आयुष्याचा एक मोठा टप्पा गाठल्यावर कधीकाळी थोडासा कठीण वाटणारा हा आयुष्यप्रवास सुकर करताना, प्रत्येक वळणावर, क्वचितच कधी एखाद्या चौकात भेटणारी ती विलक्षण, अवलिया माणसं आजही तुमच्यासोबत आहेत का हो ? त्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात आलेला तो सुवर्ण काळ तुम्ही आजही जगताय का ? ती माणसं आजही संपर्कात असतील आणि तो काळही तुम्ही उपभोगत असाल, तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. कारण तो काळ किंवा ती माणसं ….. परत येत नाहीत हो ….. “वो फिर नहीं आते……” हि अशी अवचित माणसं भेटण्यापेक्षा ती लाभणंच जास्त महत्वाचं. आयुष्याची गाडी वेगाने पुढे हाकताना अशीच लाभलेली काही जीवाभावाची माणसं “मी” पणाचा पडदा थोडा बाजूला करून वेळ काढून, पुन्हा निरखून पाहायला हवीत … त्यांची विचारपूस करायला हवी, त्यांना समजून उमजून आपल्या आयुष्यात ठरवून आणायला हवं. एकदा का ती काळाच्या पडद्याआड गेली कि ती परत येत नाहीत हो. गगनाला भिडलेल्या, फुलांनी लगडलेल्या झाडाखाली उभं राहिलं कि ते झाड आपल्यावर न सांगता त्या फुलांचा वर्षाव करतं. तशीच आनंदवर्षाव करणारी हि माणसं फुलाची पाकळी नि पाकळी वेचावीत अगदी तशीच वेचायला हवीत.
फूल खिलते हैं, लोग मिलते हैं मगर
पतझड़ में जो फूल मुरझा जाते हैं
वो बहारों के आने से खिलते नहीं
कुछ लोग एक रोज़ जो बिछड़ जाते हैं
वो हजारों के आने से मिलते नहीं
उम्र भर चाहे कोई पुकारा करे उनका नाम
वो फिर नहीं आते…
माणसं हि अत्यंत महत्त्वाची असतात. त्यांना मनापासून जपायला हवं. भावनाशून्य या जगात जगताना आपण थोडं भावनाप्रधान व्हायला हवं. काय समर्पक लिहिलंय ना गुलजार यांनी….. वो फिर नहीं आते…. आयुष्यभर अगदी कशीही, कुठेही आपल्याला अनेक माणसं भेटतात, आपलीशी वाटतात, मनात घर करतात, आयुष्याचा अविभाज्य भाग होतात. काळ आपली गती स्विकारतो आणि या रामरगाड्यात ती एकाएकी हरवून जातात. आयुष्याचा सुवर्णकाळ आपण ज्यांच्यासोबत घालवला ती माणसं आता कदाचित् संपर्का पलिकडे पोहोचली असतात. मोबाईलमधे त्यांचा नंबर असूनही “मीच का?” या आपल्या अहंकाराला बळी पडलेली असतात. कोणे ऐकेकाळी आपल्या प्रत्येक क्षणावर आपलेपणाचा अधिकार गाजवणारी, आपल्या आनंदात आनंद मानणारी, मनातलं सगळंच आपल्याला सांगणारी, काहीही बोललं तरीही आपल्यालाच येऊन बिलगणारी हिच माणसं आता नजरेलाही दिसेनाशी झालेली असतात. आपल्याला हवी आणारी छोटी मोठी प्रत्येक गोष्ट मिळवण्यात या सा-यांचाच सिंहाचा वाटा असतो. माणूस म्हणून आपल्याला घडवण्यात त्यांनी काहीच कमी ठेवलेलं नसतं. ती एकदाका दिसेनाशी झाली…. भूतकाळात हरवून गेली ….. की मग…. “वो फिर नहीं आते….” त्यांना आपण कायम आपल्या चालू वर्तमानकाळात ठेवायला हवं….. संपर्कात रहायला हवं. अहो वाद घालायलाही संवादाची गरज असतेच ना ?…. तो संवाद अविरत चालू रहायला हवा. कधी आपल्या नावाचा एखादा फोन… एखादा मेसेज… नाहीतर स्व-लिखित पत्रच त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवं. ही माणसं काळी का गोरी, श्रीमंत का गरीब, आपली का परकी अशी नसतात. त्या सुवर्ण मुद्रा असतात. नियती नावाच्या देवीने आशिर्वाद देताना प्रसाद म्हणून भरभरुन वाटलेल्या.
