मत्सखा रामचन्द्रः
सध्यातरी रामाने मनात घर केलय….. का कुणास ठाऊक…. पण राम फार आवडायला लागलाय …. अगदी मनापासून …. भौतिक जगात काही गोष्टीही घडतायत … मला आपसूक रामाशी जोडतायत …. अवती भोवती सगळ्याच अगदी पोषक घटना. म्हणूनच तर त्यांना “श्री राम” हा देवाचा दर्जा न देता फक्त “रामssss” म्हणून आपलेपणाने संबोधता येत. “मत्सखा रामचन्द्रः” (मत्सखा= माझा +सखा ) असं म्हणताना तो आपसुकच माझा होऊन जातो. तो माझा सखा आहे, मित्र आहे … म्हणजेच माझा आहे….. म्हणूनच फक्त “राम.” त्याला सगळं सांगता येईल … मनातलं सारंच मांडता येईल…. स्वतःला रिकामी होता येईल…. त्याच्याशी आपलेपणाने हक्काने भांडता येईल … तो रागावणार नाही … तो रुसणार नाही …आणि तो दूरावणारही नाही…तो असेल सोबत नेहमीच … या माझ्या प्रत्येक क्षणात … माझ्या कणाकणात.
दिवाळीचं निमित्त म्हणून जवळच्या एका मित्राला एक पत्र लिहिलं …. मुद्दामच लिहिलं…..खुप दिवसांनी असं मनापासून लिहावंसं वाटलं. टाईप करता आलं असतं, सोपं ही झालं असतं…. पण त्यात एक कोरडेपणा वाटतो, तो आपलेपणा जाणवणार नाही ….. म्हणून आग्रहानं लिहिलं. त्यात रामाबद्दल ठरवून चार ओळी लिहिल्या. “तुझ्यात राम रुजवायचाय ….” ही त्यातलीच एक. लिहिताना अगदी सहज लिहून गेलो त्या पत्रात. आपण हातून आपसूक एखादी गोष्ट अशीच सहज घडते पण पडसाद मात्र कायम उमटत रहातात. आपण विसरुनही जातो पण ती गोष्ट आपल्याला आपल्याशी कायम बांधून ठेवते…. कदाचित् जन्मभर . लिहीतानाच त्या पत्रातल्या त्या एका वाक्याने मला क्षणभरातच रामाशी जोडलंय. तो आहे आणि तो माझाही आहे, हा विश्वास दिलाय. त्यानेच संतश्रेष्ठ कबीराचे शेले विणलेयत. “कबीराचे विणतो शेले … कौसल्येचा राम” हे गाणंही मला आजकाल मनापासून आवडायला लागलंय. त्याने येऊन माझेही काम सोपे करावे हि अपेक्षाच नाही. पण, तो रक्षण करेल…. वाईट शक्ती … वाईट माणसं या साऱ्या पासूनच…. हा विश्वास मात्र वाढू लागलाय. आपण कुणाचा तरी हात धरला तर तो कधीतरी सुटेल अशी भीती असते ना आपल्याला. तोच हात जर दुसऱ्याने धरला असेल तर…..??? आपला भार हलका होतो….निश्चिंत होता येत. तो सुटणार नाही याची खात्री देता येते. तीच खात्री आता मला माझ्या रामाबद्दल देता येईल. ते एक वाक्य लिहिल्यापासून रामाने माझा हात धरलाय असं म्हणायला हरकत नाही. आणि …. नुसता धरला नाही तर तो घट्ट धरलाय…. मार्ग दाखवायला.
समोरच्यात काहीतरी चांगलं रुजवायचं म्हणजे ते सगळ्यात आधी आपल्यात रुजायला हवं. अंतरंगात … शरीराच्या प्रत्येक अणू रेणूत भिनायला हवं. रामाला समजून घ्यायचं म्हणजे नक्की काय करायचं हो….? माझं मला काहीच माहित नव्हतं…. कळतही नव्हतं. मनापासून “सार्थ रामरक्षा” पाठ करावीशी वाटली… केली….पाठही झाली. मी केली म्हणण्यापेक्षा रामाने त्याच्या इच्छेनुरुप करवून घेतली. त्याच सुमारास यु -ट्यूब वर श्री. गोंदवलेकर महाराजांची “नादातून या नाद निर्मीतो … श्री राम जय राम जय जय राम” हि आरती ऐकण्यात आली. घरी सगळ्यांनी ऐकावी म्हणून लावली तर सगळ्यांचा फारच आवडली…त्यावर त्यांच्या उस्फुर्त सुरेख प्रतिक्रिया. आता रोज ऐकतो….. पाठही होईल… हळूहळू. सुंदर शब्द आहेत त्या आरतीचे….आणि त्याहीपेक्षा गोड मनाचा ठाव घेणारा आवाज.
