गुरुचरणांची ओढ लागली की, सगळं सगळं मागे पडतं….पंचेंद्रीय एकमुखी होतात…..आपण आपले रहातच नाही……त्या गुरु तत्वात लोप पावतो……पावलं झपझप चालत राहतात……अखंड…….आम्ही गुरु शिखर मंदिराजवळ पोहचलो. थोडीशी रांग होती. आम्ही पायातले चप्पल, बुट काढून रांगेत लागलो. रांग सरसर पुढे जाऊ लागली. लोखंडी शिडीपाशी येऊन थबकलो. शिडी चढून मी मंदिरात प्रवेश केला……. समोरच नजर स्थिरावली…..भावविभोर मनःस्थिती…….. समोरच दिड दोन फुट उंच श्री. दत्त मूर्ती …… प्रसन्न वदनम…..मुखकमल लोचनम….. दर्शनासाठी डोळे मिटले तरी समोरील दत्त मूर्ती डोळ्यांसमोर जशीच्या तशीच….. मूर्ती पुढे असलेल्या त्या दत्त महाराजांच्या दिव्य काळ्या पाशाण पादूका……आपसूक हात जोडले गेले……पादूकांचे दर्शन घेतले……. नतमस्तक झालो….”पुढे चला सगळ्यांना दर्शन घेऊ द्या” शब्द कानावर पडले……भानावर आलो. तशीच हात जोडून प्रदक्षिणा घातली. १० X १२ चौ.फूट जागेमध्ये भगवान श्री दत्तात्रेयांच्या काळ्या पाषाणातील विलोभनीय पादुका, एक सुबक श्री दत्त मूर्ती, त्या शेजारी एक पुजारी बसू शकेल एवढीच जागा. मंदिराच्या डाव्या बाजूलाच लहान प्राचीन श्री गणेश आणि केशरी हनुमानाची मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते. गुरु चरणकमलाच्या मागे थोड्या खाली एक प्राचीन शिवलिंग आहे….. त्यावरही फुले वाहीलेली होती. आम्हाला गुरूशिखरापर्यंत पोहोचायला आणि दर्शन घ्यायला तीन वाजले…… ही सर्व साधारण ब्रम्हमुहूर्ताची वेळ….. दर्शन खूपच सुंदर झाले…… वेळ सुंदर साधली गेली……मन श्रद्धा आणि भक्तीने भरुन आले……सुखावलो. गर्दी असल्यामुळे आणि जागे अभावी फार वेळ मंदिरात उभं राहू देत नाहीत. जे कोण महाराज आहेत ते “पुढे चला सगळ्यांना दर्शन घेऊ द्या” अशी सूचना सतत करत असतात. त्यांचंही योग्यच आहे. सध्या पौर्णिमेला भाविक फार येतात. सगळ्यांना श्री पादुकांचे दर्शन झाले पाहीजे. कोणत्याही देवाच्या दर्शनासाठी जा. देवाकडे हे मागायचं….. अशीच प्रार्थना करायची…. अमूकच…. तमूकच असे माझ्याच मनाचे खुप खेळ सतत चालूच असतात. पण, प्रत्यक्षात जेव्हा देवदर्शनाचा तो दिव्य क्षण येतो….. तेव्हा मनाची अवस्था ……. शून्य……. निर्विचार……असं अनेकदा झालंय…… काही मागायची कधी संधीही मिळाली नाही…… आणि गरजही पडली नाही….पण बहीणाबाईंनी त्यांच्या कवितेत मनाबद्दल अगदी समर्पक शब्दांत लिहिलंय …..”मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर । किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।।” त्याच मनाला आपण स्थिर करण्यासाठी नामस्मरणात गुंतवायचं, “रब गुण गायरे तू मना। काहे भटकत फिरे निसदिना।।“
उतरताना परत हजार-एक पाय-या उतरल्यावर त्याच दोन सोनेरी कमानीशी आपण येतो. तिथे आल्यावर कमंडलू स्थानाकडे जायला ३०० पायऱ्या खाली उतरायला लागतात. या कमानी पाशी उभं राहून गुरु गोरखनाथ शिखर पहिले असता शिखरा शेजारीच दुसऱ्या शिखरावर मोठा नंदीचा आकार दिसतो. शिखरावरच्या विविध लहन मोठ्या दगडांनी मिळून हा आकार तयार होतो. एका विशिष्ट कोनातूनच पहिले असता हा आकार स्पष्ट दिसतो. त्या आकारापाठी पौर्णिमेचा चंद्र आल्यामुळे तो नंदी खुलून दिसतो, साक्षात खरा वाटतो. आम्ही फोटो काढायचा प्रयत्न केला पण अपुरा प्रकाश आणि खूप अंतर असल्यामुळे नीटसा आला नाही, पण नंदी दर्शन हा प्रकार खूप विलक्षण आणि विलोभनीय आहे.
