मल्लारण्याच्या कड्यावरुन कोसळणा-या धबधब्या शेजारी शरण्यला काजव्यांसारखा मंद प्रकाश जाणवला. त्या प्रकाशाचा मागोवा घेताना त्याला काहीच अंतरावरच एक गुहा दिसली. गुहेपाशी जाताच आत दूरवर प्रकाशाचा अंधुक ठिबका दिसू लागला. रात्रीच्या गही-या अंधारात गुहेतून बाहेर पडणारा हा प्रकाश शरण्यला त्या गुहेत आकर्षित करण्यासाठी पुरेसा होता. अशी एक गुहा इथे उंचावर आहे, पण सापडत कुणालाच नाही, असे तो गावातल्या थोरा-मोठ्यांकडून ऐकून होता. आजवर अनेकदा इथवर येऊन अमावस्येच्या इतक्या रात्री उलटून गेल्या, पण त्याला ती गुहा इथे कधीच दिसली नव्हती. आज त्या मिणमिणत्या प्रकाशामुळे ती गुहा जरा स्पष्टच दिसत होती. अमावस्येच्या रात्री अरण्यात मिळणा-या आयुर्वेदीक जडीबुटी शोधता शोधता तो या गुहेपाशी येऊन पोहोचला होता. गावातल्या कुणीही इतक्या उंचावर येण्याचा कधीच प्रयत्न केला नव्हता. गुहेत खुप आत फक्त ‘आई मल्लमाची’ उग्र चेहऱ्याची सुवर्ण मूर्ती आहे, आई अरण्याचं रक्षण करते, अशी दंतकथा मात्र गावभर अबाल-वृद्धांपर्यंत प्रसिद्ध होती……
‘आई मल्लमा’……..
अरण्यात उंच डोंगरावरच्या गुहेत एक साध्वी युगानुयुगं तपश्चर्या करत होती. तिच्या तपोबलाने डोंगरावरची आणि आरण्यातली भूमी सिद्ध झाली. अनेक दूर्मिळ औषधी वनस्पतीही रुजल्या, जिवंत झाल्या. आजूबाजूच्या गावक-यांना उपजीविकेसाठी ह्या अरण्याचाच एक मोठा आधार होता. दूरवरुन लोक या सापडणा-या दैवी, औषधी वनस्पती, औषधी मुळं, फळं गोळा करण्यासाठी इथवर येत. अनेक रोग, व्यधी मुक्त झाल्यावर देवी आईला मनोमन हात जोडून धन्यवाद देत. अचानक काही वर्षातच अरण्यात मल्ल नावाचा तांत्रिक आपला तळ ठोकून राहू लागला. त्याच्या जादूटोण्याला घाबरुन इथं येण्याचं धाडस दिवसही कुणी करत नसे. तंत्र आणि असुरी विद्येत निपून असा हा मल्ल अघोरी कृत्य करण्यातही तरबेज होता. संपूर्ण अरण्याला, अरण्यातल्या प्रत्येक झाडं, वेली, फळं, फुलं यांना त्याने आपल्या तंत्र- मंत्राने आपल्या अधीन केलं होतं. रात्री अरण्यात एकट-दूकटं कुणी सापडलं तर त्याचा हमखास बळी जायचा. त्यावर अघोरी विद्येचा प्रयोग करुन ते प्रेत झाडाला टांगलेलं सापडायचं. त्यातूनच काही झाडं नरभक्षीही झाली, अख्खीच्या अख्खी माणसंच गिळून टाकायची. नरसंहाराने मातीत एक प्रकारचं विष पसरलं, औषधी वनस्पतींचाही गुण येईनासा झाला. गावोगावी रोगराई पसरली, माणसं किड्या-मुंगीसारखी मरायला लागली. अरण्य आणि शेजारची इतर गावे निर्मनुष्य झाली.
