एका तळ्याकाठी एक सुंदर बगीचा होता. विवधरंगी फुलांनी बहरलेल्या या बगीच्यात माळीकाकांनी एक नवीनच गुलाबाचं छोटुसं रोपटं लावलं होतं.  माळीकाका संपूर्ण बगीच्याची खूप काळजी घेत, झाडांना वेळेवर पाणी देत, जमिनीची छान मशागत करत, विशेषतः या नवीन गुलाबाच्या रोपट्याची. दिवसागणिक गुलाबाच्या रोपट्याची छान वाढ होत होती, ती वाढ पाहून माळीकाकाही फारच आनंदी होत. एके दिवशी झाडांना पाणी देताना माळी काकांना त्या गुलाबाच्या रोपट्याला पाहुन आश्चर्याचा सुखद धक्का बसला, त्या रोपट्याला पहिल्यांदाच दोन सुंदर कळ्या आल्या होत्या. माळीकाका या कळ्या फुलण्याची आतुरतेने वाट बघू लागले. त्या कळ्याही फुलण्याच्या तयारीत असताना अचानक एका रात्री पहिल्या कळीला कुणाच्यातरी रडण्याचा आवाज आला. तीने आवाज ओळखीचा वाटतो म्हणून आजूबाजूला पाहले तर दुसरी कळी बिचारी पानाआड तोंड लपवून हुंदके देऊन रडत होती. पहीलीला फारच काळजी वाटली म्हणून पहिलीने विचारपूस केली, “काय झालं गं…… तू का हिरमूसलीयस…?” या प्रश्नावर दुसरी कळी म्हणाली ” अगं …….उद्या आपण उमलणार आणि उद्याच आपल्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरणार. आपलं एक दिवसाचं आयुष्य निरर्थक संपणार याच मला फार वाईट वाटतं. हे असं आयुष्य कुणाच्याही वाट्याला येऊ नये. बघ ना काहीच सुख लाभणार नाही आपल्याला. ”  पहिली कळी दुसरीचं सगळं म्हणणं निट ऐकून घेते आणि गालातल्या गालात हसते. ” अगं हसायला काय झालं..??” या दूसरीच्या प्रश्नावर पहिली दुसरीला समजावताना म्हणते, ” अगं… तू खूप साधासा विचार करुन रडतेयस. आपले आयुष्य संपणार याचे वाईट वाटून घेण्यापेक्षा आपण थोडा वेगळा विचार करूया. मी एक सुंदर विचार केलाय बघ…..उद्या आपण जेव्हा उमलू तेव्हा आपल्या सुगंधाने अनेक फुलपाखरे आपल्याकडे आकर्षित होतील, आपल्या जवळ येवून आपल्याशी खेळतील, आपल्या सुगंधाने भारावून मनुष्य आपल्याला दिर्घकाळासाठी अत्तराच्या कुपीत जतन करून ठेवेल, स्त्रिया आपल्याला डोक्यावर मिरवून त्यांच्या सौंदर्यात भर घालतील, अनेक देवघरात आपल्याला देवपूजेचा सन्मान मिळेल, सजावटीसाठी आपली सुंदर आरास मांडली जाईल. एवढं सगळं सुखं…… उपयोगी पडल्याचं समाधान एखाद्याला देणार आपलं अस्थित्व मग निरर्थक कसं ठरेल. या उलट आपण कुणाच्यातरी उपयोगी पडू शकतो, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमलू शकतो याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे…हो ना “
दुसऱ्या कळीला हा वेगळा विचार फारच भावला. स्वतःच्या वेगळेपणाची जाणीव निर्माण झाली आणि तीचा मनमूराद आनंद गगनात मावेनासा झाला. तीने पहील्या कळीचे या वेगळ्या आणि सुंदर विचारासाठी आभार मानले.
दोन्ही कळ्यांना पहाटेच्या नवचैतन्याचा सूर गवसला आणि एक एक पाकळी बाजूला सारून कळी टवटवीत फुलात परावर्तीत झाली. 
सकाळी माळीकाकांनी ती दोन्ही फुले पाहीली. अगदी ताजी, मधूगंधीत फुले त्यांनाही फारच भावली. या त्यांच्या गुलाबाच्या रोपट्याची पहीलीच दोन फुलं. त्यांनी हळूवार फुलांवरुन हात फिरवून ती हळूच तोडली पहिल्या फुलाला देवळात देवाच्या पायावर स्थान मिळाले तर दुसरया  फुलाने एका आकर्षक पुष्पगुच्छाची शोभा वाढवली. दोन्ही फुलांच आयुष्य सार्थकी लागलं. लहानगी कळी म्हणून जन्माला आलेल्या दोन गुलाबाच्या फुलांचं आयुष्य या एका वेगळ्या सकारात्मक विचाराने समृद्ध झालं.
म्हणूनच दोस्तहो उद्याची काळजी न करता परिस्थिती चांगली-वाईट कशीही असली तरी आनंदाने फुलात रहा. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवा आणि सदैव फुलासारखं दरवळत रहा.