लहानपणापासूनच माझ्या कोकणातल्या न उलगडणाऱ्या रहस्यमयी गोष्टी कानावर पडत पडतच मोठा झालो, म्हणूनच मनावर एक प्रकारचं दडपण होतं, मन अस्वस्थ करणारं, थरकाप उडवणारं त्यामुळेच कदाचित गावी लग्न करायला माझं मन तयार होत नव्हतं, पण घरच्यांच्या आग्रहापुढे मला नमते घ्यावे लागले आणि इच्छा नसून सुद्धा मी गावी लग्न करायला तयार झालो. 
मुंबईत स्थायिक होण्यापूर्वी गावी जे काही अनुभवलं त्या अनुभवाचा परिणाम म्हणून गावी जाणे मी कायमचे बंद केले होते, पण हा विचित्र योग्य जुळून आला आणि गावच्या घरात पाय ठेवणे मला भाग पडले.
त्या जुन्या घरातल्या जुन्या आठवणी मन पोखरून काढत होत्या, भूतकाळ सरला तरी भूतकाळातल्या काही गोष्टी पाठलाग सोडत नव्हत्या, त्यातच हा गावी लग्न करण्याचा विलक्षण योग.
एकूणच मला त्या घरात पाऊल ठेवलं कि खूप अस्वस्थ वाटायचं, माजघरात उभं राहिलं कि पाय तळघराच्या दिशेने कुणीतरी ओढताय आणि ते जमिनीत धसून खोलवर रुतून पडलेयत असं वाटायचं, कानाला दडे बसायचे, हात सुन्न व्हयचे आणि अंगाला दरदरून घाम फुटायचा. 
माझं बालपण कोकणातलंच  ……. कोकण म्हटलं कि डोळ्यांसमोर उभा राहतो तो निळाशार समुद्रकिनारा, किनाऱ्यालगत उभी असलेली नारळी पोफळीची उंचच उंच झाडी आणि त्या समुद्रात हेलकावे खात डोलणारी शिडाची नाव, सारं  काही चित्रवत. अशा या निसर्गदत्त कोकणात गावच्या वेशीवर आमचा भलामोठ्ठा प्रशस्त वाडा, चांगल्या वर-खाली मिळून दहा बारा खोल्या, ओसरी ……. ओसरीत पितळी झोपाळा…. छानच झुलायचा.
वाड्या शेजारीच लागून आमचीही नारळी पोफळीची उंचच उंच झाडं,  आम्ही त्याला माडी म्हणत असू, त्या झाडाची पानं वाऱ्यावर सतत सळसळत राहायची. आम्ही लहानपणी माडीवर खेळायला जायचो. सरसर झाडावर चढायचो. कितीही उन्हाळा असला तरीही शांत आणि थंड वातावरण होतं माडीत. दिवस कधी संपायचा कळायचं पण नाय. संध्याकाळची उन्ह कलली कि किर्रर्र अंधार पडायचा. सगळेच वाड्याच्या दिशेने धाव घ्यायचो. हात पाय धुऊन, देवळाला नमस्कार करून अभ्यासाला लागल्याचो. वरच्या माझ्या खोलीतील प्रत्येक खिडकीतून समुद्र दिसायचा, दूरवर पसरलेला, त्याच्या अथांगतेकडे टक लावून पाहिलं कि क्षितिजावर पृथ्वी संपल्याचा आभास निर्माण व्हायचा आणि रात्रीच्या शांततेत त्याचा तो उथळ लाटांचा आवाज कानात घुमत राहायचा.
वाड्याबाहेर व्हरांड्याला लागूनच एक भाला मोठा प्रशस्त उंबर, दहा माणसांच्याही कावेत न मावणारा, ज्याची मुळ व्हरांड्यातून आत शिरून घराच्या दाराबाहेर रेंगाळणारी, पानांची सळसळ थोडी वेगळीच कानावर पडायची, सगळ्या झाडं झुडपांच्या आवाजात तो सळसळणारा आवाज लक्ष वेधून घ्यायचा, तो तसा मलाच ऐकू यायचा कि इतरांनाही याची उकल काही केल्या होत नव्हती, आवाजाच्या दिशेने वर पाहिलं कि मान मोडून निघत असे इतका आभाळभर पसरलेला, त्याच्या पानांची प्रचंड वर्दळ सूर्यालाही जमिनीचा वेध घेऊ देत नसे. 
