गिरिनार पर्वताच्या पायऱ्या चढणं हे शारीरिक कष्टाचं जरी असलं तरी ते कष्ट या यात्रेत फार जाणवत नाहीत, करण मनाच्या पायरीने एक वेगळाच ऊच्चांक गाठलेला असतो. आपल्या मनाने जो श्री. दत्त दर्शनाचा संकल्प केला आहे, तो संकल्पच प्रचंड शक्ती देत असतो. काही अंतर म्हणजेच एक ४००-५०० पायऱ्या झाल्या कि बसणासाठी चौथऱ्यांची उत्तम सोय आहे. थोड्या थोड्या अंतरावर लाईटचे खांब आहेत, उजेड फार पडत नाही. जो काही प्रकाश आहे तो चढण्यासाठी आणि पायऱ्या दिसण्यासाठी पुरेसा आहे. पर्वत चढताना वा उतरताना कुणी सहयात्रेकरू भेटला, दिसला तर “जय गिरनारी “ म्हणून जयघोष करण्याची प्रथा आहे. या जयघोषांद्वारे दिलेल्या शुभेच्छा सोमोरच्या व्यक्तीचा आणि आपलाही प्रवास सुकर करतात. या जयघोषाने कदाचित गिरनार पर्वतही सुखावत असेल. मी ही येता जाता सगळ्यांना “जय गिरीनारी, जय गिरीनारी” म्हणून जयघोष करत होतो.
गिरनार यात्रा, गिरिनार परिक्रमा का करतात..? यामागे २४,००० वर्ष पूर्वीची एक पौराणिक कथा आहे. साधारण ३०,००० वर्षांपूर्वी पृथ्वीवर हवेचा वेग ताशी २५,००० कि.मी. होता. एका क्षणात अक्खा पर्वत उडून दुसरीकडे जायचा त्या वेळी पृथ्वी एक खंड होती, पर्वतांनाही पंख होते, असा दक्षिण भारतीय साहित्यात उल्लेख आहे. ब्रम्ह देवाने पृथ्वीचे नियोजन करताना ते पंख कापले (कमी केले) म्हणजे हवेचा वेग नियंत्रणात येऊन ताशी २० ते १०० कि.मी. होईल. त्याच वेळी गिरनार पर्वत समुद्रात लपून बसला. गिरनार हा हिमालय पुत्र, पार्वती मातेचा भाऊ. माता पार्वती आणि शिव यांचा विवाह सोहळा २०,००० वर्षांपूर्वी हिमालयात संपन्न झाला. बहिणीच्या लग्नासाठी गिरनार समुद्रातून बाहेर पडला आणि एकाएकी जमिनीवर स्थिर झाला. समुद्रापासून अवघ्या ५० कि. मी. वर हिमालयात परत जाऊच शकला नाही. पुढच्या त्रिपुरारी पौर्णिमेला माता पार्वती भगवान शिवासह गिरनारला वास्तव्याला आले. शिव पर्ववती विवाहात सर्व देव, ऋषी, तीर्थ, नवग्रह, अष्ट सिद्धी, नावनिधी, ५२ वीर, ६४ मातृका, ११ जलदेवता, नव नाग, अष्ट वसू, कुबेर भंडारी सगळेच आले होते. त्यांसह सह शिव पार्वती ४ दिवस गिरनारवर राहीले होते. त्या काळात सर्व देवतांनी गिरनारच्या जंगलात मुक्काम केला होता. आजही कार्तिक एकादशी ते पौर्णिमा या सर्व देवता गिरणारच्या परिक्रमा मार्गात मुक्कामी असतात. परिक्रमेत एक रात्र मुक्काम करावा म्हणजे या देवतांचे सानिध्य आशीर्वाद मिळतात याकरता हि परिक्रमा केली जाते. शास्त्रानुसार एकूण ३ गिरनार परिक्रमा केल्या कि एका कैलास यात्रेचे पुण्य मिळते. सश्रद्ध भक्ताला शिव स्वतः गिरनार पर्वतावर दर्शन देतात अशी मान्यता आहे. अनेक शिव भक्तांना या दर्शनाचीही प्रचिती आली आहे.
