाहीलं. “पौर्णिमेला म्हसोबाला त्याचा मानाचा नारळ व्हायलास नाय, तर जल्माला येनारं मूल आंधळं होईल.” आक्काबाईचा शाप कान पोखरु लागला. डोळे खाडकन उघडून पोटूशी असताना ती ताडकन उभी राहीली. तिचे दिस भरले होते नं त्यात आज पौर्णिमा होती. आकाशाला चंद्र चिटकायला अजून अवकाश होता. आनंताच्या एकाही प्रश्नाला उत्तर न देता ती सरसर व्हरांड्यातल्या कोन्यात पडलेल्या पोत्यापाशी आली. पोत्यातल्या ठेवणीतल्या नारळांपैकी चांगला शेंडीवाला नारळ डाव्या हातात धरुन उजव्याने पोटावर पदर खोचून, दिसं भरलेले असताना सटकन घराबाहेर पडली. झोपडीतला अंधार आता गावभर पसरला होता. तिच्या पायांना चाकं लावल्यागत ती भिभभिरत पुढं पुढं जात होती. अनंताही तिच्याच पाठोपाठ तिला हाका मारत त्याच अंधाऱ्या पायवाटेवरुन तिच्या पाठी धावत सुटला.


चिमेच्या डोक्यात आक्केचाच विचार… चिमी पोटूशी हाय…. हे कळ्यापासून महीन्यातून एकदाच येनारी ही आक्काबाय दर पंधरा दिसांनी उगवायची. दारावर थाप देऊन तशीच उभी रहायची. हिरवीगार काठापदराची गुढगाभर साडी त्यावर खणाची चोळी. टर्रss… टर्रsss…… वाजणा-या चपला त्यातच पायात जाडजूड चांदीचे काळवंडलेले तोडे. हातात वितभर हिरव्या बांगड्या त्यावर सोनेरी चकचकीत ठिपके, केसांचा करकचून बांधलेला आंबाडा, मानेवरु रुळणारा त्या आंबाड्याचा झूबका. कधीबाई त्यात पिवळ्या सोनचाफ्याचं फुल. गळ्यात काळ्यामण्यांच एकवाटी डोरलं. कानात मोत्याच्या कुड्या. उन्हात फिरुन राकट झालेला तो किरमीजी चेहरा, कपाळावर पिवळ्याधम्मक हळदिचं मळवट आणि मधोमध ठसठशीत दिसेल अस्सं मोठ्ठालं कुंकुं…… उजवा हात झुलता ठेवून डाव्या हातात म्हसोबाचं बस्तान…..शेणानं सारवलेली परडी…. परडीत लालभडक मांजरपाट…त्यात बचकाभर तांदूळ… त्यात खोवून उभा केलेला पितळी मुखवटा…. मुखवट्यामागं शोभून दिसतील अशी खडी वितभर प्रभावळ म्हणून मोराची खोवलेली पिसं…. मुखवट्यावर उधळलेला पिवळा भंडारा आणि कपाळभर केशरी रंगाचा चंदन टिळा. आक्केपेक्षा त्या म्हसोबाचंच रुपडं देखणं….

जेव्हा जेव्हा यायची तेव्हा घटकाभर चिमेच्या दारात थांबायची. चिमेशी आपलेपणानं बोलायची… “तुझं समदं छान व्हनारयं बघ…. म्हसोबाची कृपा होणार… नबी- नक्षत्रावानी पोर जल्माला येनार बग….हे पोरं लई बरकत आनलं…. काय बी किळजी करु नगंस… म्हसोबा हाय रात-दिस जागा…. तो समद ठीक करंल.” तिच्या बोलण्यानं चिमेला उभारी यायची. हसरा चेहरा ठेवून चिमी सुपभर जे देईल ते घेऊनच आक्का पुढं फिरायची. जायच्या आधी परडीतला भंडारा तीन बोटांनी चिमेच्या कपाळी लावायची. गावात कुणाकडेही पाळणा हलूदे. ही आधीच हजर असायची. जन्माला येणाऱ्या पोरांचं अचूक भविष्य मांडायची. लाल मातीवर काट्याकुट्यानी उभ्या आडव्या रेषा मारुन, नक्षत्र, ग्रहतारे गोळा करुन….अचूक मांडून जन्मांगम सांगण्यात अख्या पंचक्रोशीत तीचा हात कुणीच धरु शकत नव्हतं. असंच लई वर्षापूर्वी एकदा चिमेच्याच झोपडीपुढं चार झोपड्या सोडून बस्तान बसवलेल्या झिल्पिला पोर व्हनार व्हतं. पोरं व्हायच्याच दिवशी ही बया न बोलवता तिच्या दारात हजर. अंगणातल्या लाल मातीत कायबाई सरळ तिरकं आखून तिनं चंद्र तारे काढले, “पोराच्या राशीत सुरवातीची दहाएक वर्षे चांडाळयोग हाय. ही वर्षे सरली की, लक्ष्मी घरात पाणी भरंल…..भलंच व्हनारं….म्हसोबा हवं ते देनार….” अगदी तस्संच झालं. झिल्पीच्या पोराच्या वाट्याला आलेला राहू आणि केतूची युती होऊन निर्माण होणारा हा चांडाळयोग काही वर्षात संपला आणि आज त्याच झोपडीच्या जागी पक्कं दगड विटांचं मजली घर हाय. गावात नांगराखाली घालायला झिल्पीच्या धन्याकडं ढिगभर जमिन हाय. काशाची कायबी कमी नाय. बक्कळ पैका आला…. पण, एकदा पोर झाल्यापातूर ही आक्का त्या झिल्पीच्या दारासमोर उभी ठाकली नाय.