वाड्यात एकूणच आम्ही वीस-पंचवीस माणसं रहात होतो. गणपती आणि दिवाळी असे दोनच सण असे कि घरची सगळी मंडळी घरातच असायची. पत्ते गप्पांच्या फडात रात्र सरून जायची. या दोन सणांनाच होतील ती काही जागरणं, लहान होतो तेव्हा काही जाणवत नव्हतं कारण दिवसभर खेळून दमल्यामुळे रात्री लवकर डोळे मिटायचे पण जसे जसे वय वाढत गेले तसं कुतूहलही वाढतच गेलं, मोठ्यांच्या गप्पांचे विषय कळू लागले, अनेक रहस्याचे धागे दोरे सापडू लागले, त्याने एक उत्कंठा दाटून राहिली मनात……. … पूर्वजांच्या भूतकाळाची.
त्या गप्पांमध्येच उकल झाली ती त्या दाराबाहेरच्या सळसळणाऱ्या उंबराची. पणजोबांच्या मुंजीला त्यांनी घराबाहेर सर्वांच्या साक्षीने लावलेला तो उंबर. रुजवला तेव्हा अगदी छोटंसं रोपटं होतं. त्या उंबराच्या झाडाचा उत्कर्ष झाला तसा त्यांचाही झाला. घराबाहेर लावलेल्या उंबराची मुळे दारापर्यंत पोहोचली. पणजोबांचा खूप जीव त्यावर. काम करून थकले कि उंबराला टेकून बसून राहायचे. मनातलं सगळं त्या उंबरालाच सांगायचे. त्यांच्या लग्नानंतर मग पणजीनेही त्या उंबराची मनापासून काळजी घेतली. पणजोबांच्या प्रदीर्घ आजाराने जाण्यानंतर दुसऱ्याच दिवशी दारात त्या उंबराची प्रचंड पानगळ, हा असा सडा पडला होता म्हणे त्याच्या हिरव्या जर्द पानांचा, पाय ठेवायला भुई शोधावी लागेल…….  एवढा…… गर्द ….. त्यानंतर त्या उंबराला कधीच ती गोल फळं लागली नाहीत, पण सळसळत राहिला ….अन आजही सळसळतो पणजोबांच्या विरहात ….. विचित्र …..
गप्पांच्या प्रत्येक मैफिलीत हमखास तिचाही विषय निघायचा, प्रत्येक प्रसंगातून तिचा चेहरा माझ्या मनात स्पष्ट व्हायचा, ती आता हयात नसताना तिच्या आणि पणजोबांच्या नावाने अजूनही उंबरा शेजारी दिवा लागायचा . . . . . .  आणि तो उंबर तसाच विचित्र सळसळायचा
ती म्हणजे माझी पणजी आजी …..कात्यायनी हनुमंतराव नाईक
माझं पाचवीपर्यंत शिक्षण गावाकडेच झालेलं. मला एवढंच आठवतं  मी शाळेत असताना पाहिलं होतं तिला, पणजोबांच्या जाण्यानंतर जरा वेड्यासारखीच वागायची. कसले कसले आवाज काढायची, ओरबाडून काहीबाही खायची, मुलं घाबरतील म्हणून कदाचित घरचे आम्हा मुलांना तिच्या जवळ फिरकूही देत नसत. एकदा दोनदा पाहिल्याची तेवढीच काय ती तिची आणि माझी ओळख.
आमच्या मोठाल्या वाड्याला एक तळघर होतं, सगळं शेतीवाडीच्या सामानाने भरलेलं, तिथं सहसा कुणीही फिरकायचं नाही. पणजोबांनंतर ती तिथेच एकटीच राहायची, कुणी आपणहून जेवण खावणं घेऊन गेल कि शिव्या शाप देऊन हाकलून लावायची. हळू हळू घरच्या सगळ्यांनीच तळघरात जाणं बंद केलं. ती गेली तेव्हा मी पुढील शिक्षणा निमित्त काकांकडे मुबंईत होतो. तिच्या अकाली जाण्यानंतर तिच्या पिंडाला कावळाही शिवला नाही म्हणे. तो उंबर मात्र दिवसभर तसाच विचित्र सळसळत राहिला. तळघर साफ करताना तळघरात मानवी मनगट हाड आणि कसल्यातरी तांबड्या पिवळ्या भुकट्या सापडल्या म्हणूनच मोठ्या तात्यांनी तळघर कायमचं बंद केलं आणि कुणालाही तळघरात जाण्यासाठी मज्जाव केला. त्यानंतरच्या शाळेच्या सुट्टीत लहानपणी एकदा लपंडाव खेळताना माझी पावलं तळघराजवळ घुटमळत होती तेव्हा जो अनुभव आला तेव्हापासून मी त्या जागेचा आणि गावच्या घराचा नादच सोडला आणि तडक मुंबईला काकांकडे निघून आलो. 