मी प्रत्येक पायरीवर पाऊल ठेवताना ” श्री स्वामी समर्थ ” असे नामःस्मरण करायचे असे ठरवून पायऱ्या गाठत होतो. कोजागिरी पौर्णिमेचा चंद्राचा प्रकाश प्रत्येक पायरी उजळवत होता आणि आभाळी चांदण्यांनीही फेर धरला होता. सगळीकडेच “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” असा मंत्रजप चालू होता. काही यात्रेकरू मोबाईलवर भजने, नामस्मरण लावून पायऱ्या चढत होते. काही गुजराथी काठीयावाड स्त्रीया “गोपाला गोपाला” गजर करत एक एक पायरी चाढत होत्या. त्यांचा तो टिपिकल काठीयावाड पोशाख. धागरा-चोली, चूनरी, डोक्यावरच्या त्या बिंदी पासून पायातल्या कडे, वजनदार पैंजण सगळंच सुंदर. त्यांच्या शेजारहून जाताना मी ही “गोपाला गोपाला” असा गजर केला. माझ्याकडे पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. मलाही फार आनंद झाला….. शेवटी काय हो….. सब भूमी गोपालकी. एक दोन हजार पायऱ्यांपर्यंत लिंबू पाणी, गोळ्या, सोडा वाँटर ची दुकाने आहेत. पर्वताखाली मिळणारी पाण्याची बाटली २०/-रु. तर तीच पर्वतावर ४०/- रु. आहे. खरंतर पाण्याच्या बाटल्या एवढ्या वर आणून विकणे हीच मोठी कसरत आहे. पण एक दोन अडीच हजार पायऱ्या चढून गेलात कि आपल्याला तहान भूक काही लागत नाही. हवाही एवढी थंड असते कि शरीर आणि मन हळू हळू हलके होत जाते. मनाचा गाभारा दत्त नामस्मरणाने भरुन जातो. गिरनार पर्वतालाही कदाचित याच नामसाधनेने अत्यानंद होतो आणि तो आपला भार सहजपणे उचलतो.
२,६०० पायऱ्यावर आसपास राणक देवीमातेची शिळ आहे. थोडे अजून पुढे गेल्यावर सुमारे ३,५०० पायऱ्यांपाशी प्रसूतीबाई देवीचे स्थान आहे. संतान प्राप्ती झाल्यावर येथे त्या संतानाला घेऊन दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. मलाही काही दांम्पत्य आपल्या मुलाबाळांसोबत या मंदिराशेजारी दिसली. आपण एक दोन हजार पायऱ्या चढून वर आलो की, आपल्याला तहान, भूक काही लागत नाही. या हवेतच एक वेगळी जादू आहे. ती जादू आपलं काम अगदी चोख करते. येथून थोडे पुढे गेल्यावर दत्त गुंफा, संतोषी माता, काली माता, वरूडी माता, खोडीयार माता अशी छोटी छोटी मंदिरे आहेत. यात्रेच्या सुरवातीला उल्लेख केलेली पायथ्यापासून दिसणारी छोटी पांढरी शुभ्र मंदिरे हीच आहेत. थोडे १००-२०० पायऱ्या चालून गेल्यावर डाव्या बाजूला जैन मंदिर येते. हे मुख्य मंदिर २२वे जैन तीर्थंकर नेमिनाथचे आहे. प्राचीन राजवाड्यामध्येच हे जैन मंदिर आहे. काळ्या पाषाणामधील अतिशय सुंदर सुबक मोहक अशी नेमिनाथांची मूर्ती आहे. नेमिनाथ याच ठिकाणी सातशे वर्षे साधना करीत होते अन् हेच त्यांचे समाधिस्थान आहे. मंदिरा बाहेर बराच अंधार होता. मंदिर सकाळी ७ वा. उघडते म्हणून येताना नक्की दर्शन घेऊ असे ठरवून आम्ही पुढे झालो. इथून पुढे थोडा एक शंभर दिडशे पावलं सरळ, रुंद, अतिशय स्वच्छ आणि सरळ रस्ता लागतो. अनेक यात्रेकरू येथेच पथारी पसरुन थोडा आराम करताना दिसले. जरा थकवा जाणवला कि आम्ही थोड बसायचो. बसल्यावर आकाशी पाहीलं कि आकाशभर चांदणं रेंगाळताना दिसायचं…… अगदी टप्पोर…. यात कोजागिरीचा चंद्र हातभरच लांब आहे, असा भास व्हायचा. मला तर दूर्बिणीतूनही चंद्र इतक्या जवळ आणि स्पष्ट कधीच दिसला नाही. खगोल तज्ञ्यांना हा कोजागिरीचा चंद्र इतक्या जवळून पाहता येणे म्हणजे पर्वणीच आहे. श्री जोर्वेकर संपूर्ण गिरनार चढताना-उतरताना माझ्यासोबतच होते. ते मला माझं वय या सगळ्यांपेक्षा कमी आल्यामुळे सतत म्हणायचे, ” बाळा, तू आमचं स्फूर्ती स्थान आहेस”. माझ्या मनात विरोधाभास होता कि माझ्या पेक्षा हे तिघेही वयाने मोठे असून प्रबळ इच्छाशक्ती, नामसाधना या जोरावर हि यात्रा करतायत, तर उलट मीच कुठेही कमी पडू नये. खरंतर मी त्यांचे नाही तर ते तिघे माझं स्फूर्ती स्थान आहेत. प्रवासात असे सहप्रवासी भेटणं हे भाग्यचं म्हणावं लागेल. वयाने मी लहान म्हणून किती काळजी करायचे तिघेही. त्या कळजी मागचं प्रेम खरं. माणसं जोडण्यापेक्षा ती अशी नकळत जडणं महत्त्वाचं….. असंच मला वाटतं.
