घाटाच्या शंभर-दिडशे पायऱ्या उतरून अधीर चर्णावतीच्या पाण्यात पाय बुडवून बसला. मुंबईहून नुकताच प्रवास करून आल्यामुळे थोडा थकला होता. गावात जाताना वाटेवरच्या नदीच्या घाटाच्या सौंदर्याने त्याला मोहीत केलं होतं. पाण्यात पाय घातल्यावर पायाला जाणवणारा थंडगार पाण्याचा स्पर्श त्याला सुखावत होता. पायाच्या बोटांची पाण्यातली हालचाल अधांतरी हवेत असल्याचा भास निर्माण करत होती. समोर मावळतीला जाणारा सूर्य पांढऱ्या शुभ्र ढगांवर लाल गुलाल उधळून दिवसाचा निरोप घेत होता. नदीच्या पाण्याचा खळखळाट त्या सायंकाळच्या शांत वातावरणाला भेद देत कान तृप्त करत होता. खुळ खुळ घुंगरू वाजवत चर्णावतीसंथ वाहत होती. आता पाच दहा मिनिटात गावात परत जायचं म्हणून उठणार इतक्यात, त्याने पाण्याचं पात्र नजरेने मापत काठावरून पल्याड पहिलं. नदीच्या पलीकडे असलेल्या भल्या मोठ्या पिंपळावर त्याची नजर स्थिरावली. अतिशय जुनाट असा, दहा जणांच्याही कवेत मावणार नाही एवढा मोठा बुंध्याचा भाग दुरूनही नजरेला विस्तीर्णच दिसत होता. काळी करपटलेली बदामाच्या आकाराची पाने त्याला खुणावत होती. सळSS…  सळSS …. सळSS … सळSS… त्या पानांचा सळसळाट इतक्या दूर असूनही त्याला स्पष्ट ऐकू येत होता. नदीचा खळखळणारा, कानांना सुखावणारा प्रवाह आणि त्या पिंपळाचा सळसळाट अचानक त्याच्या कानांना नकोसा वाटू लागला. त्याचे कान एकाएकी सुन्न झाले. त्या पानांची सळसळ त्याला स्वतःकडे आकर्षित करत होती, डोळे सताड उघडून डोळ्यात भरलेला त्या पानांचा गडद काळा रंग, सरसरून थंड पडलेल्या शरीरातल्या मनाची निर्विचारी स्थिती आता त्याला आतूनच अस्वस्थ करत होती. क्षणात …….झपकन वाऱ्याची एक वादळी झुळूक आली आणि पिंपळावर आदळली……… पिंपळाची सगळीच पान झाड सोडून सैरावैरा पळत सुटली सपSS……  सपSS……सपSS……सपSS…… अधीरच्या अंगावर धावून आली. एकामागोमाग एक करून ती त्याच्या चेहऱ्यावर आदळू लागली. अधीरने दोन्ही हाताच्या मनगटाची फुली करून डोळे झाकले खरे, पण त्या हाताच्या बोटांमधल्या फटीतून, किलकिल्या नजरेने तो समोरचं जे काही घडतंय ते पाहत होता. क्षणभरातच कानाभोवतीचा आवाज जरा मंदावला तसे त्याने हाताची बोटे अजून थोडी रुंदावून बोट्यांच्या मोठाल्या फटीतून समोर पहिले. त्या पिंपळाच्या झाडाच्या फांद्यांवर आता एखाद -दुसरं पान शिल्लक असेल. पानांशिवाय पिंपळाच ते बोडकं  झाड आता फारच भयंकर दिसत होतं. त्या झाडपाठी लालेलाल सूर्य आता जमिनीला टेकला होता. अंधार वाढला तश्या झाडाच्या फांद्या एकात एक गुंफू लागल्या….. झाडाचा शेंडा आभाळ गाठू लागला ….. त्या विस्तिर्ण झाडाचा आता आकारच पालटू लागला ….. फांद्या शंभर हातासारख्या दिसू लागल्या….. त्या फांद्यांच्या बोटांची ती वळवळ दुरूनही डोळ्यांना स्पष्ट जाणवत होती….ते फांद्यांचे लांबसडक हात पुढे सरसावून आपल्या गळ्याचा सहज घोट घेतील, अशी भीती अधीरच्या डोळ्यात दाटून आली….. मुंडक नसलेल्या मानवी धाडसारखं ते झाड आता खूप भयानक आणि किळसवाणं वाटायला लागलं. चर्णावतीही वेगाने कर्कश्य आवाज करत धावू लागली. क्षणभरापूर्वी मनोहर वाटणारा हा सारा परिसरच आता त्या झाडासारखा विचित्र आणि भयावह वाटू लागला. वेळेचं भान ठेवत गावाकडे जायला अधीर पाठी वळणार इतक्यात सपा SS……  सपSS……ती उरलेली दोन- एक पाने त्याचा कानावर येऊन चिटकली. क्षणार्धात त्याने डोळे करकचून मिटून घेतले नी दोन्ही हाताने कान बंद केले……. सगळीकडे स्मशान शांतता पसरली…. कानात एकच आवाज घुमला …. ” मला वाचव ” ………या आवाजाने अधीरचे डोळे लक्ख उघडले  ….. कानावरचे हात  सरले ………कानाला चिकटलेली पाने सर्रर्रर्रर्रकन उडून गेली ……… समोरच ते पिंपळाचा झाड फांद्यांचे सहस्र हात अधीर समोर पसरून उभं होतं. ते पुढे सरकणार इतक्यात प्रसंगावधान राखत गावाच्या दिशेने धूम ठोकली.
