एक घनदाट जंगल होत वृक्ष-वेलींनी वेढलेलं, पाना-फुलांनी बहरलेलं. निसर्गाच्या अप्रतिम सौदर्याने सजलेलं. अनेक पक्षी प्राणी या जंगलात आपलं घर बांधून राहत होते. अशा जंगलात राहत होता एक शुभ्र ससा. साश्याशेजारीच नवीन घर थाटलं होत, ते एका कासवानी. ससा होता गोब-या गोब-या गालांचा, तर कासव काळ्याकुटट कवचाचा. ससा पांढ-या शुभ्र कापसाचा, तर कासव रखरखीत पावलांचा. ससा लबाड घाऱ्या डोळ्यांचा, तर कासव हळूवार डोळे मिटून पाहिलेल्या स्वप्नांचा. सश्याच्या बुद्धीची दारं बंद, तर कासव चालायला थोडं संथ. कासवाची बुद्धी, त्याची प्रगल्भता, त्याचं इतर प्राण्यांशी वागणं, बोलणं या साऱ्याने ससा प्रभावित झाला होता. सश्याला खूप आनंद झाला होता, खरंच खूप बरं वाटलं कि, आपल्याला आता कासवाच्या रुपाने एक नवीन मित्र मिळणार. मैत्रीच्या आभाळात सुखाचं फुलपाखरू नव्याने बागडणार. सश्याने कासवाशी मैत्री करण्याचा अनेकदा प्रयत्नही केला. पण कासाव काही मान वर करून चालेना नि सश्याशी काही बोले ना. सश्याच्या प्रयत्नाचा कासवावर काहीच परिणाम होत नव्हता. सश्याने मैत्रीचा हात पुढे केला त्यावर कासवाचे उत्तर दिले की, ” मैत्री……!!! तुझ्याशी……. तू देखणा रुबाबदार, माझ्याकडे आहे फक्त अंधार. दोन ध्रुव कधी एकत्र येऊ शकत नाही, तुझ्या नि माझ्यात मैत्रीचे बंध निर्माण होऊ शकत ना …!!!!”
त्यावर ससा म्हणाला,
“नकळतपणे माझे मन
तुझ्या मध्ये गुंतले आहे
आता कळतेय हि ओळख नसून
काहीतरी वेगळे आहे
मी जे अनुभवतोय
ते एक दिवस
तु हि नक्की अनुभवशील,..
मग, कधीतरी तुही माझ्यावर मित्र म्हणून प्रेम करशील…!!!!”
सशाचे बोलणे ऐकून कसावाच्याही मनात साशाबद्दल आपलेपणा निर्माण होऊ लागला. सशाच मैत्रीच फुलपाखरू कासवाच्या खांद्यावर विसावलं होत, मैत्रीच्या रंगात ते पुरतं रंगलं होतं.
ससा आणि कासवात मैत्रीचे वारे वाहत होते हि गोष्ट वणव्यासारखी जंगलभर पसरली. त्यांची मैत्री पूर्णत्वाला येऊ नये म्हणून अनेक प्रयत्नही सुरु झाले. जंगलातल्या सगळ्या प्राण्यांनी मिळून एक युक्ती लढवली. ससा आणि कासवात शर्यत लावायची असे एकमत झाले. जिंकणाऱ्या सशाचा स्वभिमान गर्वात बदलेल आणि नवीन राहायला आलेल्या कासवाचा सगळ्या प्राण्यांसमोर अपमान होईल या उद्देशाने शर्यतीचा खेळ ठरला. हि कल्पना जंगलच्या राजा सिंहाकडूनही मंजूर करून घेण्यात आली. कासवासाठी नसली तरी साशासाठी हि सत्वपरीक्षाच होती. आपलेपणाने जपलेली हि प्रेमाची मैत्री एका क्षणात पणाला लागणार होती.