आयुष्य सटासट पुढे सरकत असतं. हिच आपल्याला हवीहवीशी वाटणारी माणसं आता तितकीशी आठवणीत असली तरी जवळ नसतात. रोज भेटणारी.. भरभरुन बोलणारी..न मागता देणारी माणसं आता कालपटावर पुसट झाली तरी त्या सुवर्ण मुद्रा आहेत त्यांवरची अक्षरं कधीही बोथट होणार नाही, त्यांची किंमत कधीही कमी होणार नाही. त्या तशाच झळाळत राहतील …. तुमच्या आयुष्याचीही किंमत वाढवत रहातील. कधीतरी मन एकांतात उतरलं की जाणवेल त्या मुद्रांवर रेखाटलेली प्रत्येक अक्षरं किती आखीव रेखीव होती ते. सध्या कुणामुळे आपलं काहीच अडत नाही. पण एक रिकामेपण भरुन राहतं. एक पोकळी निर्माण होते. मनात कुठेतरी खोलवर काहीतरी सलत रहातं. शरीरावरच्या जखमा दिसतात हो, मनावरच्या दिसत नाहीत एवढंच. काळाची पावलं झपझप पुढे सरसावतात तरी त्या मुद्रा त्यांची मुळ किंमत कधीही गमावून बसत नाहीत. मनपटलावरच्या विस्मृतीत गेलेल्या आठवणींना टिचकी मारुन जागं केलं आणि आयुष्य नावाच्या पुस्तकाला लागलेली धूळ जरा आपल्याच हातांनी झटकली की जाणवतं, प्रत्येक पान जिवंत उभं रहातं, सगळंच स्पष्ट दिसतं. त्या मुद्रा किती मौल्यवान होत्या आणि जीवापलिकडे जपायला हव्या होत्या हे हि पटतं. मन गतकाळात हरवून जातं. त्या मुद्रा पुन्हा शोधून काढायच्या, हे धेय सापडतं आणि पुन्हा जगण्याची उमेद निर्माण होते.
सुबह आती है, रात जाती है
वक़्त चलता ही रहता है रुकता नहीं
एक पल में ये आगे निकल जाता है
आदमी ठीक से देख पाता नहीं
और परदे पे मंज़र बदल जाता है
एक बार चले जाते हैं जो दिन-रात, सुबहो-शाम
वो फिर नहीं आते…
एखाद्याची मनापासून आठवण यावी अशी माणसं आपल्याजवळ आहेत, अहो हीच खुप मोठी भाग्याची गोष्ट आहे. ओळख जितकी जूनी तितकी मैत्री घट्ट होत जाते. नात्यात सहजता येते. या मनापासून जपलेल्या नात्याला जेव्हा आपण बुद्धीच्या जोरावर तोलून पाहतो तेव्हा काहीतरी खटकतं, अनेक तर्क-वितर्क निघतात, शंका उत्पन्न होतात, राईचा पर्वत होतो, गुंतागुंत वाढवणारे गैरसमज निर्माण होतात आणि ही मैत्री नावाची नाव अनेक विचारांच्या सागरात हेलकावे खाताना दिसते. वेळीच हे सगळे विचार पुसून टाकून मनाची पाटी ज्याला कोरी करता आली तो तरलाच म्हणायचं. डोळ्यांना दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतातच असं नाही ना. अहो आपणहून घट्ट धरुन ठेवलं तर कदाचित् थोडंसं गळेल, पण तुटणं मात्र टळेल.
आँख धोखा है, क्या भरोसा है
दोस्तों शक दोस्ती का दुश्मन है
अपने दिल में इसे घर बनाने न दो
कल तड़पना पड़े याद में जिनकी
रोक लो रूठ कर उनको जाने न दो
बाद में प्यार के चाहे भेजो हजारों सलाम
वो फिर नहीं आते…
आपली गाडी रुळावर आहे. हे आपलं नशिबच पण, त्या अभागी जीवांच काय ? जे तुमच्या या प्रवासात तुमची गाडी रुळावर यावी म्हणून तुम्हाला भरभरुन न मागता मदत देऊन सहज निघून गेले. अगदी कायमचे….
त्यांना पण जगायचं होतं… त्यांचीही स्वप्नं होती… इच्छा होत्या… तुमच्यासारखं मोठं होण्यासाठी त्यांनाही कष्ट घ्यायचे होते. तुमच्या सोबत आनंदाचे क्षण साजरे करायचे होते. आपल्या आयुष्याचा एकसंध भाग असलेली ही माणसं… आपले मित्र – मैत्रीणी, आपले आई-वडील, नातलग कुठेतरी या प्रवासात आपल्याला एकटं सोडून दूर निघून गेलेत … ते पुन्हा कधीही आपल्याला न भेटण्यासाठीच. त्यांचाही आपल्या आयुष्यावर कणभर अधिकार असतोच. त्यांना त्यांचे अधिकार वेळेत द्यायला हवेत, आपल्याला याची जेव्हा जाणीव होते ना तोपर्यंत नियतीने आपला डाव साधलेला असतो. ती माणसं, ते सांभाळून घेणारे हात कुठेतरी विरुन गेलेले असतात. मग कितीही साद घाला, हाक मारा…. समोरुन काहीच प्रतिसाद येत नाही. त्या कळ्या उमलून कधी मावळल्या आपलं आपल्यालाच कळत नाही. कधीतरी हवंहवंस वाटणारं यश लाभलं की, मोकळ्या मनानं फुलांनी गच्च भरलेल्या झाडाखाली उभं रहा. दोन्ही हात वर करुन त्या प्रत्येक फुलाचे आभार माना. ती फुलं आपसूक गळून पुन्हा तुमची रिकामी ओंजळ भरुन टाकतील…. आयुष्यभरासाठी.