जुनागढ रेल्वे स्टेशन पासून गिरनार पायथ्यशी येताना आमचा टुर गाईड महेंद्र याने गिरनार पर्वताची जी दुसरी रंजक पौराणिक कथा सांगितली. ती अशी कि, गिरनार हा पार्वती मातेचा भाऊ हे आपण पाहीलं. भगवान शंकरावर रुसून पार्वती आपल्या भावाकडे राहायला आली आणि तिने गिरनारवर आपले वास्तव्य केले. भगवान शंकराने पर्वतीवर लक्ष ठेवण्यासाठी गिरिनार स्थित श्री दत्त प्रभुंना विनंती केली. पार्वतीने दत्तांना, “तुम्ही माझ्यावर लक्ष ठेवा पण माझ्या नजरेस पडायचे नाही” असे सांगितले. म्हणूनच दत्त प्रभू मातेच्या बरोबर विरुद्ध दिशेला उभे ठाकले. श्री. दत्त मंदिर आणि माता मंदिर ही दोन्ही मंदिरे विरुद्ध दिशेला स्थित आहेत. पार्वती माता इकडे अंबा माता म्हणून पुजली जाते. ५१ शक्तिपीठांपैकी हेही एक शक्तिपीठ आहे. माहूर गडावर जसा रेणूका मातेचा स्वयंभू मोठा मुखवटा आहे. तसाच काहीसा पण आकाराने लहान मुखवटा या अंबा मातेचा आहे. देवी पार्वतीने अंबा मातेच्या रूपात गिरनार पर्वतावर वास केला. हे मंदिर पुरातन असल्याचे सांगितले जाते. गौ-मुखी गंगेच्या उजव्या बाजूने पर्वत चढायला लागल्यावर ४,८०० पायऱ्यावर अंबाजी मंदिर येते, हेच ते पार्वती मातेने आंबा मातेचे रूप घेऊन पर्वतावर वास्तव्य केले ते ठिकाण. लालसर पांढऱ्या रंगाचे हे दगडी बांधकाम असलेले मंदिर फार रमणीय आहे, पण उघडणायची वेळ पुन्हा ७ वा. हे स्थान बहुतेक भाविकांचे आकर्षण आहे. अनेक सुवासिनी येथे देवीची ओटी भरायला येतात. मंदिर बंद असले तरी उंबरठ्यावर ओटी ठेवतात, मातेला मनोभावे प्रर्थना करतात. मातेच्या शक्तीची प्रचिती मंदिरात आल्याशिवाय राहात नाही असं म्हणतात. मातेच्या दर्शनानंतर पुढील प्रवास सुसह्य होतो याचा प्रत्यय येथे आलेल्या प्रत्येकाला येतोच येतो. आपला या यात्रेचा पहिला पर्वत आणि पहिला टप्पा इथेच संपतो. हा पर्वतावरुन समोर पाहीलं कि गुरु गोरक्षनाथ पर्वताचे दर्शन होते.
गुरु गोरक्षनाथ कथा, नाथ संप्रदाय, गुरु शिखरापर्यंतचा पुढचा प्रवास ….. सगळं सांगणार आहे…… पुढच्या भागात…. पुढच्या रविवारी …… जय गिरिनारी
July 4, 2020 at 10:22 pm
Jay girinari
July 4, 2020 at 5:03 pm
Khup sudhara lihala ahe
July 4, 2020 at 10:28 pm
अप्रतिम वर्णन…
July 4, 2020 at 10:47 pm
🙏🏽🌹💐👏 फार सुंदर. असे अनुभव सुंदर शब्दात मांडले आहे. ते वाचल्यावर आपण अप्रत्यक्ष पणे गिरनारी वर गेल्या सरखे वाटते. फारच सुंदर🙏🏽🌹💐👏
July 4, 2020 at 11:37 pm
अप्रतिम वर्णन…जय गिरनार 👏
July 4, 2020 at 11:40 pm
गोपाला गोपाला.लवकरच हा योग आम्हाला पण येऊदे.
July 4, 2020 at 11:56 pm
Hi
Khup chan vatala vachun khup ramniya varnan aahe masta
July 5, 2020 at 6:47 am
खूप छान. वाचत रहावे असे.
July 5, 2020 at 8:20 am
Khup sundar anubhav kathan, jai girnari – trea bharosa bhari
July 29, 2020 at 6:26 pm
सर,अगदी मनमोहक स्वरूपात शब्दाची
मांडणी आहे असे वाटते की वाचत रहावे
व एक वेगळा अनुभव घ्यावा,जय दत्त गुरू
July 29, 2020 at 6:42 pm
धन्यवाद… जय गिरिनारी
January 12, 2025 at 5:36 pm
Awaiting moderation
amoxicillin order – buy ipratropium paypal ipratropium 100mcg uk