मनावर थोडा ताण दिल्यावर आठवलं लपंडाव खेळताना कुणीही फिरकणार नाही या विचाराने लपायला म्हणून तळघराच्या दिशेने हळूच कडी उघडून त्या लाकडी जिन्या वरून एक एक पाऊल टाकत खाली उतरलो तेव्हा मनात एक वेगळीच अस्वस्थता जाणवली … मन सुन्न करणारी ती निरव शांतता …… ज्या शांततेत माझ्या हृदयाच्या ठोक्याचाही आवाज मला ऐकू येत होता, पायाला धूळ माती लागत होती, त्या धुळीचे लोट नाका तोंडात जात होते. तरीही इथे कुणीही शोधू शकणार नाही असं म्हणून उतरलो.
उतरताना हातच्या डाव्या बाजूला लावलेल्या फळकुट्यातून वाकून पाहिलं तेव्हा संपूर्ण तळघर स्पष्ट दिसत होतं. भिंतीला लागून उभे केलेले कुदळी, फावडे, घमेले, खुंट्याला बांधलेली बैलांची वेसण सगळे जागच्या जागी….. फक्त धुळीने माखलेले. इथून पुढे जाण्याआधी अजून थोडं डोकावून बघू म्हणून मी एका बारीक फटीतून डावा डोळा बंद करुन उजव्या डोळ्यानी पाहिलं
थोडी नजर इकडे तिकडे भिरकावली तेव्हा ती स्थिरावली ती एका पाठमोऱ्या आकृतीवर, ती आकृती पाहून विजेचा प्रवाह शरीरात शिरावा अशी शिरशिरी आली…..  अंगावर काटा उभा राहिला….. मानेवरचे केस ताठ झाले…. .
मी समोर पहिले ते विस्कटलेले पांढरे शुभ्र केस. तळघरात खिडकी, तावदाने असं काही नाही त्यामुळे वारं  शिरायला जागाच नाही पण तरीही ते केस वाऱ्यावर भुरभुरत होते, डोळे विस्फारून पाहिलं तेव्हा त्या केसांन आडून मानेखाली पाठीवर कसलीतरी गोंदण दिसत होती, नाजूक मनोहर नक्षी नव्हती ती, माझ्या आई-काकूच्या अंगावर देवा धर्मची अनेक गोंदणं पाहिलीत मी, पण हि गोंदण हिंसक, दुष्ट आणि क्रूर, कसलतरी वेगळच …….. काय बरं असावं ते हे पाहण्याची इच्छा गडद झाली म्हणून बाजूच्या मोठ्या फळकुटाला पडलेल्या भगदाडातून थोडं आत डोकावू म्हंटलं ….
माझा माझ्या श्वासांवरचा ताबा सुटला आणि मंद श्वासांचा वेग अचानक वाढला, नाकपुडीतून बाहेर पडणाऱ्या हवेच स्पर्श वरच्या ओठाला उष्ण जाणवू लागला, त्याचा आवाज तळघरात घुमला आणि ती आकृती त्या आवाजाच्या दिशेने माझ्याकडे वळली…… मी दचकून मागे झालो …… भिंतीला धपकन पाठ टेकली …… तोच पायखालचं फळकुट खाट्कन तुटलं …… माझा तोल गेला आणि मी जिन्यावरून गडगडट थेट खाली तळघरात ……
डोळे उघडले तेव्हा अंग तापाने फणफणत होतं, मला उठायलाही जमत नव्हतं, इतका अशक्तपणा मी या पूर्वी कधीच अनुभवला नव्हता, घरची सगळी मंडळी माझ्या दिवाणाच्या आजूबाजूला काही तरी कुजबुजताना ऐकू आली ………   “बाधा झाली असतली,” ……… “अंगावरून उतरवूक व्हाया” अस काहीसं  …… पण त्या साऱ्यांची नजर माझ्या तळपायावर, माझा यावर फारसा विश्वास नव्हता तरीही मी मनातून खूपच घाबरलो होतो म्हणूनच तोंडातून ब्र ही निघाला नाही आणि मी स्वतःहून कुणाला काहीही सांगितलं नाही, पण मला खूप चांगलं आणि व्यवस्थित आठवतंय माझा तोल जाण्या आधी मी ते गोंदण स्पष्टपणे पाहिलं होतं
उग्र काळ्या रंगाचं, गोल गोल डोळ्याचं ….. माझ्याकडेच नजर रोखून पाहणारं …. अपशकुनी ……. घुबड
हो घुबडच होतं ते ….. 

या विचारात नजर पायाच्या तळव्यांवर गेली तेव्हा पहिली ती धुळ म्हणून पायाला लागलेली तीच तांबडी पिवळी भुकटी

अंगात ताप असूनसुद्धा डोळ्यापासून पायाच्या नखापर्यंत अंघोळ केली. कोकण म्हंटल कि, या साऱ्या वितुष्ट आठवणी मनातून काही केल्या पुसल्या जात नव्हत्या आणि त्यातच घरच्यांचा  हा वाड्यात लग्नाचा अट्टहास.
