विश्वास ” हा आंतरमनाचा पाय आहे. शब्द जितका सोपा आहे, अनुभव घ्यायला तितकाच कठीण. याच विश्वासावर आपण अशक्यही शक्य करू शकतो. आजकाल देवावरचा आणि स्वतःवरचा विश्वास कुठेतरी कमी होत चालला आहे, असे जाणवते. देव हा दगडात नसून ती एक अदृश्य मंगल शक्ती आहे, उर्जा आहे, जी चराचरात विद्यमान आहे. आपल्या भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत की जिथे  ईश्वरी शक्तींचा अविरत स्तोत आहे आणि तो अखंड प्रवाहीत आहे. या शक्तीचा म्हणजेच दिव्यत्वाचा प्रत्यक्ष प्रत्यय या अशा ठिकाणी जाऊनच घेता येतो. मन हे निसर्गतः चंचल आहे. ते एकाचवेळी दश दिशा फिरत असते. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर ते कधीही स्थिर होत नाही. संत बहीणाबाईंनीही म्हटले आहे, “मन वढाय वढाय… ऊभ्या पीकातलं ढोळं” हे अस्थिर मन एखाद्या अनाहून उर्जेने स्थिर झालं तरच स्वतःचा शोध घेता येतो. आपल्याला आपल्या आंतरमनाचा आवाज ऐकू येतो. स्थिर मनाने आपल्या भोवती चांगल्या विचारांचं वर्तुळ निर्माण होत जातं. त्याचाच परिणाम म्हणून आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी, घटना आणि माणसं सतत आकर्षित होतात.
आपला महाराष्ट्र हा आपण संतांची भूमी म्हणून ओळखतो. याच महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणे, मंदिरे आणि तीर्थ स्थळे आहेत जिथे एक अनामिक ऊर्जा भरून राहिली आहे, तिथे वास्तव्य करणाऱ्या महात्मा सतपुरुषांनी त्यांच्या तपोबलाने ते स्थान सिद्ध केले आहे. त्या स्थानाच्या दर्शनाने, यात्रेने मन स्थिर होते. त्या उर्जेशी आपली नाळ जुळते. आपल्याला खूप सकारात्मक ऊर्जा मिळते. हे सदर लिखाण म्हणजे मी माझ्या मनाला स्थिर आणि शांत करण्यासाठी प्रयत्नपूर्वक केलेल्या एका धार्मिक यात्रेचा अनुभव आहे. हा फक्त अनुभव नाही तर हा स्वतःहून घेतलेला स्वा-नुभव आहे. जो प्रसाद म्हणून तुम्हा साऱ्यांसोबत वाटताना मला आत्यंतिक समाधान लाभत आहे. 
नवी पिढी हि अनुकरणाने घडत असते. ती घडवण्याची जबाबदारी हि आपल्या साऱ्यांची आहे. सध्या तरुणांनी या धार्मिक आणि आध्यात्मिक मार्गाकडे वळावे, जेणेकरून मन प्रसन्न राहील, अनेक प्रश्नांची उत्तरे ही आपणहून मिळतील, जगात विश्वशांती प्रस्थापित होईल, स्वतःचा तसेच स्वतः सोबत इतरांचाही ऊत्कर्ष करता येईल. हे लिखाण तुमच्या मनात नक्कीच धार्मिक स्थळांबद्दल ओढ निर्माण करेल. हे लेख वाचून जर तुम्ही गिरनार स्थानाला एकदा भेट देण्याचा विचार केलात, तर ते यश नक्कीच तुमच्यावरच्या ईश्वरी कृपेचं असेल.
शुभं भवतु, कल्याणमस्तु…..

गुरु ब्रम्हा गुरु विष्णू गुरुः देवो महेश्वरा
गुरु शाक्षात परब्रम्हा तस्मै श्री गुरुवे नमः
श्री. गुरु दत्तात्रेयांनी जिथे प्रत्यक्ष निवास केला आहे असे ठिकाण पर्वतशिखरांचा समूह म्हणजे श्री क्षेत्र गिरनार…..!!!
स्थान: गिरनार पर्वत, तलेठी, जुनागड जिल्हा सौराष्ट्र (गुजराथ राज्य)
श्री दत्तमहाराजांचे अक्षय निवास स्थान म्हणून गिरनारची ख्याती पसरली आहे. श्री स्वामी समर्थ मठ, दादर, मुंबई येथे साधारण २-३ वर्षांपूर्वी गिरनार यात्रा अनुभव या विषयावर एक व्याख्यान होते. कधी एकदा व्याख्यान ऐकतो असं झालं होतं. ते ऐकण्याचा योगही जुळून आला. सादर करणारे गृहस्थ गिरनारला १०८ वेळा जाऊन आले होते. अतिशय सुंदर आणि उत्कंटावर्धक अनुभव कथन ऐकून मनात एकदातरी गिरनारला जाऊन यावे असे वाटले. उत्कट भाव जागृत झाले. तात्काळ स्वामींना बसल्याजागीच विनंती केली, पण माझी इच्छा उत्कट असण्यापेक्षा दत्त प्रभूंची इच्छा असेल तर बोलावणे येते असे कळले. मी इच्छा प्रकट करून ती पूर्ण करून घेण्याचा भार स्वामींवर टाकला आणि निश्चिंत झालो. मी प्रयत्नपूर्वक खूप टूर आणि ट्रॅव्हल शोधले. सध्या नावाजलेले कोणतेही टूर आणि ट्रॅव्हलतेथे जात नाहीत. कारण गिरनार ही काही टूर किंवा ट्रिप नाही. ती एक यात्रा आहे. जी आपल्याला स्वतःला माणूस म्हणून शोधायला मदत करते. या यात्रेत शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही शक्ती पणाला लागतात. प्रवाशांच्या बाबतीत कोणताही धोका या खाजगी नावाजलेल्या कंपन्या पत्करत नाहीत. नफा-तोट्याची गणितं या अशा यात्रा आयोजित करुन जुळून येत नाहीत. म्हणून या अशा धार्मिक यात्रा आयोजित करण्यापेक्षा त्या घडवून आणणाऱ्या फार थोड्या सामाजिक संस्था आहेत. ज्या हे काम निरपेक्ष, अविरत करत असतात.
माझ्या बाबतीत गिरनार यात्रेचा योग हा ऑक्टोबर २०१९ मध्ये जुळून आला. ११ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत हि धार्मिक आणि अध्यात्मिक यात्रा ईश्वरी कृपेने आणि स्वामींच्या आशिर्वादाने घडून आली. ईझी टूर हि एक ट्रॅव्हल कंपनी आहे, पुण्याची आहे, ती कंपनी हे काम सेवाभाव म्हणून माफक दारात करते. मी फोन करून थोडी चौकशी केली, खुप छान माहीती मिळाली, तारखा कळल्या आणि तत्पर नोदंणी केली. आठवड्याभरातच यात्रा होती, हि कोगागिरी पौणिमा निमित्त आयोजित यात्रा होती. चंद्राला जशी ओढ पूर्णत्वाची तशीच मला दत्त दर्शनाची.
माझा हा यात्रा प्रवास कसा सुरु झाला?, सुरवतीलाच दत्त दर्शन कसं झालं?, सहकारी वर्ग कसा होता?  ही सगळी कथा सांगणार आहे….. पण पुढच्या भागात….. जय गिरिनारी

जय गिरिनारी – पुष्प २

गुरु शिखर
सुर्यास्त
गुरु शिखर
गुरु गिरिनारी