दि. २८ सप्टेंबर २०२०
आजचाच एक प्रसंग सांगतो. गेल्याच वर्षी माझी पहीलीवहीली श्री गिरिनार वारी झाली. मनाला अत्यंतिक, आत्मिक समाधान लाभलं. त्या यात्रेनंतर निर्माण झालेली ती त्या पवित्र स्थानाबद्दलची प्रचंड ओढ. मार्च पासून सुरू झालेल्या या लाॕकडाऊनमुळे यंदाचा या आध्यात्मिक यात्रेचा योग जरा दूरावलाच. या यात्रेच्या निमित्तानेअनेक गुरुबंधू लाभले आहेत की, ज्यांच्यामुळे या गिरिनार क्षेत्राची माहीती सतत मिळत राहते. आत्तातर नोव्हेंबर महीन्यात रोप वे सुद्धा सुरु होणार आहे असे कळले, कामकाज शेवटच्या टप्यात असल्याचे फोटोज मिळाले. या रोप वे मुळे अंबाजी टुंक पर्यंतचा एक ५००० पायऱ्या चढण्याचा यात्रेकरूंना प्रवास सुकर होईल ……..हे नक्कीच.
सांगायचा मुद्दा हा की, माझ्या यात्रेच्या अनेक आठवणी या ना त्या कारणाने सतत मन उजळवत असतात. ” गिरिनार गुरुशिखराची खुप आठवण येतेय” असे काल सहचारीणीला बोलूनही दाखवले. मनोमन जानेवारीत नवीन वर्षी ही यात्रा पुन्हा घडवून आणाच अशी प्रार्थनाही श्री दत्तगुरु चरणांपाशी केली. सहचारीणीनेही सोबत येण्याची तयारी दाखवली….. आनंदच झाला……. पुढे दत्त महाराजांची इच्छा.
आम्ही दोघेही फेरफटका मारुन घरी आलो. मी खुप दिवस झाले पोथीवाचन झाले नाही, म्हणून लागलीच हातपाय धूवून श्री स्वामी समर्थांची “श्री गुरुलीलामृत” ही पोथी वाचायला घेतली. खुणेचा दोरा उघडला…. अध्याय बारावा…… “श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ ! श्री गणेशायनमः ! ……….. गिरनारपर्वत विराजमान ! श्रीमदत्तत्रय सनातन ! त्या प्रभुंचे प्रियवसतीस्थान ! असे प्रख्यातश्रोते हो! ………अशा प्रसिद्ध गिरनारपर्वती ! श्रीमन्नृसिंह विश्वपति ! गौमुखतीर्थी येऊन वसती ! सर्वभूतहितास्तव !………..कमंडलु तीर्थीं आणि गौमुखांत ! त्याप्रकारेच हनुमानधारींत ! कामापुरते उष्णकालांत ! निर्मल उदक राहतसे! ………गुरुगिरिनारी दत्तदिगंबर ! उच्च शिखरीं ते जगदीश्वर ! स्वच्छंदे वसती निरंतर ! परंतु न दिसती कवणासी! ” एक एक ओवी वाचता वाचता गिरनार हा शब्द डोळ्यापुढे सतत दिसू लागला. सारं माझं मलाच उमजामला लागलं….. अरे …. हे तर सगळं श्री दत्त क्षेत्र गिरनारचे वर्णन आहे. अंबाजी मंदिर, हनुमान धारा, गौमुखी गंगा, कमंडलू तिर्थ, गुरु गोरक्षनाथ गुहा, अवघडनाथ, दत्त धूनी, गुरुशिखर दत्त पादूका…… एकापाठोपा एक….. दिव्य दर्शन…..भारावून गेलो….. अध्याय वाचून संपला…..मन भरुन आलं.
एकिकडे गिरनारच्या आठवणींना उमाळा येतो काय…. आणि लागलीच पोथीतला बरोबर गिरनार दर्शनाचा अध्याय वाचनात येतो काय……..किती काळजी आपली त्या भगवंताला. आपल्या माथी लिहीलेला प्रपंच आपल्या जराही उसंत देत नाही हे ही, त्याचा तोच जाणतो. तात्काळ सहचारीणीला सांगितलेही बघ आत्ताच गुरुशिखर गिरनारची मानसिक यात्रा करुन आलो. तीच्याही चेहऱ्यावर आनंद पसरला. हा योगायोग म्हणावा का? योगायोग जरी म्हटला तरीही हा विलक्षण योगायोग म्हणावा लागेल. आपल्याला अगदी तीव्रतेने एखाद्या गोष्टीची आठवण येणे आणि तीच गोष्ट समोर दत्त म्हणून उभी ठाकणे हे चमत्कार सदृष्यच आहे. माझे असे मानणे आहे, हा घडलेला क्षण आपल्याला समजण्यासाठी आपलीही अष्टावधानं जागृत असून, गुरुंचे कृपाआशिर्वाद पाठीशी असावे लागतात. आपण स्वतः घेतो ते अनुभव…… पण दैव जे आपल्या आयुष्यात घडवून आणतं ती दिव्य अनुभूतीच. आत्ताही मनाला श्री दत्तदर्शनाचे वेध लागलेत. त्या दर्शनाचा भारही त्या श्री दत्त महाराजांवरच आहे. ते त्यांच्या इच्छेनुसार सारं काही सुस्वरुप घडवून आणतील. आपण फक्त निश्चिंत रहायचं.
शुभं भवतू
कल्याणमस्तू
जय गिरिनारी, तेरा भरोसा भारी.
Leave a Reply