जय गिरिनारी – पुष्प ७

देवाप्रती श्रद्धा आहे, म्हणूनच जीवनात सौख्य, समृद्धी आणि शांतता आहे. ही शांतताच आपल्याला आपल्या इष्ट देवतेशी बांधून ठेवते. एक अनामिक नाद सतत ऐकू येतो, मन ईश्वरी उर्जेत एकसंग होते. प्रत्येक श्वास हा नामस्मरणात न्हाऊन निघतो……. “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.”  नेमिनाथांच्या पहाटेच्या दर्शनाने प्रफुल्लीत झालेले अंतरंग हा असा दिव्य दर्शनाचा आधार अंतरमनात कायम शोधत रहाते. आम्हाला उतरताना प्रसूतीबाई देवी, दत्त गुंफा, संतोषी माता, काली माता, वरूडी माता, खोडीयार माता ही छोटी मंदिरे पुन्हा लागली. आता सूर्य प्रकाशात सगळ्या मुर्त्या सुंदर दिसत होत्या. प्रत्येक मुर्ती रेखीव आहे. सुर्यतेजाने या छोटेखानी प्रत्येक मंदिराचे कळस झळाळत होते. ती तेजोमय पहाट डोळ्यांत साठवून आम्ही वेग मंदावून प्रत्येक मंदिरापाशी थांबून दर्शन घेऊन एक एक पायरी उतरायला लागलो. उतरताना तसा जरा कमीच वेळ लागतो.

उतरताना वाटेत अनेक माकडे दिसली….नेहमीची नाही…..थोडी वेगळी…..काळ्या तोंडाची. त्यांचे त्यांच्यातच खेळ सुरु होते……नुसतं सरसर झाडावर चढायचं…… भरभर खाली उतरायचं…… एकतर मस्त पायऱ्यांवर भली मोठी शेपटी पसरून ऐटीत बसले होते…..अगदी देवासारखे…….दिड-दोन हात लांबसडक शेपटी …….पाहून भिमाच्या मारुतीरायांनी केलेल्या गर्वहरणाची गोष्ट आठवली. हाथ जोडून मारुतीरायांच्या त्या सगुण रुपाला नमस्कार केला. तरीही मी थोडा दबेपाँव पायरीवर काठी आपटत आपटत चालत होतो. प्राण्यांबद्दल भूतदया आसली तरी आपल्याला अशा वन्य प्रण्यांची सवय नाही. आजूबाजूचे दूकानदार “कोणतेही खाण्याचे सामान हातात ठेऊ नका” असे बजावून सांगत होते. तस त्यांचा फारसा उपद्रव नाही, कोणत्याही यात्रेकरूला त्रास देत नाहीत….स्वतःच खेळत राहतात….बघणा-याला खेळवत राहतात पायांना एकदा वेग आला, दम लागला की थांबायचं असं ठरवूनच आम्ही भर भर उतरु लागलो. उतरता उतरता शेजारीच ५०० पायऱ्यांची खूण दिसली. मी मागे वळून, “१५-२० मिनटात खाली पोहचू” असं श्री. जोर्वेकरांना सांगितलं तसं त्यांच्याही चेहऱ्यावर समाधान झळकलं. श्रमसाफल्याचा आनंद म्हणावा तो हाच……..नाही का ?

प्रवास यात्रेच्या परतीचा असो वा आयुष्याच्या उत्तरार्धाचा, काय कमावलं…???  काय गमावलं….??? असं म्हणत मन हे गोळाबेरीज करणारचं…. हा मानवी स्वभावच आहे. मी ही अगदी हाच विचार करुन पावलं उचलत होतो. काय दिलं या यात्रेनं….???  एकच उत्तर…… ते ही निशंक…… “चिरशांती” इथं मुंबईत आपण किती पारखे झालो आहोत याच शांततेसाठी. इतकी सवय त्या गर्दी, गजबजाटाची की मनही सहसा या शांततेसाठी तयारच होत नाही. स्वतःला आरसा दाखवायचा असेल तर आशा यात्रा ठरवून करायलाच हव्यात. स्वतःला शोधणं अगदी सहज आणि सोप होईल. हे दिव्य गुरुशिखर दर्शन आपल्या नशीबात आहे, हे आपलं केवढ भाग्यचं. आपल्याच भाग्याचा हेवा वाटावा…….असा हा विलक्षण योग. अशा अनेक माझ्या माझ्या विचारांती समोरच पन्नासएक पायऱ्यांवर  शेंदरी रंगाची पायथ्याची कमान दिसली. हीच ती चढणीची पहीली पायरी. आम्ही रात्री ९. ०० वा. चढायला सुरुवात केली होती, सकाळी ९. ०० वा.पायथ्यापाशी पोहोचलो….. बरोबर १२ तास…..सुखाचे, समृद्धीचे आणि …….इच्छापूर्तीचे.