पहाटे झुंजूमुंजू झालं, कोंबड्याने बाग दिली, कोवळी सूर्याची किरणं अंगावर पडली तशी अधीरला जाग आली. डोळे किलकिले करुन त्याने पाहीलं, नातू उठला म्हणून आजी त्याच्या बाजूला येऊन बसली. मोठ्या मायेनं त्याच्या केसातून हात फिरवला. ग्लासभर गरम, ताज दूध देऊन म्हणाली, “जरा तब्बेतीची काळजी घेत जा ……. किती वाळलायस….. काल रात्री आलास तसा काहीही न खाता, न बोलता झोपलास…. असं उपाशी पोटी झोपू नये …….वाईट वंगाळ स्वप्न पडतात.” ग्लासभर दूध घेऊन काहीही न बोलता अधीरने आन्हिक आटोपले, तरी त्या पिंपळाच्या झाडाचा विचार सतत त्याच्या मनात येतच होता. आजीने अधीरला आवडते म्हणून दुपारच्या जेवणात केळफुलाची भाजी केली होती. जेवणातही त्याचे लक्ष लागे ना. आजीलाही जाणवले कि अधीर कसल्यातरी विचारात सकाळपासून व्यस्त आहे. काहीतरं बिनसलंय लेकाचं. मुंबईतल्या कामाचा खूप ताण असेल म्हणून तिनेही फार लक्ष दिले नाही. सायंकाळ पर्यंत सगळं निवळेल म्हणून गप्प बसली. सायंकाळ झाली उन्हं कलली. दिवेलागणीच्या वेळ झाली. आजीने वात वळली, दिव्यात तेल घालून उजळवली. देवाला नमस्कार केला. रात्रीचे जेवण उरकून अधीर आजीच्या मांडीवर डोकं ठेवून अंथरुणावर पडला. आजीने ” ये केसांना तेल चोळून देते.” म्हणून त्याला जवळ घेतले. त्याच्या केसावरीं हात फिरवला आणि म्हणाली, ” मुंबईच्या व्यापात एकदा का माणूस अडकला कि तो पुन्हा गावाकडे फिरकत नाही. तू मात्र आठवण आली कि येतोस मला भेटायला. तु येणार या एकाच आशेवर अजूनही दिवस ढकलतेय. तु आलास की, तुझ्या मुंबईकडच्या गप्पा कधी संपतच नाहीत. मलाही तुमच्या सगळ्यांची खुशाली तुझ्याकडूनच समजते. आजचा दिवस सरला, तू माझ्याशी काहीच बोलला नाहीस… काही बिनसलंय का रे बाळा ? कुणाशी भांडून आलायस का मुंबईहून ? मला सांग रे …. मी बघते एकेकाकडे ” आजीचे बोलणे ऐकून अधीरने आजीचा हात घट्ट धरला, आजीच्या हाताला त्याचा स्पर्श जरा वेगळा, भीतीने भेदरलेला जाणवला. आजीला कालच्या घडलेल्या पिंपळ बद्दल काही सांगू की नको …???असा विचार करत, ” तसं काहीच नाही गं…. ते ….. ते……काल….काळं …. पिंपळ” असं काहीस पुटपुटला. “पिंपळ” हा शब्द गरम तेलासारखा आजीच्या कानात शिरला आणि आजीने झटकन आपला हात त्याच्या हातून सोडवून घेतला…. दोन्ही हातांनी लोटून अधीरला मांडीवरून दूर सारला, ” मेल्या ….. घाटावर गेलेलास तू …. तुला कितींदा सांगून झालं …… बजावून झालं…..घाटावर फिरकायचं नाही ….. तो पिंपळ कैक जणांना खाऊन झालाय. ” एवढं बोलून आजीने तोंड मिटलं. पूर्वी ती एवढंच सांगायची, कि “घाटावर जायचं नाही.” आज तिने का जायचं नाही याचा थोडा उलगडाही केलेला कि, तो पिंपळ ….. तो …..कैक जणांना ….. म्हणजे काल संघ्याकाळी जे काही घडले तो अधीरचा भास नव्हता. घडलेल्या घटनेने अधीर आता खूप बेचैन झाला ……त्याच्या धीर आटू लागला……आजीला सारखं त्या पिंपळाबद्दल विचारू लागला. ” सांग ना आजी …. तो पिंपळ नक्की काय करतो …. आणि कुणाला खाल्लं त्याने ….. ए आजी …..सांग ना ….. तू नाही सांगितलेस तर मी जाऊन त्या पिंपळालाच विचारीन.” अधीरची उत्सुकता आता शिगेला पोहोचली होती. आपल्या लाडक्या नातवाची काळजी आजीच्या डोळ्यात अश्रू बनून ओघळत होती. खूप रात्र झाली होती. देवाजवळचा दिवाही मंदावला होता. अधीरला पुन्हा मांडीवर घेऊन कुरवाळत, मनावर दगड ठेऊन आजीने त्याला आता सगळं सांगायचं ठरवलं. कालपटलाचे पदर एक एक करून बाजूला सरु लागले. आजी भूतकाळ जिवंत करु लागली.