कामानिमित्त मुंबईत स्थायिक झालो तेव्हाही काही गोष्टी कानावर पडतच होत्या पण मी दुर्लक्ष करत होतो.
मी घरात पाऊल ठेवायच्या आधी लग्नासाठी घरच्यांनी विधिवत सगळं घर स्वच्छ आणि पवित्र करून घेतलं होतं. हळद, लग्न जरा गडबडीतच पार पडलं. आल्यापासून जरा म्हणून उसंत नाहीच.
आजचा दिवस तसा मंगलमय, घराला झेंडूची तोरणं, दारात केळीचे खांब, सगळे आनंददायी वातावरण, आज सत्यनारायण होता, लग्नानंतरचा माझा पहिलाच सत्यनारायण. लग्नाच्या धावपळीमुळे पहाटे  उठायला थोडा उशिरचं झाला. उठल्या उठल्या पाहिलं तर अनघा दिवाणखान्यात कुठेच दिसत नव्हती. अनघा माझी बायको…..  गेले एक सहा महिनेच आम्ही एकमेकांना ओळखत होतो, ऑफिसची ओळख ….. ओळखीची मैत्री  ….. मैत्रीचं प्रेम ….. आणि त्यानंतर हे असं गावी आमचं लग्न, सगळं काही शुभस्य शीघ्रम. माझ्यासारखीच या साऱ्या लग्न सोपस्कारांमुळे तीही दमलीच होती. मी सगळं आवरून सदरा घालून लाकडी जिन्यावरून धडधडत खाली उतरलो. घरातल्या नातेवाईक मंडळीतही माझी नजर फक्त अनघालाच शोधत होती. आपण लवकरच हे सगळं आटपून मुंबईला जातोय हि बातमी मला तिला सांगायची खूप घाई झाली होती. देवघरात पाहिलं तर गुरुजी पूजा बांधून पूजेच्या सामानाची मांडामांड करत बसले होते. संपूर्ण देवघर आणि माजघरात दरवळत होता तो धूप दीपाचा मन प्रसन्न करणारा दरवळ, त्याला मधेच छेद देत होता तो माझ्या आईने केलेल्या प्रसादाच्या शिऱ्याचा सुवास…. प्रसादाचा शिरा करावा तर तो माझ्या आईनेच यावर आज पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं. या अशा साऱ्या वातावरणामुळे देवावरचा माझा विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला आणि मी सोवळं नेसून पूजेला बसायला तयार झालो, तेवढ्यात अनघा हिरवा शालू नेसुन समोर आली. अगदी तशीच जशी मला पहिल्या भेटीत आवडली होती. काळे लांब रेशमी केस, त्यावर सोडलेले मोगऱ्याचे गाजरे, रुंद कपाळ त्यावर चंद्रकोर, सरळ साधे नाक त्यात सफेद मोत्याची नथ आणि सफरचंदासारखे गुलाबी गाल. पूजेला शेजारी बसली तेव्हा तिच्या केसातला मोगरा मला मोहात पडत होता. तिच्या सौंदर्यापुढे गुरुजींचे मंत्रोच्चार कानामागे पडत गेले आणि अचानक ….. तो उंबर सळसळला, तेव्हा भानावर आलो.  पूजा केव्हा संपली माझं मलाच कळलं नाही. गुरुजींना लवकर मोकळं करावं म्हणून मी दक्षिणा देऊन नमस्कार केला. तेवढ्यात अनघा गुरुजींना देण्यासाठी प्रथेप्रमाणे शिधेची थाळी घेऊन आली. गुरुजींना थाळी सोपवून नमस्कारासाठी खाली वाकली तेव्हा तिच्या पाठीवरून सगळे गजरे तिच्या डाव्या खांद्यावरून खाली सरकले, त्यातले काही मोगरे निखळुन खाली जमिनीवर पडले. गजऱ्यां पाठोपाठ सरकले ते तिचे काळे लांब रेशमी केस माझी नजर तिच्या मानेभोवती असलेल्या मी लग्नात बांधलेल्या मंगळसूत्रावर स्थिरावली. त्या मंगळसुत्रा खाली काळं काहीतरी दिसलं, काहीतरी कोरलेलं, तेवढ्यात तिने सगळे केस डाव्या हाताने डाव्या खांद्यावरून खाली घेतले, तेव्हा मी दचकलो ….. माझे डोळे विस्फारले ….. पाय जमिनीत रुतले ….. हात सुन्न झाले आणि अंगाला दरदरून घाम फुटला …..
कारण तिच्या पाठीवरही तेच होतं ….. तेच हिंसक ….. दुष्ट आणि क्रूर ……. तेच गोंदण
उग्र काळ्या रंगाचं, गोल गोल डोळ्याचं  ….. माझ्याकडेच नजर रोखून पाहणारं …. अपशकुनी ……. घुबड