या यंदाच्या दिवाळीपासून सगळंच बदलायला लागलं. नेट वर पाहताना अचानक रामाचे छान छान फोटो त्यांची माहिती समोर येऊ लागली. त्यांच्या फोटोतल्या स्मित हास्याची कोडी उलगडू लागली. मी सापडलेली उत्तम माहिती जतन करुन उत्कंठेने वाचुनही काढली. खूप काही सापडत गेलं… न शोधता भेटत गेलं…. मी मात्र रमत गेलो… “रमे रामे मनोरमे” रमत गेलो…..कुणात..? तर रामात. कुणी रामाचे… माहितीचे विडिओ पाठवत होतं. तर कुणी फोटो … सारं काही न मागता मिळत होतं… माझं आणि त्याचं एक नातं जुळंत होतं. मला माझ्या वडीलांनी दिलेलं “आनंदरामायण” हे पुस्तक पण अचानक सापडलं. हा योगायोग जरी असला, तरी हा विलक्षण योगायोग आहे. असाच एक दिवस कामाच्या ठिकाणी कामानिमित्त एका मॅडमशी संपर्क झाला. काम झाल्यावर इतर गप्पांत मी विचारलं, “सध्या कामाव्यतिरिक्त काय नवीन चालू आहे.” त्यावर त्या म्हणाल्या “रामरक्षेचं निरूपण ऐकतेय.” मी लागलीच मलाही लिंक पाठवा सांगितलं. श्री संजय उपाध्ये यांनी शिकागो मध्ये केलेलं हे रामरक्षेचं निरूपण. माझे सध्या आठ भाग ऐकून झालेत. प्रत्येक भागात मला राम वेगळा सापडतो. मला अचंभित करतो. तो संपूर्ण आहे तसाच परिपूर्णही आहे. निरुपणातल्या सार्थ रामरक्षेतला प्रत्येक शब्द … त्याच्या भावार्थ …. आणि प्रासादिक भाषा … ऐकून मनाला एक उर्मी येते. आपल्याला हवा अगदी तसाच राम समोर उभा राहतो….. “रक्षणाय मम्” असं म्हणताना आपल्या रक्षणासाठीच.
गेल्या आठ्वड्याचीच अजून गोष्ट नमूद करतो. एका मित्राला खूप पूर्वी रामधून पाठवली होती. माझ्याकडेही कुठून आली आता आठवतही नाही. बरेच महिने लोटले असतील. ती धून काहीशी तुटक होती “राम राम जय राजा राम …राम राम जय सीता राम” अशी आणि एवढीच … अर्धीच असावी बहुतेक. त्याने मला मेसेज मध्ये ती धून परत पाठवून त्या पुढे “पूर्ण दे … ” असे लिहून पाठवले. मी इतरत्र शोधली ती धून पण मला काही पूर्ण मिळाली नाही. त्याला तसे कळवून मी विषय संपवला. आत्ता दोन दिवसापूर्वीच त्याचा मला मेसेज आला. त्याला ती धून सापडली होती आणि प्रयत्नपूर्वक ती सापडल्याचा खूप आनंदही त्याला झाला होता. ती त्याला सापडल्यापासून मला सारखा सांगत होता. ” हि धून मला खूप आवडते रे ….ते शब्द… ती वाद्य …एक वेगळंच विश्व निर्माण करतात … मन प्रसन्न होतं.” ती श्री. रतन मोहन शर्मा यांची राम धून. मला इकडे हेच सांगायचंय कि किती प्रकारे तो राम माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. त्याला काय गरज आहे हो …. पण करतोय …. का ??? कुणास ठाऊक ???कदाचित माझ्यापर्यंत पोहचून त्याला इतरांपर्यंत पोहोचायचं असेल. असो …. मी प्रयत्न करणार आहे. मला याच गोष्टीचा आनंद आहे, कि त्याने माझी निवड केलीय. मला खूप आवडेल ही (मत्सखा) माझ्या नव्या सख्याशी झालेली माझी नवी मैत्री मनापासून जपायला.
शुभं भवतु
कृष्णार्पणमस्तु
© श्री. अनुप अनिल साळगांवकर, दादर.
January 25, 2021 at 10:09 pm
Jai siya ram
January 25, 2021 at 10:27 pm
Waaaaah 👌👌👌👌khupch chan lihilay
January 25, 2021 at 10:38 pm
एकदम मनाला भिडलं.
January 25, 2021 at 10:39 pm
छान अभिप्राय