आम्ही कमंडलू तीर्थापाशी खाली उतरून आलो. हे कमंडलू तीर्थ अत्यंत शांत आणि प्रसन्न आहे. इथे ५,००० वर्षांपासून असलेली अखंड धुनी आहे. ही धुनी एक दैवदुर्लभ देणगी आहे. आजही ती धुनी दर सोमवारी सकाळी सुमारे ६.००-६.३० वाजता तासाभरासाठी प्रज्वलीत करतात. त्या धूनीत अग्नीरुपानं साक्षात् श्रीदत्तप्रभूच तिथे प्रकटतात. या अनुपम दर्शनाचा लाभ घ्यायचा असल्यास सोमवारी पहाटे (म्हणजेच रविवारी मध्यरात्री) २.००-२.३०च्या दरम्यानच पर्वतारोहणास आरंभ करावा लागतो. येथील भस्म प्रसाद म्हणून भाविकांना आजही दिले जाते. कमंडलुकुंड स्थानी असलेले साधू सुमारे ५-६ मण काष्ठं पिंपळाची लाकडे समर्पित करतात (आपण होळीला जशी लाकडं उभी रचतो तशी अग्नीकुंडात रचून ठेवतात.) आणि एका विशिष्ट क्षणी आपल्या डोळ्यांचं पातं लवण्याच्या आतंच् श्रीदत्तात्रेय निर्मित स्वयंभू अग्नीनारायणाची १२ फूट उंचीची ज्वाला प्रकट केली जाते. श्रध्दावान भक्तांस त्यामध्ये साक्षात् दत्तप्रभूंचे दर्शन होते. आम्ही पोहोचलो तेव्हा रविवार असल्याने आम्हाला या धुंनीचे साक्षीदार काही होता आले नाही, पण हि जागा एकूणच दिव्य आहे. आम्ही गेल्या गेल्या आम्हाला पिण्यास पाणी मिळालं….. तृप्त झालो. आत धूनीशेजारीच आनेक भाविक ध्यानाला बसलेले दिसले. आम्हीही पाच-सात मिनिटे बसलो….पाणी पिऊन मन…. आणि सुखासनात बसून डोकं….. शांत झालं.
