सध्या नुकतीच शिशिर संपून निसर्गाची वसंत ऋतुकडे वाटचाल सुरु झालीय. कोवळ्या उन्हात सावलीने गडद झालेल्या रस्त्यावरून चालताना पावलाखाली दिसते, चरचरते ती ….. प्रचंड पानगळ. हा असा ऋतू बदल झाला कि, हे व्हायचंच. पण काय होतं असतं नक्की ….? निसर्ग ऋतुपरत्वे अविरत, कुणालाही न कळता आपली कात टाकत असतो. म्हणूनच आत्ता ही पानगळ सुरु झालीय….. रस्ते नुसत्या पानांनी फ़ुललेयत, असं म्हणायला काहीच हरकत नाही. मला या झाडांचं एकंदरच फार अप्रूप वाटतं. जन्मापासून आपल्याला वाढवणाऱ्या, आधार देणाऱ्या मातीचा हात असा घट्ट धरुन, आपलं स्वतःचं स्वतंत्र अस्थित्व अबाधित ठेऊन, निसर्ग नियम आनंदाने स्विकारुन प्रत्येक झाड स्वाभिमानी ताठ मानेनी आपला हा कोरडेपणा झटकून स्वतःहून बोडकी होत जातात…..
या जुन्या, जीर्ण पानांजागी लवकरच नवी नाजूक पालवी फुटेल. पहाता पहाता ते झाड हिरवंगार बहरेल. आता हि सुकलेली जुनी पानं जागा करून देत आहेत, नव्यानं येणाऱ्या पानांसाठी …. नव्यानं येणाऱ्या हिरव्या पानांनीही हे स्वतःहून समजून घ्यायला हवं … आपणही उद्या गळून पडणार आहोत याचं भान ठेवायला हवं …. या पानगळतीत सगळं झाड निष्पर्ण होवून स्वतःला नव्यानं शोधत असतं … नव्याच नवेपण नव्यानेच जपत असतं. आपण आपलं कर्तव्य संपलं की आपली जागा सोडायची असते….मग ती जागा दुसऱ्या कुणी घेतली म्हणून असूया वाटू नये. खरं तर “माझी जागा” हि आसक्तीच सुटायला हवी. झाडावर उमलायचं, हिरवंगार बहरायचं पण, झाडात गुंतायचं नाही. रंग बदलला कि गळून पडायचं, आपल्याला हेच सांगायचं असेल ना या जुन्या जीर्ण पानांना. एकेक झाड निष्पर्ण होत जाताना पाहिलं कि मनात आपसूक विचार येतो, झाडाला दुःख होत नसेल ? आपण जन्माला घातलेलं, आपल्याला बिलगलेलं…..  महिनोन-महिने जपलेलं…. वाढलेलं … बहरलेलं …. आपलंच असं काहीसं…. प्रत्येक पान आपल्यापासून वेगळं करताना. आपलं प्रत्येक पान मातीला अर्पण करून हे असं तटस्थ उभं राहणं आपल्याला जमेल का हो ?
हे सारं चाललंय ते पुन्हा नव्याने बहरण्यासाठी…हि गळून पडलेली सगळी पानं आपले सर्व विकार, वासना गळून पडाव्यात तशीच गळून मातीला भेटतायत…कालानुक्रमे एकरूप होतात. तो मातीचा मऊपणा त्यांना आपल्यात सामावून घेतो. हा आपल्या मातीचा गुणधर्मच आहे …. सामावून घेणं. आपणही आपले हात झाडासारखे आकाशाला टेकले तरी आपल्या मातीला घट्ट धरून उभं राहायचं. म्हणजे मनात उन्मळून पडायची भीती राहत नाही.  कधी असंच ओल्या मातीसारखं मऊ व्हायचं. जितकं मऊ होऊ तितकं एकसंध राहू. जरा स्वाभिमानाचा, मी पणाचा ताठरपणा आला कि भेगाळलेल्या जमिनीसारखे या आयुष्याचे  तुकडे पडून फरपट झालीच म्हणून समजा. मनातल्या जुन्या, वाईट, बुरसटलेल्या विचारांना सुरकूतलेल्या पानांसारखं मातीत गाडून नवनिर्मितीचा ध्यास धरायला हवा. निष्पर्ण व्हायचं पण ते पुन्हा बहरण्यासाठीच. आपल्या पर्णहीन होण्यातही ती जिद्द दिसली पाहीजे.
निसर्गचक्र अविरत चालू असतं. खरंतरं प्रत्येक ऋतू आपल्याला काहीतरी शिकवून पहातोय … हे चक्र आपणच जरा नीट समजून घेऊ … म्हणजे आपल्या आयुष्याची हि गळती संध्याकाळ देखील स्विकारणं सहज आणि सोपं होईल. एकदातरी झाडासारखं बोडकं होता आलं पाहिजे. उन्हात उभं राहता आलं पाहिजे. सर्व काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ही आयुष्यातील पानगळ समजून ठरवून सांडता आली पाहिजे. आयुष्याचा सूर्य पुन्हा उगवणार आहे या निसर्गतत्वावरचा विश्वास दृढ झाला पाहिजे. तो बहर, ती हिरवळ पुन्हा अनुभवायला सज्ज झालं पाहिजे. जेंव्हा एखाद्या गोष्टीचा हा असा नैसर्गिक शेवट होतो, तेंव्हा ती हमखास जगण्याला अर्थ देणाऱ्या एका नव्या सुखद गोष्टीची ती सुरुवात असते…शिशिरातील आजची ही पानगळ येऊ घातलेल्या वसंतातील बहराची चाहूल आहे … .. फक्त ती चाहूल आपल्याला जाणवली पाहिजे … ती झरझर झरणारी पानगळ मोठ्या मनाने स्विकारली पाहिजे … .. तो निष्पर्ण क्षणही हसत हसत जगता आला पाहिजे.
हे ज्याला कळलं त्याचं जगणं समृद्ध झालं  .. ….!!! 


कृष्णार्पणमस्तू
© श्री.अनुप साळगांवकर – दादर