पिंपळ – गूढ कथा – भाग १

आज दिवसभरात अधीरचा सूर काही लागत नव्हता. त्याच्या अस्वस्थ मनाची प्रचंड चिडचिड होत होती. आजीने जे काही सांगितले त्याचा आणि “मला वाचवं” या विनवणीचा काहीच संबंध लागत नव्हता. “घरातून बाहेर पडायचं नाही,” असं आजीने आज बजावलं होतं. त्यामुळे घरातून काढता पाय घेणंही त्याला अशक्यच होतं. मुंबईला परतण्याचीही जरा घाईच होती. त्या पिंपळाच्या झाडाचा आणि आजोबांच्या अकाली मृत्यूचा त्याला लवकरच काहीतरी सोक्ष-मोक्ष लावायचाच होता. त्याशिवाय त्याला जराही शांती लाभणार नव्हती.
अपरात्री आजीचा डोळा लागलाय हे पाहून अधीर हळूच घराबाहेर पडला. रात्रीचा किर्रर्र अंधारात चाचपडत चर्णावतीच्या घाटावर पोहोचला. चर्रर्र…. चर्रर्र ……. पाचोळ्यात पावलं वाजवत इतक्या भयाण अंधारात घाटाच्या पायऱ्या उतरताना आता त्याला जराही भीती वाटत नव्हती. त्याच्या मनत फक्त प्रश्न आणि त्यांची अनुत्तरित उत्तरं हेच चक्क अव्याहत चालत होतं. काहीही झाले तरी त्याला ती ऊत्तरं आज पिंपळाच्या झाडाकडून मिळवायचीच होती. तशी त्याने आपल्या मनाशी खूणगाठच बांधली होती. अतिशय निर्भयपणे घाटाच्या पायऱ्या उतरून तो किनाऱ्यावर उभा राहीला. डोळ्यात प्रश्नाचं वादळ घेऊन त्याने समोर पाहिलं तर ते पिंपळाच झाड अंधारातही आपले पाय रोवून त्यासमोर घट्ट उभं होतं. रात्रीच्या निळसर चंद्रप्रकाशात न्हाऊन निघालं होतं. ती जळलेली काळी पानं आता चंदेरी निळसर दिसत होती. वाराही संथ गार वाहत होता. त्या वा-यावर फेर धरुन ती पिंपळाची पाने किलकिल करुन नाचत होती. समोरचं दृष्य अगदी सुंदर चित्रवत शांत आणि प्रसन्न दिसत होतं. आज अधीरला त्या झाडाचा भूतकाळ आणि आजोबांच्या अकाली मृत्यूचं गूढ या दोन्ही गोष्टी जाणून घायच्या होत्या, त्याशिवाय गावातलं हे भयाचं तांडव संपणार नव्हतं. “मला वाचव” असं ते झाड का म्हणालं ? त्यामागचा उद्देश नक्की काय ? आजोबांच्याही कानाला का दडे बसायचे? त्यांना अचानक येणाऱ्या या मृत्यूचं कारण काय ? गावातल्या ऐकीव गोष्टीत खरंच तथ्य आहे का ? अशा अनेक प्रश्नांची चलबिचल त्याच्या मनात सुरूच होती.  सळSS…..  सळSS …… सळSS ….. सळSS….. एकाएकी ते झाड सळसळलं… …तसा अधीरच्याही अंगावर सरसरून काटा उभा राहिला….. पोटात खड्डा पडला……..अधीरच्या मनाचा मागोवा कदाचित त्या झाडानेही घेतला होता. क्षणात सारं वातावरणच बदलून गेलं. चर्णावती निस्तब्ध वाहू लागली…… झाडाची सळसळ थांबली….. वाराही निपचीत वाहू लागला. ते पिंपळाच झाड आज अधिरला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार होतं, इतकी वर्षे मनातलं सारं सांगून, स्वतःला या परकायेतून मोकळं करून घेणार होतं. अधीर परिस्थितीला न घाबरता किनाऱ्यावर तळ ठोकून उभा राहिला. त्याने नदीत पाहिलं….. नदीत चंद्रबिंब गडद झालं….. चर्णावतीत शुभ्र चंद्रप्रकाश तरळू लागला……नदीच्या संथ प्रवाहाच्या पडद्यावर आता त्या पिंपळाचा जीवनपट हळूहळू उलगडू लागला….. शुभ्र प्रकाशात अधीरचे डोळे लक्ख उघडले…… त्या विस्फारलेल्या डोळ्यांनी त्याने नदीत पाहीलं.