चिमेचे दिस भरताना हीच आक्काबाय चिमेच्या पोटावर हात ठेवून आशिर्वाद देताना “तुझ्या पोटी म्हसोबाचाच पिंड जल्म घेनार हाय.” अस्सं म्हणाली होती, आन् आत्ता दिसं पूर्ण झालेत तर हा जळजळीत शाप. चिमेला काहीच सुचेना. डोस्क्यात विचारांचा प्रचंड गदारोळ उठला होता. याच विचारात ती धडधड चालत कडेपठारावर येऊन ठेपली. डाव्या हातात नारळाचं वझं नी उजव्यानं पोट सावरत झपझप पुढं पळू लागली. अनंतानं पाठलाग करता करता शेवटच्या झोपडीबाहेरचा कंदिल डाव्या हाताने चटदिशी उचलला. आता पठारावर त्याच कंदिलाच्या प्रकाशात पायवाट डोळ्यापुढे उजळत होती. त्याच प्रकाशात चिमेची पाठमोरी आकृती फारच अंधूक दिसत होती. अनंतानी मारलेल्या हाका वा-यावर विरुन जात होत्या. चिमेचे कान पठारावरच्या सर्रssss सर्रssss वा-याने दडे बसून केव्हाचेच बंद झाले होते. आकाशात आत्ताकुठे चंद्र पुर्णत्वाला येत होता. त्याचा मंद प्रकाश पठारावर पसरू लागला. चंद्रप्रकाशात चिमेची सावली आता तिच्या पायात घूटमळू लागली. ती आता अनंताच्या नजरेच्या टप्प्यात होती.

पठारावरुन पल्याड उतरलं की ज्वारीच्या शेतात म्हसोबाचं देऊळ…..
सहाफूट उंच ज्वारीच्या शेतात बरोबर मधोमध हे स्वयंभू म्हसोबाचं जागृत देवस्थान. गावात फार वर्दळ नसल्याने या देवळातही सहसा कुणीही फिरकत नसे. चारही बाजूंनी हे शेत उभं असल्याने मधे हे देऊळ असेल असं कुणालाही वाटायचं नाय…… सांगितलं तर पटायचंबी नाय. पाच बाय सातचा सभामंडप आणि पाच बाय पाचचा गाभारा. लाल मातीचे दहा बारा खांब, त्यावर लाल मातीचीच कौलं, शंभर मिटर उंच कळस, त्यावर पिवळा केशरी झेंडा. गाभाऱ्यात मिट्ट काळोख…. टिमटिमता लामण दिवा, आणि फुटभर चौथ-यावर शेंदरात न्हाऊन निघालेली म्हसोबाची स्वयंभू मूर्ती….. मुर्तीवर उधळलेला भंडारा आणि तोच गोल चंदन टिळा….. देखणं रुप.

शेतातनं राप राप चालत चिमी वाट काढत पुढं जात होती. दाटून आलेल्या अंधारात रातकिड्यांची किर्र किर्र कानवर पडत होती. शेतातल्या चिखलात पाय रापलेले पाय चपाचपSSSS चपाचपSSSS आवाज करत पुढे पडत होते. पौर्णिमेचा चंद्र आता चांगलाच आभाळभर पसरला होता. देवळाचा कळस त्या प्रकाशात झळाळू लागला होता. चिमेला समोर देऊळ दिसत होतं. सभामंपात काहीतरी चमचमत होतं. तीच्या पावलांनी वेग घेतला …. आज तीला कायबी करुन म्हसोबाला नारळ व्हायचा होता. कशीबशी ती ओलीत्या पावलांनी मंदिराच्या पायऱ्यांपाशी पोहोचली. मंडपात आज लख्ख प्रकाश. समोर मंडपभर लवलवते दिवे पाहून चिमेचं काळीज धडधडलं ….. श्वासाचा वेग मंदावला….. डोकं विचारांत गुंतलं….आज काय बाई… कोनता सन न्हाय….म्हसोबाच्या दिवटीची यात्राबी न्हाय … तरीबी….हे मंदिरभर दिवे कुनी उजळवले…..? कुणीबी या वक्ताला न फिरकणा-या म्हसोबाकडं आज कोन आलंय….? कशासाठी …..आनं काय मागायं…?

क्रमशः

जन्मांगम – भाग २

© श्री. अनुप साळगांवकर
© All Rights Reserves ©