शीतयुग उलटले आणि शुभ्रवर्णी वसुंधरा शुभ्रवस्त्र परिधान करून ब्रम्हलोकी जगतनिर्माता ब्रम्ह देवासमोर येऊन उभी राहिली. ब्रम्ह देवाने तिचे स्वागत केले नि म्हणाले, ” सांग वसुंधरे, काय इच्छा आहे तुझी ?”
यावर वसुंधरा उत्तरली ” देवा, मला नवचैतन्य प्रदान करावं, जे स्व निर्मित असावं. “
ब्रम्ह देव तथास्तु म्हणाले आणि शुभ्रवर्णी वसुंधरेच्या कायेतून जन्म झाला विविध रंगांचा.
तांबड्या लाल रंगाने तिच्या भाळी कुंकवाचा आकार घेतला.
नारिंगी नक्षीदार रंगाने तिचे हात रंगून गेले.
पिवळ्या रंगाने गळ्यात, हातात सुवर्णालंकार आकाराला येऊ लागले.
हिरव्या रंगाच्या बांगड्या हातात खळखळू लागल्या.
निळ्या आकाशी रंगाचा शालू परिधान करून वसुंधरेच रूप अजूनच मनमोहक वाटू लागलं.
पारवा आणि जांभळा रंगाच्या हिरे मणिकांनी सुवर्णालंकार झगमगू लागले.
बघता बघता वसुंधरेचा सौंदर्यवती अप्सरेत कायाप्रवेश झाला.
वसुंधरेने स्व कायेतून अशा या सप्तरंगी सात भावंडांना जन्म दिला.
साऱ्यां रंगानमध्ये एकमेकांबद्दल वेगळीच आत्मिक ओढ.
एकमेकांबद्दल अत्यंत प्रेंम, आदर, आपुलकी आणि जिव्हाळा.  कुठेही स्वतःच वेगळेपण सिद्ध करण्याची धडपड नाही, स्वतः बद्द्दल कसलाच गर्व नाही कि कुणाशी स्पर्धा नाही. सगळाच आनंदी आनंद.
निळाशार समुद्र, हिरवी गार झाडं , रंगीबेरंगी फुलं, तांबडा लाल सूर्य त्याची पिवळी कोवळी सूर्यकिरणं, गर्द निळे आकाश
हे सारं सृष्टी सौंदर्य लेवून वसुंधरा धन्य झाली, तिने मोनोमन ब्रम्ह देवाचे आभार मानले. या सातही मुलांसोबत वसुंधरा आनंदात होती.
आपल्या लाडक्या वसुंधरेच्या सौंदर्यात भर घातल्यामुळे ब्रम्ह देवालाही या सप्तरंगांचे फार कौतुक वाटले.
म्हणून मग ब्रम्ह देवाने या सातही भावंडांना ब्रम्हलोकी बोलावून घेतले
आणि बक्षीस म्हणून त्यांना वर मागण्यांस सांगितले
या सातही भावंडांनी एकमेकांच्या हातात हात घातला आणि एकमुखाने “आम्हाला सदैव एकमेकांशी जोडून ठेव. आमचा एकमेकांच्या हातातला हात आणि हि साथ आयुष्यभर अशीच राहूदे .” असा वर मागितला.
ब्रम्हादेव तथास्तु म्हणाले …………….!!!!!
आणि क्षितिजावर जन्म झाला लक्षवेधी  “इंद्रधनुष्याचा
अंधारातून स्वयंप्रकाशी इंद्रधनुचे सप्तरंग उलगडले.
थोडे दृष्टीच्या अलीकाडले, अन थोडे पलीकडले
तेव्हापासून हे इंद्रधनुष्याचे सप्तरंग आपल्याला आपलेपणाच्या प्रेंमाची आठवण करून देतायत. एकमेकांशी असणा-या साथ-सोबतीची प्रेरणा देतात.
सूर्यकिरणांचा पाण्याशी मेळ  होतो आणि आजही हे सप्तरंग आपल्याला एकमेकांना सांभाळून घेऊन, एकात्मतेचा संदेश देतात आपणही या इंद्रधानुष्याकडून इतरांबरोबर असताना स्वतःच वेगळेपण सिद्ध करण्यापेक्षा इतरांच्या विचारांचा आदर करायला शिकले पाहिजे. या गुणाने आपण स्वतः बरोबर इतरांचाही विकास साधू शकू.