मग, दुस-या दिवशी सकाळी शर्यतीसाठी ससा आणि कासाव ठरल्या प्रमाणे एका ठिकाणी जमले. शर्यत सुरु झाली. ससा भराभर उड्या मारत पुढे गेला. कासव आपले हळू हळू चालत राहीले. थोड्या वेळाने सशाने मागे वळून पाहिले तर कासव अजून मागेच होत. बिच्चारं कासव सगळ्या प्राण्यांच्या चुकीच्या निर्णयाचं ओझं पाठीवर घेऊन हळू हळू चालत होतं. सश्याला कासवाची खूप दया आली सश्याने मनात विचार पक्का करून निर्णय घेतला,
“आज मी हि शर्यत तुझ्यासाठी हरणार आहे,
तुझ्यासाठी माझी मैत्री पुन्हा सिद्ध करणार आहे.”
एवढा मोठ्ठा निर्णय घेतल्यावर सश्याला खूप भूक लागली. मग त्याने आजूबाजूच्या हिरव्यागार गवतावर मस्त ताव मारला. पोट भरल्यावर एका झाडामागे लपून बसला. सश्याने कासवासाठी पाहिलेलं स्वप्न लवकरच पूर्ण होणार होत म्हणून तो झाडामागून कासवाला हळूच पाहू लागला. कासव मात्र हळू हळू चालतच राहिले. ना वाटेत कुठे थांबले ना झोपले. बघता बघता ते पार डोंगराच्या माथ्यावर पोचले. शर्यत तिथेच संपणार होती ना…. !!!!
एवढ्यात संध्याकाळ झाली आपली मैत्री, आपला विश्वास, आपल प्रेंम मनात साठवून ससा धावत डोंगरमाथ्यावर पोहचला. त्याला हव होत तेच झालं होत. कासव हळू हळू सारं अंतर कापून शर्यतीत पाहिलं आलं होत. अशाप्रकारे ती शर्यत कासवाने जिंकली. जंगलातल्या सगळ्या प्राण्यांनी कासवाला शाब्बासकी दिली. कासवाने जेव्हा सशाकडे पहिले तेव्हा कासवाला सशाच्या चेहऱ्यावर दिसला तो समाधानाचा आनंद हरून सुद्धा जिंकण्याचा, मैत्रासाठी हरण्याचा.
कारण ……………………
जिंकण्याचं सामर्थ्य असून सुद्धा
ससा हरला होता,
आज आपल्या स्वाभिमान पणाला लावून
तो कासवाची मैत्री मात्र जिंकला होता
आयुष्यातली सारी सुखं कासवाच्या डोळ्यात दाटली
कासवाला मनापासून सश्याची मैत्री पटली ……!!!!!!!
तेव्हापासून आपल्या प्रत्येकाच्या मनात घर करून
ससा आणि कासव आपल्या मैत्रीच्या बळावर अजूनही एकत्र राहतायत.
स्वतःच दुः खं बाजूला सारून दुसरयाला सुख देतायत.
आयुष्यात हि मैत्री नेहमीच आठवत राहील,
सशा शिवाय कासवाची मैत्री अपूर्ण राहील.
म्हणूनच ………………………मित्र हो. आपल्या जिवाभावाच्या मित्रांना जपा, जीव लावा. त्यांच्यावर नितांत प्रेम करा. बघा….. तुमच्या कठीण काळात हेच मित्र सशासारखे ढाल बनून तुमच्यासाठी तुमच्यापुढे उभे राहतील. तेव्हा आणि तेव्हाच तुम्हाला तुमच्या मित्रांचा आणि मैत्रीचा अभिमान वाटेल. अजूनही सशाची आठवण काढताच कासवाचं नाव कसं सशासोबत जोडलं जातं………दोन भिन्न व्यक्तींच नात आजही पूर्णत्वाला येतं.
October 22, 2020 at 7:48 pm
खूप छान ओघवतं.
नेहमीप्रमाणेच
October 22, 2020 at 9:40 pm
Khup chan gosta
Aaj hee gosta dusara bajuni kalali sasa cha bajuni
October 22, 2020 at 11:48 pm
अप्रतिम गोष्ट .