शतकोत्तर घडून गेलेल्या घटना जशाच्या तशा एकपाटोपाठ एक पाण्यावर तरळत होत्या, डोळ्यांना स्पष्ट दिसत होत्या….. अगदी काल-परवा घडल्या अशाच….. एकामागून एक घटनेची शृंखलाच अधीरपुढे चित्रफितीसारखी झळकत रहीली….
पूर्वापार पक्षांनी झाडावर बसून खालेल्या फळांच्या अनेक बिया चर्णावतीत वाहून किनाऱ्याला लागायच्या. नदीकाठच्या सुपीक जमिनीत त्या रुजायच्या आणि तग घरून उभं राहायच्या. नदीशेजारच्या याच सुपीक जमिनीत असे अनेक वृक्ष रुजले, वाढले, बहरले. असंच एक जंगल चर्णावतीच्या किनाऱ्यावर उभं राहिलं. फुला-फळांनी वेढलेलं, कळी-पानांनी बहरलेलं. नदीकाठी अनेक प्राणी, पक्षी आणि त्यानंतर गावे वसू लागली. गावातील जमात सुरुवातीला उपजीविकेसाठी जंगलातील लाकूडफाटा गोळा करणं, फुले-फळे गोळा करून बाजारात विकणं हे उद्योग करीत. हळूहळू त्यांच्यात सुधारण्या होत गेल्या. अनेक नवनवीन गोष्टी कळू लागल्या. त्यातच पिंपळापासून लाख तयार करता येते आणि बाजारात या लाखेस खूप मागणी आहे म्हणून हा लाख तयार करण्याचा नवा उद्योग त्यांनी सुरु केला. जंगलात अमाप पिंपळाची झाडे होतीच. ती झाडे तोडण्याऐक्षा हे गावकरी ठरवून एखाद्या पिंपळाच्या झाडापाशी जमायचे त्या झाडाला रिंगण घालून उभे राहायचे आणि मोठ्या मोठयाने त्या झाडाला दूषणं द्यायचे. काही दिवसातच ते झाड कोलमडून पडायचं. ह्या कोलमडून पडलेल्या झाडापासून लाख तयार करायचे आणि बाजारात विकून बक्कळ नफा कमवायचे. त्यांचा हा उद्योग अनेक वर्ष चालू होता. या लाखेच्या उद्योगापायी जंगलात अनेक जिवंत पिंपळाच्या झाडांनी आपला जीव गमावला होता. आता चर्णावतीच्या किनाऱ्यावर पिंपळाच  एकच झाड उरलं होत. सजीव असलं तरी ते पळू शकत नव्हतं. आपला जीव वाचवणं त्याला भाग होत. कुणीही गावकरी त्या झाडाबाजूने गेला कि, ते विचित्रच सळसळायचं ….. जंगलातली शांतता चिरुन तो आवाज खूप भेसूर आणि विचित्र वाटायचा….. झाडाखालून चालणाऱ्याची घाबरगुंडी उडायची…… दरदरुन घाम फुटायचा……. एकट्या दुकट्या व्यक्तीला पाहून तो पिंपळ सळसळून आपली सुकलेली पानेही झाडायचा……अचानक आपल्यावर पडलेल्या एवढ्या पानांच्या गर्तेत व्यक्तीस श्वास घेणेही कठीण व्हायचे……गुदमरून त्यातच काहींचा मृत्यू व्हायचा….. एकाएकी गावात श्वास लागून अनेक माणसे मरू लागली. गावात एकच खळबळ उडाली. पिंपळाचा भीषण अनुभव बऱ्याच गावक-यांना आला होता. गावकरी त्या पिंपळाच्या रस्त्याला जायचे टाळू लागले. पिंपळाच्या झाडाची गावकऱ्यांपासून सुटका झाली खरी पण “पिंपळावर मुंज राहतो” हि अफवा गावभर पसरली. त्या पिंपळाच्या आजूबाजूचा परिसर हळूहळू निर्मनुष्य झाला. घाटावरही कुणी फिरकेनासं झालं. गावक-यांची भीती त्या जागेत झिरपल्याने झाडाचा परिसर खूपच निरव आणि भयप्रद जाणवू लागला. अधीरच्या आजोबांनी गावगुज ऐकून आपल्या घरावर आलेल्या दूर्दैवी प्रसंगासाठी पिंपळालाच जबाबदार धरले. कोणताही पुढचा-पाठचा विचार न करता त्यांनी निष्पाप झाड क्षणात पेटवून दिले. त्यानंतर परतताना त्यांना चर्णावती नदीच्या पाण्यात झाडाचा हा सारा भूतकाळ दिसला होता. आपलं कर्म चुकलं आणि एक पाप आपल्या हातून घडलं असं त्यांना सतत वाटू लागलं. कुणाच्याही नजरेला नजर देण्याचं धाडस गमावून बसले. मनावर अगदी खोल परिणाम झाला. ते वेडसर वागू लागले, त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
अधीरला आता खरं खोटं काय ते कळलं होतं. पहाटेचा पहीला प्रहर सुरु झाला तसा गार वारा अंगाला झोंबत होता. निळसर आकाश, तांबूस नारिंगी रंगात उजळत होतं. आजी उठायच्या आत तो घाटावरुन झपझप पावलं टाकत घरी परतला.