मला जाणीव आहे. आपल्या सगळ्यांचच आयुष्य फार गजबजलेलं आहे. कुणालाही जराही उसंत नाही. आपल्याला सगळ्यांनाच यशस्वी व्हायचंय… पुढे जायचंय … ठरवलेलं धेय गाठायचंय. आपल्या भोवती शोभेल अशी एक महागडी चौकट उभी करायचीय. पण ती उभी करताना… पुढे जाताना गवसलेली हि आपली माणसं … आपल्या जवळची ही माणसंच नसतील तर…यशाचं शिखर गाठल्यावर मिळालेलं यश साजरं करायला, तोंडभरुन कौतुक करायला, शाबासकी म्हणून पाठीवर थाप द्यायला जवळ आपलं असं कुणीतरी हवं ना…. नसेल तर….खूप प्रयत्न करून मिळालेलं हे यश, त्या सोबत आलेली सुबत्ता सगळंच मातीमोल ठरेल नाही का ? आयुष्य खरंच खुप सुंदर आहे. न मागता भरभरून मिळालेलं फक्त थोडे कष्ट घेऊन जपता आलं पाहिजे. अगदी माणसं सुद्धा… कायमची आपल्याशी बांधता आली पाहीजेत. आपल्या मनापासून त्यांच्या मनापर्यंत पोहोचता आलं पाहीजे. अहो आजकाल कुणावर नुसतं प्रेम असूनही चालत नाही तर ते वेळेत व्यक्त करताही आलं पाहीजे. कुणालाही आपल्याशी बांधायला वेळ लागणार नाही, फक्त हे बांधलेलं आयुष्यभर सांधता आलं पाहिजे. उत्तरार्धात मागे वळून पाहताना तो कष्ट करून मिळवलेल्या यशाचा टप्पा अगदी ठळक आणि ठसठशीत दिसला पाहिजे. त्या प्रत्येक टप्यावर दिसली पाहिजेत ती हीच सुंदर माणसं तुमच्या पाठीशी वटवृक्षासारखी अगदी खंबीर उभी .. सुंदर, निखळ, हसऱ्या चेहऱ्याची
कारण एकच….
सच कहाँ है किसीने…
वो फिर नहीं आते…..
© श्री. अनुप साळगांवकर – दादर
May 8, 2021 at 7:45 pm
खुप सुंदर आहे….. लिहीत रहा.
June 20, 2023 at 1:17 pm
खूप सुंदर लेख. खरं आहे, घड्याळाशी स्पर्धा करत धावतोय आपण, त्या ओघात सगळंच गमावतो आहे, आपली माणसं, नाती, समाधान, मनःशांती आणि बरंच काही.
June 20, 2023 at 1:32 pm
खुपचं छान लिहिलंय 💐💐👌👌👌👌
June 20, 2023 at 1:55 pm
Khup chaan …👍💯
June 21, 2023 at 2:10 am
Agadi khar aahe mastach!
Asech lihit raha ani aanand
Pasaravat raha
Pudhchya lekhachi vat
Pahatey khup khup
SHUBHECCHA 🌹❤️🤝
June 21, 2023 at 3:24 pm
सुरेख फारच छान ☺️
June 21, 2023 at 4:07 pm
।। श्री गुरूदेव दत्त।।
सकाळी सकाळी पारिजातकाच्या झाडावरून टपटप पारिजातकाच्या फुलांचा वर्षाव व्हावा आणि सार वातावरण सुगंधित व्हावे तसं तुमचे शब्द मनाला प्रसन्नता आणतात।असच लिहीत रहा।
June 29, 2023 at 8:08 am
👌👌फार सुंदर.
प्रत्येकाच्या भूतकाळातील चांगले अनुभव आणि भेटलेली माणसं ह्यांना आयुष्भर जपता आली पाहिजे हीच माणसे तुम्हाला वर्तमान काळा मध्ये जीवन आनंदाने जगण्यासाठी प्रोच्छाहित करतात.
हे फक्त आपला मी पना सोडल्यावरच शक्य आहे.
तुमचे लेखन नेहमी आम्हाला जीवनामध्ये चांगल्या गोष्टी आचरणात आणण्यात प्रोच्छाहित करते.
माझ्याकडून तुम्हाला असेच सुंदर लेखासाठी शुभेच्छा 🙏🙏
January 13, 2025 at 7:14 am
Awaiting moderation
amoxil online buy – amoxil brand combivent buy online