कमंडलू तीर्थाची अशी एक अख्यायिका आहे कि, भगवान दत्तात्रेय ध्यानात हजारो वर्षे गिरनार पर्वतावर बसले असताना प्रजा दुष्काळाने प्रचंड हैराण झाली होती. ना खायला अन्न होते…. ना प्यायला पाणी….. गिरनारवर सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होऊ लागले. प्रजेची दयनीय अवस्था पाहून दयाळू अनुसूया मातेने परिस्थिती सुधारण्यासाठी, ध्यानावस्थेतून बाहेर काढण्यासाठी दत्तांना हाक मारली. तेव्हा ध्यानातून बाहेर येताना अनवधानाने हात लागून भगवान दत्तात्रेयांचे कमंडलू खाली पडले…. त्याचे दोन भाग झाले. एक भाग एकीकडे व दुसरा भाग दुसरीकडे असे त्याचे विभाजन झाले. एक ठिकाणी अग्नी (जिथे धुनी आहे) प्रकटला तर दुसऱ्या स्थानावर गंगा अवतरुन जलकुंड निर्माण झाले तेच हे कमंडलू स्थान आहे. कमंडलू कुंडाचे पाणी तेथे सर्व गोष्टींसाठी वापरले जाते. मुख्य कुंडातून इतर कुंडात ते पाणी साठवले जाते. येथील आश्रमामध्ये अन्नछत्रही आहे. आजही हे अन्नछत्र २४ तास सेवेत असते. सेवा देणारे सेवेकरी अगदी आग्रहाने प्रसाद देत असतात. आम्ही याच अन्नछत्रात गाठीया जिलबीचा प्रसाद घेतला. इतक्या पायी प्रवासानंतर पोटासाठी हा आश्रमच खुप मोठा आधार आहे. अन्न-पाण्याची सोय इथे विनामूल्य होते. थोडाफार बसून आरामही करता येतो. सगळीकडे श्री गुरु दत्तात्रयांचा वास भरून राहिला आहे. एकूणच भारावलेले वातावरण आहे. मनाला सतत काहीतरी दिव्य सोबत आल्याची जाणीव होते. श्री दत्तात्रयांच्या चरण पादूकांची छबी मनात साठवून, अंतःकरण हे दत्त नामाने भरून जाते आणि इथूनच परतीचा प्रवास सुरु होतो. जाण्यासाठी आणि येण्यासाठी एकाच मार्ग आहे. ज्या पायऱ्या आपण चढून आलो त्याच आता उतरायच्या आहेत.
आमचा दिव्य दर्शनानंतरचा परतीचा प्रवास, पहाटेचे अविस्मरणीय निसर्ग सौंदर्य, जैन तीर्थकर भगवान नेमीनाथ दर्शन, नेमीनाथांची वैराग्य गाथा…. सगळंच सांगणार आहे…. पुढील भागात….. पुढच्या रविवारी …… जय गिरिनारी.
July 18, 2020 at 11:35 pm
फार सुंदर. वाचून मन प्रसन्न झाले. आणि दत्त गुरु डोळ्यासमोर उभे असल्याचे दिसले.
माझ्याकडून तुम्हाला असेच सुंदर लिहिण्यासाठी शुभेच्या
July 18, 2020 at 11:37 pm
दत्त दत्त म्हणे वाचे|काळ पाय बंदी त्याचे|
दत्त चरणी ठेवी वृत्ति|होय वृत्तिची निवृत्ति||
दत्त रुप पाहे डोळा|वंद्द होय कळीकाळा||
एका जनार्दनी दत्त|हृदयी वसे सदोदित||
||श्री दत्त जय दत्त || खूप छान वर्णन.
July 19, 2020 at 12:18 am
🙏😇🙏
July 19, 2020 at 9:53 am
Khupch sundar datta darshan zale. Tuzyamule malahi…. lihit raha…. aanand det raha
July 19, 2020 at 9:55 am
Shree Gurudev Datta…., Jai girnari,,,,,,, tera bharosa bhari
July 19, 2020 at 12:27 pm
Jai girnari
Khup chan maan prassana zala vachun
Jai gurudev datta
July 19, 2020 at 2:50 pm
Khup chan lihilay jay girinari 🌹🌹
July 19, 2020 at 9:57 pm
Mast 😇
July 22, 2020 at 8:20 pm
।।श्री गुरूदेव दत्त।।
आपले प्रत्येक पुष्प आम्हाला गिरनार माऊलींच्या चरणी घेऊन जाते।
January 17, 2025 at 7:43 pm
Awaiting moderation
amoxicillin cheap – oral amoxil combivent 100mcg for sale