तांत्रिकाला आता बळी देण्यासाठी देह मिळेनासा झाला, तशी त्याची अघोरी विद्या खुंटली. तंत्र विद्येने त्याने डोंगरावरच्या गुहेत एक मानवी देह आहे हे जाणले. त्या देहाच्या शोधात तो त्या गूहेच्या द्वारापाशी आला. डोंगरावरचा धबधबा खळाळून वाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर सावज सापडले असा असूरी उन्माद झळकला. दबक्या पावलाने तो हळूच गुहेत शिरला….. गुहेत किर्र अंधार…. पायाखालचा चर्र चर्र पाचोळा तुडवत राहीला…… बराच वेळ झाला……अंधार गडद होत गेला. गुहा खुप खोल गेले तरी संपेच ना….. तांत्रिक प्रचंड संतापला, त्याला आवेग आवरेनासा झाला. त्याच्या दमलेल्या श्वासाचा धपापलेला आवाज गुहेत निनादू लागला. तेवढ्यात त्याला समोर मिणमिणता प्रकाश दिसला. दगडी दिवा चिरंतन तेवत होता. त्या मंद तेवणा-या दिव्याजवळ जाता जाता तो प्रकाश हळूहळू गहीरा होत गेला. आता तो एकच दगडी दिवा अख्खी गुहा उजळून टाकण्यासाठी पुरेसा होता. त्या दिव्यात त्याला उजळताना दिसली ती तेजस्वी साध्वी. दिव्याजवळच्या दगडी चौथ-यावर सिद्धासनात बसलेली. साधारण पाच फुटाचं दिव्य तेजोमय आभामंडल तिच्या भोवती पसरलेलं, प्रसन्न मुखमंडल, डोळे मिटून तपश्चर्या करताना तिच्या ललाटावरचं तेज, सहस्र सुर्य एकाच क्षणी उगवल्याचा आभास निर्माण करत होतं. रेशमी केसांच्या काळ्याभोर, लांबसडक बटांनी संपूर्ण शरीर झाकलं होतं. तांत्रिकाचा चेहरा खुलला, त्याला मनोमन आनंद झाला. त्याला बळी देण्यासाठी आज मानवी देह दिसला होता. क्षणाचाही विलंब न करता त्याने मंत्र शक्तीने तिला वश करण्याचा प्रयत्न सुरु केला. पण या वशीकरणाचा साध्वीच्या आभामंडलावर किंचितही परिणाम झाला नाही. मंत्र-तंत्राचा प्रयोग फसल्यावर चिडून कु-हाडीने वार करण्यासाठी तो पुढे सरसावला. साध्वी ध्यानस्थ बसलेल्या चौथ-यापाशी उभा राहीला. साध्वीच्या मानेवर फिरवण्यासाठी त्याने प्रचंड आवेगाने सपकन कु-हाड उगारली….. तोच एक जोरदार वा-याचा झोत त्याच्या अंगावर उसळून आला…..तांत्रिक दोन पावलं मागे ढकलला गेला …… कू-हाड हवेतल्या हवेत उडून गेली……. दगडी दिवा विझला….. गुहेत पुन्हा गर्द अंधार कोंडला….. यात क्षणभरच ओसरला असेल ……. तेवढयात साध्वीने ताडकन डोळे उघडले. तिच्या दोन्ही डोळ्यातून एका अनामिक ऊर्जेचा स्रोत बाहेर पडला. तांत्रिक जागीच खिळला. तिची नजर समोर उभ्या तांत्रिकावर स्थिरावली. त्याची दुष्कर्म तिच्या मनपटलावर अधोरेखीत झाली. तिच्या डोळ्यांत अंगार पेटले. आभामंडल लालेलाल झालं. गुहेत प्रचंड उष्णता निर्माण झाली.
तांत्रिकाला उष्णतेनेच आपली राख होईल अशी भीती वाटली. साध्वीचं हे ऊग्र रुप पाहूनच तांत्रिक गर्भगळीत झाला…… त्याच्या शरीरातला उद्वेग एकाएकी नाहीसा झाला…… मृत्यू …..भयाण मृत्यू ….. डोळ्यासमोर उभा ठाकला. साध्वीच्या केशबटा जमिनीवरून सरकत सरकत तांत्रिकाच्या पायापर्यंत पोहोचल्या. त्याला काही समजायच्या आत पायापासून सरकन चढून चेहराभर पसरल्या. बटांनी तांत्रिककाचे संपूर्ण शरीर वेढून घेतले. नाकावाटे आत गेलेल्या बटा, कानावाटे बाहेर येऊ लागल्या. तांत्रिकाच्या कर्कश्य आरोळ्या गुहेत घूमू लागल्या. साध्वीच्या बटांनी त्यांची पकड घट्ट केली…….. रक्ताच्या शिंतोड्यांची गूहा लालेलाल झाली …… त्यातच तांत्रिक जमिनीवर कोलमडून पडला. बटा नखशिकांत रक्ताळल्या आणि गुहेत एका दूष्ट प्रवृत्तीचा विनाश झाला. तेव्हापासूनच मल्लाचा वध करुन तपस्वी-साध्वी “आई मल्लमा” झाली. गुहा एकाएकी अदृश्य झाली. आयुर्वेदीक वनस्पती फक्त अमावस्येच्या रात्रीच जिवंत दिसू लागल्या.
त्याच औषधी वनस्पतीच गोळा करता करताच अमावास्येच्या रात्री शरण्य त्या गुहेपाशी येऊन ठेपला होता.
क्रमश…………………..
Leave a Reply