ते झाड पुन्हा हिरवंगार उभं करणं हे नवं आव्हान आता त्याच्यापुढे उभं होतं. त्याला त्या पिंपळाला नवजीवन द्यायचं होतं. त्याच्या जगण्याच्या सगळ्याच इच्छा पूर्ण करायच्या होत्या. सा-या गावक-यांच्या वतीने त्याला त्या झाडाची माफी मागायची होती. दिवसभर हाच विचार त्याच्या मनात रुंजी घालत होता. सायंकाळी अचानक तांब्याचा कलश आणि पुजेचं सारं साहित्य घेऊन अधीर लगोलग घाटावर पोहोचला. उन्हं कलायला लागली होती. अधीरने समोरच्या किनाऱ्यावर उभ्या त्या पिंपळाकडे पाहिलं. मावळतीची किरणं त्या झाडावर पडून त्या किरणात चमकणारं ते सोनेरी झाड आज फारच आनंदी दिसत होतं.
पाण्यात उतरुन अधीरने जवळच उभ्या होडीची कास हळूच सोडली. धीम्या पावलाने होडीत बसून वल्ह्याने पाणी बाजूला सारत तो नदी पार करू लागला. नदीच्या पाण्याचा वेग मंद होता. हळूहळू अंधार वाढत होता. अंधारात फक्त चंद्राचा प्रकाश पाण्यावर पडून इतरत्र पसरला होता. आकाश पुन्हा निळसर काळ्या ढगांनी वेढलं होतं. काही वेळातच नाव समोरच्या किनाऱ्याला लागली. अधीर सावकाश किनाऱ्यावर उतरला नाव बांधून घातली. त्या तांब्याच्या कलशात चर्णावतीला हात जोडून पाणी भरुन घेतलं. मागे वळून समोर पाहतो तर….. ते भलं मोठं पिंपळाच झाड……इतक्या अवाढव्य झाडापुढे आपण अतिशय खुजे असल्याची जाणीव झाली. अधीर शांत मनाने आणि प्रसन्न मुद्रेने त्या झाडापाशी पोहोचला. आणलेल्या पुजेचे सामान मांडून त्याने हळद-पिंजर वाहून, कापूर-उदबत्या पेटवून त्याने पिंपळाची मनोभावे पूजा केली. झाडावर गावक-यांनी केलेल्या अन्यायाची माफीही मागितली. कलशातून आणलेलं चर्णावतीचं पाणी झाडाला घातलं. इतकी वर्षे तहानलेलं ते झाड घटाघटा पाणी प्यायलं, हे पाहून अधीरने अजून दोन-चार कलश पाणी आणून झाडाला घातलं. झाडं पाणी पिऊन तृप्त झालं तसा तो गावात परतला. दिवस संपला……….
आज पहाटे अधीर जरा गडबडीत मुंबईला परत जायला निघाला होता. एक कोसभर चालून त्याला वेळेत एस. टी. गाठायची होती. झपझप पावलांना वेग देत घाटाशेजारच्या रस्तावरुन चालताना त्याला पलीकडून सळSS…… सळSS …….सळSS……..सळSS…… आवाज आला. त्याने आवाजाच्या दिशेने पाहीलं ……आणि अवाक झाला…… ते…… ते….. झाड …… पिंपळाचं झाड …..तिकडे नव्हतंच….. त्याने जवळ जाऊन पाहीलं तेव्हा त्याला जाणवलं…… मुळासकट उमळून ते चर्णावतीत वाहून गेलं होतं…….त्या झाडाची चर्णावतीने जलसमाधी स्विकारली होती……. आज त्याला ख-या अर्थाने मुक्ती मिळाली होती…….कायमची.