उतरल्यावर पुन्हा एकदा पहिल्या पायरीवर थबकलो. मी मागे वळून पहिले……. मन भरुन आले……गिरनार सुंदरच दिसत होता…… उन्हात सोनेरी न्हाऊन ……सुवर्णस्पर्श झाल्यासारखा. मन खूप शांत, प्रसन्न झाले होते. पहिल्या पायरीला पुन्हा डोकं टेकून नमस्कार केला. दत्त महाराजांनी सुखरूप सारं काही घडवून आणलं होत. महाराजांना मनोमन द्यन्यवाद दिले. “पुन्हा बोलवा मी नक्की येईन” अशी प्रार्थना केली. माझी गिरिनार यात्रा इथेच संपली होती. इथून पुढे सुरु आहे ती मानसिक यात्रा ….. त्याच “स्व” च्या शोधात, जिथे चिरशांती आपोआप लाभते, डोळे आपसूक मिटले जातात आणि कानात अनाहत नाद गुंजत राहतो ……..जो प्रत्येक श्वासासोबत म्हणतो ” जय गिरनारी, जय  गिरनारी.

अशी ही माझी पहिली गिरनार यात्रा सदगुरू कृपेने सफळ संपूर्ण. श्री स्वामी समर्थ चरणाविंदापर्णमस्तू.

आभार – नवी पिढी हि अनुकरणाने घडत असते. ती घडवण्याची जबाबदारी हि आपल्या साऱ्यांची आहे. सध्या तरुणांनी या धार्मिक आणि आध्यात्मिक मार्गाकडे वळावे, जेणेकरून मन प्रसन्न राहील, जगात विश्वशांती प्रस्थापित होईल, स्वतःचा तसेच स्वतः सोबत इतरांचाही ऊत्कर्ष करता येईल. ही पुष्प वाचून तुमच्या मनात नक्कीच धार्मिक स्थळांबद्दल ओढ निर्माण होईल. हे सदर वाचून जर तुम्ही गिरनार स्थानाला एकदा भेट देण्याचा विचार केलात, तर ते यश नक्कीच महाराजांनी हे सारं लिहीण्यासाठी प्रेरणेचं असेल. जय गिरिनारी ही पुष्प लिहिताना अनेक शुभचिंतक भेटले, सगळ्यांनीच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ही पुष्पे अनुभवण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे प्रत्येक वाचकाला आणि त्यांच्यात सुप्त रुपाने चिरंजीवी त्या ईश्वरी शक्तीस मी मनःपूर्वक नमस्कार करतो. ही पुष्पे समृद्ध करण्यात ब-याच गुरुबंधू-भगिनींचा मोलाचा वाटा आहे. त्यांची नावे खालील प्रमाणे. मी त्यांचा आणि तुम्हा सा-या वाचकांचा आजन्म ऋणी आहे………धन्यवाद ……. जय गिरिनारी

  • श्री. सुधीर जोर्वेकर
  • श्री. प्रकाश करंबळे
  • श्री. रविंद्र मोरे
  • श्री. अक्षय अनिल साळगांवकर
  • श्री. रोहन सुनिल आंब्रे
  • सौ. सुरुचीताई नाईक अग्निहोत्री
  • श्री. दिवाकर बाळासाहेब काटे
  • श्री. अशोक आनंदराव शिंदे
गुरुशिखर
पायऱ्या
जैन मंदिर
उतरताना दिसणाऱ्या कड्याकपारी
श्री चरण पादूका