“तुझ्या आजोबांचा जसा देवावर विश्वास नव्हता तसा भूताखेतांवर सुद्धा नव्हता. अगदी नाकासमोर चालणारा माणूस. लग्न करून आम्ही या गावात नवीनच राहायला आलो. सगळं काही सुरळीत चालू होतं. “घाटावरच्या पिंपळावर मुंजा राहतो” ही गोष्ट साऱ्या गावाला ठाऊक होती. गावात काहीही वाईट घटना घडली कि त्याचं खापर त्या पिंपळावरचं फ़ुटायचं…….कुणीही तिकडं फारसं फिरकायचं नाही….. पिंपळाला अनेक दूषणं दिली जायची …… दोन चार वर्ष हे असंच चालू होतं. त्यानंतर एक वाईट घटना आपल्याही घरात घडली तुझ्या वडिलांपाठचं एक मुलं जन्माला येताच दगावलं. तुझ्या आजोबांना या घटनेने हेलकावून सोडलं. हे विमनस्क मनस्थितीत असताना, सगळ्या गावभर तेव्हाही त्या पिंपळाच्या वाईट सावलीची चर्चा झाली. गावात हे कुठेही गेले तरी सतत पिंपळ  …. पिंपळ …. ऐकून यांच्या मनात वेगळीच तिडीक गेली. घरी आल्यावर हे वेड्यासारखेच वागायला लागले. त्या पिंपळाला मी आज संपवणार असं म्हणून घराबाहेर पडले …… मी त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला …… पण माझं काहीही न ऐकता मला उंब-याआत लोटून ते निघाले ….. थोड्या वेळातच गावकरी घराबाहेर येऊन गर्दी करून राहिले. माझ्या -हद्याचा तर ठोकाच चूकला. त्याच गर्दीतून वाट काढत ह्यांनी घरात पाऊल ठेवले. अश्रू भरलेल्या नजरेने मी त्यांना पाहीले. अंगावरचे कारपटलेले कपडे, राखेने माखलेला चेहरा पाहून माझा थरकाप झाला……… माझ्याकडे नजर रोखून म्हणाले …….. ‘पेटवलं …. अक्ख झाड पेटवलं ….. आता कुणालाही त्रास होणार नाही.’ साऱ्या गावाने या घटनेनंतर सुटकेचा निश्वास टाकला खरा, पण यांच्या कानात दडे बसून “मला वाचव …. मला वाचव “ हे शब्द सतत घुमत राहिले आणि त्यातच त्यांचा काही दिवसातच वेडाच्या तीव्र झटक्यात मृत्यू झाला. तुझे वडील फार लहान होते…मी एकटि पडले रे…. हा एकटेपणा फार वाईट……धड जगूही देत नाही…..आणि मरुही देत नाही. तो एकटेपणा पुन्हा आपल्या कुणाच्याही वाट्याला येऊ नये. म्हणूनच, मी तुला घाटावर जाऊ देत नाही. पूर्ण जळलं तरीही ते झाड जमीनदोस्त झालं नाही, अजूनही तसंच उभं आहे. ….. त्याची काळी सावलीही तुझ्यावर नको पडायला…..शोधतयं ते…..कुणालातरी….. सळसळतंय काहीतरी त्याचा मनात……आजही
क्रमशः

पिंपळ – गूढ कथा – भाग २